समानतेच्या लढाईत मदत करा : मेगन रापिनोचे मेस्सी व रोनाल्डोला आवाहन

यंदाच्या सर्वोत्तम फूटबॉलसाठीचा ‘फिफा’ आणि बॕलोन डी’ओर पुरस्कार विजेती अमेरिकेची कर्णधार मेगन रापिनो हिने सुपरस्टार पुरुष फुटबॉलपटू लियोनेल मेस्सी, ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि झाल्टन इब्राहिमोवीच यांना आधूनिक फूटबॉलमधील वंशवाद आणि लैगिक असमानतेविरुध्दच्या आपल्या लढाईत मदत करण्याचे आवाहन केले आहे.

34 वर्षिय रापिनो ही महिला सुधारणावादी असुन अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कट्टर विरोधक आहे. बॕलोन डीओरचे आयोजक फ्रान्स फूटबॉल यांच्याशी बोलताना ती म्हणाली की, मला वाटते की ओरडून सांगावे, ख्रिस्तियानो, लियोनेल, झाल्टन..मला मदत करा! पुरुषांच्या फुटबॉलमध्ये एवढ्या साऱ्या समस्या असताना हे स्टार कशातच लक्ष घालत नाही. त्यांना काही गमावण्याची भीती वाटते का? त्यांना तसे वाटत असेल तर ती भीती निराधार आहे. ते वंशवाद किंवा लैंगिकतेसंदर्भात बोलले तरी त्यांचे नाव फूटबॉल इतिहासातून कुणी मिटवू शकणार आहे का?

आपल्या विलक्षण प्रतिभेने ते आपल्याच कोशात आहेत. वास्तव जीवनाशी त्यांचा फारसा संबंध येत नाही. वयाच्या विशीतच त्यांना सर्व काही मिळालेय असे म्हणतानाच रापीनोने म्हटलेय की, मी दुःखी पण आहे आणि संतापातही आहे. मी त्यांना कसा भेदभाव होतो, पक्षपात केला जातो हे सांगू शकते. पुरुषांवर त्याचा प्रभाव पडत नसला तरी आम्हाला त्यांच्या मदतीची गरज आहे. त्यांनी आमच्या पाठीशी उभे रहायला हवे.

ती म्हणाली की समजा ख्रिस्तियानो रोनाल्डो जर म्हणाला की आम्ही महिला फूटबॉलमध्ये गुंतवणूक करायला पाहिजे. वंशवादी टोमाण्यांविरोधात मेस्सीने मैदान सोडले तरकिती मोठा परिणाम होईल. मेस्सी व इतर स्टार पुरुष खेळाडूंनी असे महत्त्वाचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढे आले पाहिजे अशी अपेक्षा तिने व्यक्त केली.

आपले यंदाचे यश हे एका खेळाडूसोबतच एका कार्यकर्तीचेही आहे असे ती म्हणते.एकीकडे मी चांगली खेळाडू आहे तर दुसरीकडे मैदानाबाहेरच्या माझ्या कामाने लोकांना समजतेय की मी समाजातले प्रश्न सोडविण्यासाठी झटतेय. इतरांनीही आवाज उठवावा यासाठी ही धडपड आहे. ही लढाई लढण्यासाठी माझ्याकडे गुणवत्ता आहे हे सुदैव.मी जे काही बोलते त्याबद्दल मला कुणाची भीती नाही. जगभर परिषदा आणि बैठकांसाठीच्या प्रवासाने मी थकते पण आमच्या जगात सुधारणा घडवून आणायच्या असतील तर मला हे करावे लागणार आहे असे तीने म्हटले आहे.