औंध परिसरात धुव्वाँधार पाऊस

Heavy rains in aundh area

सातारा :- औंधसह परिसरातील अनेक गावांमध्ये झालेल्या धुव्वाँधार पावसामुळे शेतकऱ्यांचे ज्वारी, गहू, हरभरा, ऊस तसेच रब्बी हंगामात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यामुळे हाता-तोंडाशी आलेली पिके जमिनदोस्त झाली आहेत. महसूल व कृषी विभागाने तातडीने या नुकसानीचा पंचनामा करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.

गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात बदल जाणवत होता. सोमवारपासून तर आभाळ काळवंडून गेले. कधीतरी पावसाची भूरभूरही झाल्यासारखे वातावरण राहिले. मंगळवारी सकाळी मात्र वातावरणाचा नूर पूर्णत: पालटून गेला. मंगळवारी पहाटे दिड ते दोनच्या सुमारास झालेल्या धुव्वाँधार पावसामुळे औंध परिसरातील वरुड, गोसाव्याचीवाडी, खबालवाडी, गणेशवाडी, करांडेवाडी, खरशिंगे, पळशी, त्रिमली, वडी, कळंबी, नांदोशी, जायगाव व अन्य गावातील रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा आणि ऊसाच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

ऊसाला तुरे आले आहेत आणि उसतोड मिळत नसल्याने अगोदरच शेतकरी चिंतेत होता. त्यातच अवकाळीच्या दणक्यात ऊस पडल्याने उत्पन्नात घट होणार आहे. तसेच उंदीर, कोल्ह्याचा देखील प्रादुर्भाव वाढणार आहे. रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा पिके देखील जोमात आहेत. सोसाट्याचा वारा आणि पाऊसामुळे हाता-तोंडाशी आलेले ज्वारीचे पिक जमिनदोस्त झाले आहे. पिके भुईसपाट झाल्याने शेतकऱ्यांवर आसमानी संकट कोसळले आहे. औंधसह पुसेसावळी परीसरात नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करुन शासनाने पंचनामे करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER