अबब! 140 किलो वजनाचा क्रिकेटपटू

Heaviest cricketar Rahkeem

उंची 6 फूट 6 इंच आणि वजन 140…हे वाचून एकच प्रतिक्रिया उमटेल…अबब! अगडबंब..धिप्पाड! आणि हे शब्द लागू पडतात वेस्ट इंडिजचा फिरकी गोलंदाज राहकीम कॉर्नवॉल याला. मैदानावर इतर खेळाडूंच्या तुलनेत अक्षरशः पहाडासारख्या दिसणाऱ्या या खेळाडूची भारताविरुध्दच्या पहिल्या कसोटीसाठी विंडीज संघात निवड झाली आहे.

26 वर्षांचा हा खेळाडू वेस्ट इंडिजच्या ‘अ’ संघासाठी बरेच सामने खेळला आहे. 2017 मध्ये तो भारतातही आला होता आणि त्यावेळी एका सामन्यात त्याने चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे व विराट कोहलीसारख्या कसलेल्या फलंदाजांना बाद केले होते.

6 फूट 6 इंच उंचीचे ठीक आहे पण 140 किलो वजनाचा खेळाडू क्रिकेट, तेसुध्दा आंतरराष्ट्रीय स्तराचे क्रिकेट कसा काय खेळू शकतो असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे पण राहकीमने हा समज खोटा ठरवलाय.

तो आतापर्यंत थोडथोडके नाही तर 55 प्रथम श्रेणी सामने खेळला आहे. यात त्याच्या नावावर 2224 धावा असुन 260 विकेटही त्याने काढल्या आहेत. गोलंदाजीत त्याची सरासरी 23.60.अशी प्रभावी आहे. लीवर्ड आयलंडच्या संघाचे त्याने नेतृत्वही केले आहे.

त्याची विंडीज कसोटी संघात निवड केल्यावर निवड समितीचे अंतरिम प्रमुख रॉबर्ट हेन्स म्हणाले की बऱ्याच काळापासून राहकीमच्या कामगिरीत सातत्य आहे. त्याने स्वतःला विजेता असल्याचे सिध्द केले आहे. त्यामुळे कसोटी संघातील स्थानाचा तो हक्कदार असल्याचे हेन्स यांनी म्हटले आहे.

आता तो प्रत्यक्षात कसोटी सामना खेळला तर तो सर्वाधिक वजनदार कसोटी क्रिकेटपटू ठरेल. कसोटी सामन्यांसाठी त्याच्या आधीचा सर्वात वजनदार खेळाडू म्हणजे दिवंगत अॉस्ट्रेलियन कर्णधार वॉर्विक आर्मस्ट्राँग होते ज्यांचे वजन 133 किलो होते आणि वन डे सामन्याःसाठी हा विक्रम बर्म्युडाच्या ड्वेन लेव्हरॉकच्या नावावर आहे. लेव्हरॉकचे वजन 127 किलो होते.