हेमंत नगराळे होऊ शकतात राज्याचे नवे पोलीस महासंचालक

Subodh Kumar Jaiswal - Hemant Nagrale

मुंबई : राज्याचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जैस्वाल (Subodh Kumar Jaiswal) यांची केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या जागी वरिष्ठ आयपीएस अधिकारी हेमंत नगराळे (Hemant Nagrale) यांची पोलीस महासंचालकपदी संधी मिळण्याची शक्यता आहे. ते १९८७ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.

सुबोध जैस्वाल यांच्या बदलीनंतर महाराष्ट्र पोलीस महासंचालक पद रिक्त झाले आहे. या पदासाठी संजय पांडे, हेमंत नगराळे, सुरेंद्रकुमार पांडे आणि रजनीश सेठ यांची नावं चर्चेत आहेत. यात नगराळे यांचे पारडे जड मानले जाते आहे.

हेमंत नगराळे
हेमंत नगराळे हे १९८७ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. जैस्वाल यांच्यानंतर सेवा ज्येष्ठतेनुसार आधी संजय पांडे यांचा क्रमांक आहे. परंतु पांडे जून २०२१ मध्ये निवृत्त होणार आहेत. त्यामुळे ज्येष्ठतेनुसार दुसऱ्या स्थानी असलेल्या हेमंत नगराळेंना संधी मिळेल, असे मानले जाते. हेमंत नगराळे यांचा १९ महिन्यांचा कार्यकाळ शिल्लक आहे. त्यांनी २०१६ मध्ये नवी मुंबई पोलीस आयुक्त पदाचा कारभार स्वीकारला होता. २०१८ मध्ये त्यांची नागपुरात बदली झाली. नगराळे सध्या पोलीस महासंचालक (विधी आणि तंत्रज्ञान) पदावर आहेत.

नगराळे यांची कारकीर्द
नगराळे नवी मुंबईचे पोलीस आयुक्त असताना देशभर गाजलेल्या वाशीतील बँक ऑफ बडोदा दरोड्याची उकल अवघ्या दोन दिवसांत केल्याने त्यांचे कौतुक झाले होते. १७ वर्षांखालील फुटबॉल विश्वचषक स्पर्धा, पॉप गायक जस्टीन बिबरच्या कार्यक्रमात चांगली कायदा-व्यवस्था ठेवल्याने त्यांना शाबासकी मिळाली होती. त्यांच्या काळात झालेली पोलीस क्रीडा स्पर्धाही राज्यात गाजली. कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे निलंबन, बडतर्फी, बदली अशी प्रकरणे त्यांनी योग्य हाताळली.

वाद
नवी मुंबईचे पोलीस आयुक्त असताना विधानपरिषदेची परवानगी न घेताच शेकापचे आमदार जयंत पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल केल्यामुळे मार्च २०१८ मध्ये नगराळे यांचे निलंबन करण्यात आले होते. रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्जवसुली प्रकरणी बँकेचे अध्यक्ष आणि संचालकांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश हेमंत नगराळे यांनी दिले होते. विधानपरिषदेच्या सभापतींच्या परवानगीविना कोणत्याही आमदारावर गुन्हे दाखल करता येत नाहीत. त्यामुळे नगराळेंसह उपायुक्त तुषार दोषी यांना निलंबित करण्याचे निर्देश त्यावेळी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी दिले होते. (Who will be next Maharashtra DGP full profile of IPS Officer Hemant Nagrale)

अश्विनी बिद्रे हत्याप्रकरणात तक्रार
नगराळेंच्या कार्यकाळात पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे बेपत्ता होण्याच्या प्रकरणात त्यांची तक्रार थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत गेली होती. एका बांधकाम व्यावसायिकाला पुरवण्यात आलेले संरक्षण हेमंत नगराळे यांनी काढून घेतले होते. या प्रकरणी बिल्डरने न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. त्या प्रकरणी न्यायालयाने नगराळेंना झापले होते.

महासंचालकपदाच्या शर्यतीत
१) संजय पांडे, पोलीस महासंचालक, होमगार्ड
२) हेमंत नगराळे, पोलीस महासंचालक, विधी आणि तंत्रज्ञान
३) सुरेंद्रकुमार पांडे, पोलीस महासंचालक, तुरुंग विभाग
४) रजनीश सेठ, पोलीस महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

गेल्या काही दिवसांपासून पोलीस महासंचालक सुबोध जैस्वाल केंद्रीय सेवेत जाणार असल्याची चर्चा होती. जैस्वाल यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे विनंती केली होती. त्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने गृह मंत्रालयाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. सुबोध जैस्वाल यांची केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER