या नायिकांनीही पडद्यावर साकारल्या आहेत वेश्या आणि कोठेवालीच्या भूमिका

heroines have also played the roles of prostitutes and housewives on screen

आलिया भट्ट (Alia Bhatt) सध्या तिच्या संजय लीला भंसाळी (Sanjay Leela Bhansali) निर्मित आणि दिग्दर्शित गंगुबाई काठियावाडी या सिनेमात काम करीत आहे. या सिनेमामुळे ती सध्या चांगलीच चर्चेत आहे. ट्रेलमध्ये तिचा वेगळा लुक नुकताच प्रेक्षकांसमोर आला आणि तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होऊ लागला आहे. सिनेमा रिलीज झाल्यावरच आलियाने या भूमिकेला कसा आणि किती न्याय दिला आहे ते कळेल. पण सध्या तरी आलिया तिच्या या गंगुबाईच्या भूमिकेमुळे चांगलीच चर्चेत आहे. आलियाने कामाठीपुऱ्यातील सुरुवातीला वेश्या आणि नंतर राजकारणार उतरलेल्या कोठेवाल्या मालकिणीची भूमिका साकारली आहे. आलियाप्रमाणचे यापूर्वीही अनेक नायिकांनी पडद्यावर अशा भूमिका साकारल्या असून त्यासुद्धा खूपच चर्चिल्या गेल्या होत्या.

मोठ्या पडद्यावर एखाद्या मोठ्या अभिनेत्रीने वेश्येची भूमिका करण्यास सुरुवात वहिदा रहमानने (Waheeda Rehman) केली होती. हा सिनेमा होता १९५७ मध्ये आलेला आणि प्रचंड लोकप्रिय झालेला ‘प्यासा’. गुरुदत्तच्या कारकिर्दीतील हा एक अत्यंत गाजलेला आणि लोकप्रिय सिनेमा. यात गुरुदत्तने एका कवीची भूमिका साकारली होती तर वहिदा रहमानने गुलाबो नावाच्या वेश्येची भूमिका साकारली होती. हा सिनेमा कल्ट क्लासिक म्हणून आज ओळखला जातो.

१९७५ मध्ये शर्मिला टागोरने (Sharmila Tagore) ‘मौसम’ सिनेमात वेश्येची भूमिका साकारली होती. संजीव कुमार (Sanjeev Kumar) अभिनीत या सिनेमात शर्मिला टागोरने आई आणि मुलगी अशी दुहेरी भूमिका साकारली होती. वेश्या असलेल्या मुलीला म्हणजेच शर्मिला टागोरला संजीव कुमार घरी घेऊन येतो आणि तिला कसे सुधरवतो त्याची कथा या सिनेमात मांडण्यात आली होती.

अभिनेत्री रेखाच्या (Rekha) सौंदर्याची जादू आजही प्रेक्षकांवर कायम आहे. अमिताभसोबत रेखाची जोडी चांगलीच जमली होती. ‘मुकद्दर का सिकंदर’मध्ये रेखाने कोठेवालीची भूमिका केली होती. या सिनेमातील तिचा अभिनय आणि डांसवर प्रेक्षक फिदा झाले होते. यानंतर रेखाने ‘उमराव जान’ सिनेमातही कोठेवालीची भूमिका केली होती. या सिनेमात रेखाने तिचा अभिनय एका ऊंचीवर नेऊन ठेवला होता. या भूमिकेसाठी तिला सर्वश्रेष्ठ अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला होता.

बॉलिवूडमध्ये मराठी डंका वाजवणाऱ्या माधुरी दीक्षितने (Madhuri Dixit) तिच्या कारकिर्दीत अनेक भूमिका केल्या. या अनेक भूमिकांपैकीच एक आहे ‘देवदास’मधील चंद्रमुखीची. दिलीपकुमारच्या देवदास सिनेमाच्या या नव्या आवृत्तीत शाहरुख खानने देवदासची भूमिका साकारली होती तर ऐश्वर्या रायने पारोची भूमिका साकारली होती. संजय लीला भंसाळीचा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट झाला होता.

आता दोन मुलांची आई झालेल्या करीना कपूरनेही (Kareena Kapoor) ‘चमेली’ सिनेमात कोठेवालीची भूमिका साकारली होती. सुधीर मिश्रा आणि अनंत बालानी दिग्दर्शित या सिनेमात राहुल बोसने नायकाची भूमिका साकारली होती. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर विशेष करामत करू शकला नव्हता. पण करीनाच्या अभिनयाची प्रचंड प्रशंसा झाली होती. या भूमिकेसाठी तिला पुरस्कारही मिळाला होता.

विद्या बालनने (Vidya Balan) अनेक नायिकाप्रधान सिनेमात तिच्या अभिनयाची जादू दाखवली आहे. याची अनेक उदाहरणे आहेत. मात्र आताचा विषय तिच्या नायिकाप्रधान सिनेमाचा नसल्याने त्याची माहिती देण्यात वेळ घालवणे योग्य नाही. या विद्या बालनने २०१७ मध्ये आलेल्या ‘बेगम जान’ सिनेमात कोठेवाल्या मालकिणीची भूमिका साकारली होती. स्वातंत्र्यपूर्व काळात भारत-पाकिस्तानच्या सीमेवरील गावात तिचा कोठा असतो. हा कोठा ती कसा वाचवते त्याची अत्यंत उत्कृष्ट कथा या सिनेमात मांडण्यात आली होती.

तब्बूने (Tabu) मधुर भांडारकरच्या ‘चांदनी बार’ सिनेमात बार गर्लची भूमिका साकारली होती. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वी तर झालाच, तब्बूला अभिनयाचे आणि सिनेमालाही उत्कृष्ट सिनेमासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. ही भूमिका साकारण्यापूर्वी तब्बू अनेक बियर बारमध्ये गेली होती आणि बार गर्ल्सशी गप्पा मारून त्यांचा अभ्यासही केला होता.

मधुर भांडारकरच्याच ‘ट्रॅफिक सिग्नल’ सिनेमात कोंकणा सेन शर्माने (Konkona Sen Sharma) वेश्येची भूमिका साकरली होती. या सिनेमासाठीही मधुरला राष्ट्रीय पारितोषिक मिळाले होते. नेहा धूपियानेही (Neha Dhupia) २००४ मध्ये रिलीज झालेल्या ‘ज्यूली’ सिनेमात वेश्येची भूमिका साकारली होती. मात्र हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला होता. २००९ मध्ये देवदासचे आधुनिक वर्शन ‘देव डी’ नावाने आले होते. या सिनेमात आधुनिक चंद्रमुखीची भूमिका कल्की कोचलीनने (Kalki Koechlin) केली होती. या सिनेमाची चर्चा झाली होती पण बॉक्स ऑफिसवर चालला नव्हता.

याशिवायही अनेक नायिकांनी अशा भूमिका साकारल्या आहेत पण त्यांची चर्चा झाली नाही. केवळ करायची म्हणून त्यांनी अशा प्रकारची भूमिका साकारली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER