मुंबईत पुढचे २४ तास अतिवृष्टीचे, विनाकारण घराबाहेर पडू नका – मुख्यमंत्री

Uddhav Thackeray On Mumbai rain

मुंबई : मुंबईसह उपनगरात सुरू असलेल्या वादळी वाऱ्यासह पडत असलेल्या मुसळधार पावसाचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आढावा घेतला. तसंच मुंबई (Mumbai) महापालिकेला सज्ज राहण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत. कालपासून जोरदार पाऊस कोसळत असून आजही पावसाने मुंबईला झोडपले. मुंबईत अवघ्या ५ तासात३०० मिमी पावसाची नोंद करण्यात आली. तुफान पाऊस आणि वेगवान वाऱ्यामुळे मुंबईत अनेक ठिकाणी झाडांची आणि पार्किंगमधील गाड्यांची पडझड झाली. मुंबईतील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सावधानता बाळगावी व अत्यावश्यक कारणांसाठीच घराबाहेर पडावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

मुख्यमंत्र्यांनी पालिका आयुक्तांना महापालिका, पोलीस, रेल्वे, आरोग्य यंत्रणा तसेच एनडीआरएफ यांच्या समन्वयाने परिस्थिती हाताळावी. त्याचप्रमाणे नागरिकांना जिथे गैरसोय होते आहे किंवा खंडित वीज पुरवठा, झाडे पडणे, साचलेले पाणी याविषयी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनाही ठिकठिकाणी सुरू असलेलेल्या मेट्रो कामांच्या ठिकाणी अधिक सजग राहून, कुठलीही दुर्घटना होणार नाही हे पाहण्यास सांगितले आहे.

मुंबईतल्या मुसळधार पावसाचा फटका एसटीला, आजची गणपती वाहतूक बंद

दरम्यान मुंबईप्रमाणेच कोल्हापुरालाही मुसळधार पावसाने झोडपलं आहे. कोल्हापूरच्या परिस्थितीचाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आढावा घेतला. मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांना फोन करून कोल्हापुरातल्या पूरपरिस्थितीची माहिती जाणून घेतली. तसेच पालकमंत्री सतेज पाटील यांना योग्य उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. अतिरिक्त मदत लागल्यास तात्काळ संपर्क करायलाही, मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER