आता अवयवदानासाठी महामार्गावर होणार ‘हेलिपॅड’; गडकरी यांचे आश्वासन

organ-doner-felicitation-gadkari

नागपूर : रस्ता सुरक्षाकडे विशेष लक्ष दिले जात असून वाढत्या अपघातांवर अंकुश लावण्याकडे भर दिला जात आहे. रस्ता अपघाताचे प्रमाण गेल्या वर्षी ५ टक्क्याने कमी झाले. हे प्रमाण आणखी कमी होईल. मात्र त्यातुलनेत होणाऱ्या अपघातांची संख्या अधिक आहे. अपघातातील जखमींना तातडीने उपचार मिळावेत यासाठी आता प्रत्येक महामार्गावर ‘हेलिपॅड’चा प्रस्ताव आहे. असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.
‘माय मेडिकल मंत्रा’च्या दुसऱ्या वर्धापन दिनाच्यानिमित्तान शनिवारी अवयव दानदात्याच्या कुटुंबाचा सत्कार नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आला. गडकरी यांच्या बंगल्यावर झालेल्या या छोटेखानी कार्यक्रमात ते बोलत होते.

ही बातमी पण वाचा : उपराजधानीत अवयवदानाचा टक्का वाढला

यावेळी ‘माय मेडिकल मंत्रा’च्या वर्धापन दिनानिमित्त नितीन गडकरी यांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
गडकरी म्हणाले, महामार्गावरील ‘हेलिपॅड’ तयार करण्यासाठी टाटा ट्रस्ट व जर्मनीच्या एका कंपनीने मदत करण्यास पुढाकारही घेतला आहे. वाहन परवाना यावर असलेल्या ‘चीप’वरही आता अवयवदानासाठी इच्छुक असणाऱ्या वाहनचालकांची नोंद असणार आहे. अपघातानंतर ‘ब्रेन डेड’ रुग्ण राहिल्यास अवयवदानासाठीही मदत होऊ शकेल, संयम आणि मानवतावादी भूमिकेमुळेचे अवयवदानाचा टक्का या;अलीकडे वाढत आहे, असेही ते म्हणाले.

दरम्यान अवयवदानात उल्लेखनीय कार्य करणारे बॉम्बे हॉस्पिटलच्या नेफ्रालॉजी विभागाचे प्रमुख डॉ. श्रीरंग बिच्छू, ‘झोनल ट्रान्सप्लान्ट को-ऑर्डिनेशन सेंटर’च्या (झेडटीसीसी) अध्यक्ष डॉ. विभावरी दाणी, सचिव डॉ. रवी वानखेडे, झेडटीसीसीच्या कॉर्डिनेटर वीणा वाठोरे, डॉ. हेमंत भालेकर व डॉ. ऋषी अंधारकर यांचा गडकरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अवयव दान करणारे सिमरन राजकुमार खिलनानी, स्वप्निल सुभाष पुरी, रोझीना राणा, राधेश्याम रहागंडाले, मनीषा पशीने, लक्ष्मी गुप्ता, चिंतनवाला व मनोहर दुधपचारे या अवयवदात्यांच्या कुटुंबीयांना गडकरी यांच्या हस्ते मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

प्रास्ताविक ‘माय मेडिकल मंत्रा’चे वरिष्ठ संपादक संतोष आंधळे यांनी केले. संचालन सहायक संपादक मयंक भागवत यांनी केले.

ही बातमी पण वाचा : चार राज्यांच्या निकालाचे असे आहेत वेगवेगळ्या वृत्त वाहिन्यांचे एक्झिट पोल