
कराड : राज्यात लॉकडाऊन (Lockdown) घ्यायचे की नाही याबाबत सत्ताधारी पक्षात मतभेद आहे. काँग्रेसचे (Congress) नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी वक्तव्य केले आहे. आधी रोजगाराचे पैसे थेट खात्यावर जमा करा, मग लॉकडाऊनचे बघा, असा सल्ला पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्य सरकारला दिला आहे. तसेच चव्हाण यांनी ठाकरे सरकारकडे मागण्याही केल्या आहेत.
चव्हाण यांनी प्रसिद्धीपत्रक काढून या मागण्या केल्या आहेत. राज्यात कोरोना बाधितांची संख्या वेगाने वाढत आहे. २०२०मध्ये आढळून आलेल्या रुग्णसंख्येपेक्षा अधिक रुग्ण रोज सापडत आहेत. विदर्भापासून सुरू झालेली कोरोनाची ही दुसरी लाट मुंबई-पुण्यासह, मराठवाडा आणि राज्याच्या इतर भागात वेगाने पसरत आहे. या पार्श्वभूमीवर पुन्हा लॉकडाउन करावे की नाही, यावर प्रशासन, वैद्यकीय तज्ञ, उद्योग क्षेत्रातील व्यक्ती आणि सामान्य जनता यांमधून वेगवेगळे मते देत आहेत. महाराष्ट्रात उद्योजक असो किंवा वैद्यकीय तज्ञ प्रत्येकजण निडरपणे आपले मत मांडू शकतो, ही आश्वासक बाब असली तरी शासनासमोर मात्र गंभीर पेचप्रसंग आहे, असे चव्हाण यांनी म्हटले आहे.
लॉकडाउनला विरोध
चव्हाण यांनी थेट लॉकडाउनला विरोध केला आहे. त्यांनी बेरोजगार, रोजंदारी मजदूर, हातावर पोट असणारे आणि इतर असंघटीत कामगारांच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधले आहे. आधी या घटकांना मदत करा, मगच लॉकडाउनचा विचार करा, असा सल्लाही चव्हाण यांनी दिला आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या मुद्यावरून सत्ताधाऱ्यांमध्येच मतमतांतरे असल्याचे उघड झाले आहे.
लसीकरणाचे प्रमाण वाढवावे
केंद्र सरकारने गतवर्षी मार्चमध्ये अचानकपणे कोणतेही नियोजन न करता लॉकडाउन घोषित केला होता. याचा फटका देशाच्या अर्थव्यवस्थेला बसला व भारतातील ३ कोटींहून अधिक लोक दारिद्र्य रेषेखाली ढकलले गेले. त्यामुळे जनतेला विश्वासात घेऊन अर्थव्यवस्थेचे कमीत-कमी नुकसान होईल आणि कोरोना संसर्गाची साखळी मोडण्यास सोपे होईल, अशा प्रकारे लॉकडाउनचे नियोजन करणे आवश्यक आहे, असेही चव्हाण म्हणाले.
चव्हाणांच्या मागण्या
- लॉकडाउनची अंमलबजावणी करण्याआधी सर्वसामान्य जनतेला पूर्वसूचना द्या.
- लॉकडाउनचा कालावधी कमीत-कमी ठेवा.
- लॉकडाउन काळात बुडणाऱ्या रोजगाराची भरपाई सरकारने रोख रकमेद्वारे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करावा.
- यासाठी प्रसंगी आमदार व खासदार स्थानिक विकास निधीचा वापर करावा.
- खासगी वाहनातून प्रवासास मुभा द्या
- शेतमाल तसेच इतर औद्योगिक मालाची वाहतूक चालू ठेऊन पुरवठा साखळीवर परिणाम होऊ देऊ नका.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला