मूळव्याधीतील आहार योजना

Hemorrhoids diet plan

मूळव्याध, मूळव्याध, अतिशय वेदनादायी आणि आहारावर नियंत्रण शिकविणारी व्याधी असे म्हणायला हरकत नाही. आहारात जरा बदल झाला, बद्धकोष्ठता झाली की जुना मूळव्याधीचा आजार डोके वर काढतो. त्यामुळे मूळव्याध असणाऱ्या किंवा पूर्वी झाला असेल तर असे रुग्ण सांगतात, जेवणात तिखट, मसालेदार खाल्ले की त्रास होतो. त्यामुळे असह्य त्रासापेक्षा आहाराचे पथ्य सांभाळणे बरे असा विचार रुग्ण करतात. कितीतरी क्रीम, तेल, औषध वटी, घरगुती उपाय, सर्जरी या स्वरूपात मूळव्याधीच्या चिकित्सेकरिता उपलब्ध आहेत.

अर्श किंवा मूळव्याध का होते तर सर्वांत मुख्य कारण आहे अग्निमांद्य (जठराग्नी मंद असणे). याव्यतिरिक्त मलबद्धता, अति प्रवास, विषम (uneven) – कडक आसनावर सतत, जास्त वेळ बसणे, अति थंड पाण्याने गुदभाग स्वच्छ करणे, मलप्रवृत्तीसाठी कुंथणे (जोर लावणे), मलमूत्र, अपान वायू (गॅस) यांचा वेग अडकविणे, गर्भावस्थेत गर्भाचा दाब पडल्याने तसेच अतिसार वारंवार होणे अशी अनेक कारणे मूळव्याध होण्याकरिता सांगितली आहेत.

भूक न लागणे किंवा खाल्लेले न पचणे हे सर्व व्याधीचे मूळ कारण आहे. मूळव्याधीचे तर नक्कीच. त्याप्रमाणे आहारात बदल, लंघन, सूप, कढण असा आहार घेऊन सुरुवातीलाच मूळव्याधीच्या मुळावर आघात करणे आवश्यक आहे. मूळव्याधीचा त्रास ज्यांना आहे त्यांनी आहारात पथ्यपालन करणे आवश्यक आहे. काय खाऊ नये हे सर्वांना माहिती असते. त्यावर सर्वजण उपदेश करतच असतात. ते प्रकृती, वय, सात्म्य वातावरण व्यक्तिपरत्त्वे बदलते. आयुर्वेदात पथ्यापथ्य हा खूप सुंदर व अतिशय महत्त्वाचा विषय प्रत्येक व्याधीकरिता वर्णित आहे. उदा. ज्वर असेल तर आहार कसा असावा, मूळव्याध असेल तर आहारात काय घ्यावे. यालाच पथ्य आहार म्हणतात. म्हणजेच आहारात अवश्य घ्यावे जेणेकरून आजार लवकर बरा व्हावा व औषध लवकर काम करेल.

मूळव्याध असल्यास आहारात काय घ्यावे ते बघूया –

  • मलबद्धता होणार नाही तसेच जठराग्नि वाढविणारे पदार्थ आहारात घ्यावे.
  • चाकवत – यालाच बथुआ म्हणतात. ही भाजी मूळव्याधीत पथ्य आहे. तुपावर हिंग, जिऱ्याची फोडणी करून चाकवत
  • बारीक चिरून परतवावी. त्याला थोडे दही लावून कोथिंबीर, आलं, धने पावडर, सुंठ, मिरे, सैंधव काळे मीठ टाकावे.
  • कोळसा जाळून त्यावर तूप टाकून त्याचा धूर (smokey) द्यावा.
  • मांसरस (stalk or soup) – मांसाहारी लोकांनी वरील मसाले वापरून सूप बनवावे.
  • ताक – अर्श व्याधीत ताक पथ्यकर आहार आहे. अर्शांकुर, वेदना दूर करण्याकरिता ताक उत्तम आहे. ( ताक या विषयावर लेख वाचावा.)
  • धने, सुंठ, सिद्ध जल – तहान लागल्यास धने व सुंठ घालून उकळलेले पाणी प्यावे. हे अग्निवृद्धीकर आहे. अपान वायू व मळाला बाहेर काढण्याचे काम करते.
  • सुरण – ही एक कंदभाजी आहे. मूळव्याधीकरिता पथ्यकर. याची भाजी कशी करावी हेसुद्धा सांगितले आहे.
  • डाळिंबाचा रस, सुंठ, धने, जिरे, गूळ घालून घेऊ शकतो.
  • रक्त निघत असेल तर षष्टीभात, मसूर, मूग, तूर यांच्या सुपात आमचूर, लिंबूरस किंवा आंबट, डाळिंबाचा रस टाकून घेणे.

मूग, मसूर, जुने तांदूळ, गहू हे नित्य सेवनीय पदार्थ आहेतच. मुख्य म्हणजे जे पदार्थ पचायला हलके, मलबद्धता करणार नाही, जठराग्निवृद्धी करणारे अन्नपेय अपेक्षित आहे. डाळींचे सूप, डाळ, तांदूळ एकत्र करून सूप करणे, प्रत्येक पदार्थ ताकासह घेणे. योग्य प्रमाणात तेल-तुपाचा वापर करणे, सुंठ, मिरे, सैंधव, हिंग, जिरे, धने यांचा मसाल्यात वापर मूळव्याध आजारात उपयोगी ठरतो. मूळव्याधीतील पथ्यविचार आजाराच्या मूळ कारणाचा विचार करून सांगितला आहे. अग्निमांद्य दूर झाले की व्याधी बरा होणारच!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER