टँकरचे पाणी भरण्यासाठी वृद्ध आणि दिव्यांगांना मदत करावी, कर्मचाऱ्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांची अपेक्षा

(प्रतिनिधी)लातूर: लातूर जिल्ह्यात सध्या ४५ टँकरद्वारा पाणीपुरवठा केला जात आहे. वृद्ध आणि दिव्यांगाना टँकरद्वारा येणारे पाणी भरण्यासाठी कसरत करावी लागते. अशा वेळी टंचाईच्या कामात नेमणूक असलेल्या कर्मचाऱ्यांनी त्यांना पाणी भरण्यासाठी मदत करावी, अशी अपेक्षावजा सूचना जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी कर्मचाऱ्यांना केली.

लातूर उपविभागाची टंचाई आढावा बैठक शनिवारी पंचायत समितीच्या सभागृहात घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परीषदेचे सीईओ विपीन इटनकर, उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे यांच्यासह अधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी म्हणाले की पाऊस कमी पडल्यामुळ पाणी टंचाईचे संकट काही गावांमध्ये उदभवले आहे. प्रारंभीच्या काळात विहीर अधिग्रहणांवर टंचाईचे निवारण झाले. गेल्या महिन्यात टँकरची मागणी येऊ लागली. सध्या जिल्ह्यात ४५ टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. कोणत्याही गावातून टँकरची मागणी आली तर तातडीने पाहणी करून त्याचा अहवाल उपविभागीय अधिकाऱ्यांकडे द्यावा. त्यात कुचराई करू नये. टंचाईग्रस्त गावाच्या परीसरात असलेल्या विहीरींवरून टँकरला पाणी उपलब्ध करून द्यावे. जेणेकरून टँकरच्या जास्त फेऱ्या होतील आणि ग्रामस्थांना जास्त पाणी उपलब्ध होईल.

एखाद्या गावात टँकर गेल्यानंतर तेथे एकाचवेळी गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी. अशा ठिकाणी एकटे राहणारे वृद्ध, दिव्यांग नागरीकांची पाणी मिळवताना मोठी अडचण होते. हे लक्षात घेऊन टंचाईच्या कामात असलेल्या कर्मचाऱ्यांनी शक्यतो त्यांना पाणी भरण्यासाठी मदत करावी, त्यांना पुरेसे पाणी मिळेल याची काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी केले. शनिवारी घेतलेल्या बैठकीला लातूर उपविभागातील सर्व गावचे सरपंच, तलाठी, ग्रामसेवक यांची उपस्थिती होती. प्रत्येक गावातील प्रमुखांच्या टंचाईविषयीच्या तक्रारी ऐकून घेऊन त्यावर तोडगा काढण्यात आला.