साताऱ्यातील जवान सचिन जाधव यांना वीरमरण : शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Sachin Jadhav

सातारा : भारत-चीन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर लेह-लडाख येथील सीमेवर कर्तव्य बजावत असताना दुसाळे (ता. पाटण) येथील जवान सचिन संभाजी जाधव (वय 38) यांना वीरमरण आले. बुधवारी ही घटना घडली. जाधव कुटुंबीयांसह संपूर्ण जिल्ह्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आज, शनिवारी दुसाळे येथे शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

भारत-चीन संघर्ष सुरू असताना सचिन जाधव हे लेह लडाख येथे कार्यरत होते. तीन महिन्यांपूर्वी ते दोन महिन्यांच्या सुट्टीनिमित्त गावी आले होते; पण एक महिन्यानंतर त्यांना रजा रद्द करून कर्तव्यावर जावे लागले होते. दरम्यान, सीमेवर गस्त घालत असताना घुसखोरी करणाऱ्या चीनच्या सैनिकांना प्रतिकार करत असताना त्यांना वीरमरण आले. बुधवारी ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांसह ग्रामस्थ, मित्र यांचा आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता.

सचिन यांचे प्राथमिक शिक्षण दुसाळे गावात झाले. त्यानंतर सातारा येथे उच्च शिक्षण घेत असतानाच 2002 साली ते पुणे येथे सैन्यात भरती झाले. ते 111 इंजिनिअरिंग रेजिमेंटमध्ये नाईक पदावर कार्यरत होते. त्यांनी लेह-लडाख, जम्मू-काश्मीर, पुणे येथे सेवा बजावली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER