महिला क्रिकेटमध्ये हिदर नाईटने गाठला मैलाचा दगड

तिन्ही प्रकारच्या आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये शतक झळकावणारी पहिलीच महिला खेळाडू

Heather Knight

इंग्लंडची कर्णधार हिदर नाईट हिने महिला क्रिकेटचा इतिहासातील मैलाचा दगड बुधवारी गाठला. महिला क्रिकेटमध्ये टी-20, वन डे आणि कसोटी क्रिकेट अशा तिन्ही प्रकारच्या सामन्यांमध्ये शतक झळकावणारी ती पहिलीच महिला क्रिकेटपटू ठरली आहे. ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत कॅनबेरा येथे थायलंडविरुध्द 66 चेंडूत 108 धावांची तडाखेबंद खेळी करताना तिने हा विक्रम केला.

यंदाच्या टी-20 विश्वचषकातील हे पहिलेच शतक ठरले आणि इंग्लंडतर्फेही महिलांच्या टी-20 क्रिकेटमधील हे पहिले शतक ठरले.

योगायोगाची गोष्ट म्हणजे ज्या कॅनबेरा येथील मनुका ओव्हल मैदानावर तिने ही शतकी खेळी केली, याच मैदानावर तिने चौथ्यांदा आपल्या टी-20 मधील सर्वोच्च खेळीचा विक्रम सुधारला आहे. येथे 2017 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुध्द तिने 51धावांची त्यावेळची तिची सर्वोच्च खेळी केली होती. त्यानंतर यंदा याच मैदानावर तिने भारताविरुध्द 67 आणि ऑस्ट्रेलियाविरुध्द 78 धावांच्या खेळी केल्या. आणि आता पहिल्यांदाच तीन आकडी धावा करत नाबाद 108 धावा फळ्यावर लावल्या आहेत.

ही 29 वर्षीय खेळाडू इंग्लंडची दुसऱ्या षटकात 2 बाद 7 अशी अवस्था असताना फलंदाजीला आली आणि नॕट स्कीव्हरसोबत मोठी भागिदारी रचत तिने शेवटी इंग्लंडला 2 बाद 176 अशा सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहचवले.

हिदरने आपले कसोटी शतक 2013 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुध्द आणि वन डे शतक 2017 मध्ये पाकिस्तानविरुध्द झळकावले आहे. त्यानंतर आता टी-20 तही तिने शतक केले आहे आणि योगायोगाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिची ही तीनच शतके आहेत.

हिदर नाईटची आंतरराष्ट्रीय शतके

कसोटी: 157 वि. ऑस्ट्रेलिया 2013
वन डे: 106 वि. पाकिस्तान 2017
टी-20: 108 वि. थायलंड 2020

महिला टी-20 विश्वचषकातील शतके

मेग लॅनिंग- 126
दियांड्रा डॉटीन- 112
हरमनप्रीत कौर- 103
हिदर नाईट- 108

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिन्ही प्रकारच्या सामन्यात शतके

महेला जयवर्धने
दिलशान तिलकरत्ने
ख्रिस मॅक्क्युलम
ब्रेंडन मॅक्क्युलम
शेन वॉटसन
तामिम इकबाल
मार्टिन गुप्तील
सुरेश रैना
डेव्हिड वॉर्नर
फाफ डू प्लेसिस
ग्लेन मॅक्सवेल
रोहित शर्मा
केव्हिन ओब्रायन
अहमद शहजाद
लोकेश राहूल
आणि
हिदर नाईट

सुमीत नागल बनला भारताचा नंबर वन टेनिसपटू