“आरोग्यम् धनसंपदा !”

health is wealth

मानसशास्त्र (Psychology) ! या शास्त्राची व्याप्ती एवढी आहे की जिथे व्यक्तीचा किंवा व्यक्ती समूहाचा संबंध येतो , तेथे मानसशास्त्राचा प्रवेश होतोच होतो. मग ते अगदी औद्योगिक क्षेत्र असो की गुन्ह्यांशी संबंधित क्राईम सायकॉलॉजी! लहानापासून मोठ्यापर्यंत प्रत्येकाचे असे मानसशास्त्र वेगवेगळे असते. दोन व्यक्तींमधील किंवा व्यक्ती समूहा मधील अंतर वैयक्तिक संघर्षाशी संबंधित असणारे ते मानसशास्त्रच! अगदी व्यक्तीचा, स्वतःचा स्वतःशी असणारा संघर्ष असला, तरीही तो सोडवण्यास हातभर मात्र मानसशास्त्राचा लागतो. दररोजच्या समाजातील घडामोडींच्या पाठीमागेही मनोसामाजिकतेचाच भाग असतो. क्रीडा, युद्ध यासारख्या क्षेत्रांसारखी, अनेक इतर क्षेत्रही अशी आहेत की मानसशास्त्रराशी संबंधित नाही अस आपण म्हणू शकत नाही.

तसेच मन आणि शरीर यांचादेखील खूप जवळचा संबंध आहे. आजारी मनामध्ये रोगाचा शिरकाव लवकर होऊ शकतो आणि कुठलाही शारीरिक आजार देखील मन , खंबीर आणि सकारात्मक असेल तर निश्‍चितपणे लवकर बरा होतो. खंबीर मनाचा मोठा सहभाग” रिकवरी प्रोसेसमध्ये” असतो हे आपल्यापैकी प्रत्येकाने अनुभवलेही असते.

आज जागतिक हृदय दिन आहे. त्या अनुषंगाने हृदयाचे स्वास्थ्य आणि त्यात मानसिकतेचा सहभाग हा विचार करण्यासारखा विषय निश्चितच आहे. बीपी, मायग्रेन, टेन्शन हेडेक, पेप्टिक अल्सर या आजारांचा मुळात स्ट्रेस किंवा ताण याच्याशी संबंध असतो. तर काही आजार हे सायकोसोमाटिक म्हटले जातात .यात शरीर व मन दोघांचा समावेश असतो. आणि जी शारीरिक लक्षणे दिसतात ती मानसिक व भावनिक कारणातून उद्भवलेली असतात. यात खूप कॉमन असलेली काही म्हणजे डिप्रेशन, स्ट्रेस, अन्झायटी हे मानसिक आजार मुळात असतात ,पण ते व्यक्त शारीरिक बिघाडातून होतात.या मानसिक रोगांचे योग्य वेळी निदान झाले नाही तर ते( कन्वर्जन हिस्टेरिया) (Conversion hysteria) शारीरिक लक्षणे दाखवतात.
तीव्र ताण ,चिंता, क्रोध ,उच्च रक्तदाब यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो असे वैद्यकशास्त्र सांगते.

म्हणूनच या जागतिक हृदय दिनानिमित्त , शारीरिक व मानसिक आरोग्याचा समतोल कसा राखता येईल ? याचा विचार करण्याची गरज वाटली.

आपण या, दोन समभुज त्रिकोणाचा अभ्यास करून ,ते कसे समरूप किंवा एकरूप आहेत हे सिद्ध करायचा प्रयत्न करूया ! हे करताना मला आठवतंय की नववीच्या वर्गाच्या पुढे भूमितीमध्ये एक सिद्धता नावाचा प्रकार असायचा .त्यात दोन त्रिकोण कसे एकरूप आहे हे सांगताना, त्या बाजू कशा एकरूप आहे हे सांगावे लागायचं .आणि त्या समरुप कशा आहे हेही सिद्ध करावं लागायचं आणि मग शेवटी असायचं “साध्यम सिद्धम !”” Hence proved !”

आपणही तसेच दोन त्रिकोण बघणार आहोत. मानसिक आरोग्य म्हणजे काय ? तर विचार, भावना आणि वर्तन या बाजू जिथे एकसारख्या असतात, जिथे त्यांचा समतोल होतो ,ते मानसिक आरोग्य!

आहार, विहार आणि व्यायाम यांचा समतोल जिथे होतो ,या तिन्ही बाजूस जेव्हा सारख्या ठेवता येतात तेव्हा तिथे येते ते शारीरिक आरोग्य !

मानसिक आरोग्य आणि शारीरिक आरोग्य हे दोन्ही त्रिकोण जेव्हा परस्परांशी एकरूप होतात आणि समरूप ही होतात तेव्हा आपण आरोग्यपूर्ण खऱ्या अर्थाने बनतो. आणि म्हणू शकतो साध्यम सिद्धम ! Hence proved !
कोणताही आजार असो त्यासाठी या दोन्ही त्रिसूत्रीचा समतोल आपल्याला करावाच लागतो. मग हृदयाचे आरोग्य त्याशिवाय चांगले कसे राहणार?

  • आपला आहार ,विहार, व्यायाम यांच्यावर बदलत्या जीवनशैलीचा भयंकर परिणाम होतो आहे. खरंतर मला वाटतं हे घासून गुळगुळीत झालेल वाक्य आहे. पण जबाबदार आहे ती — कळतं पण वळत नाही हि एक स्थिती.
  • दुसरी गोष्ट ,नेमक काय करायचं याबाबत होणाऱ्या गोंधळ! कारण आज प्रत्येक जण आहार विषयक आपल्या नव्या गोष्टी, आपापल्या थीअरीज घेऊन येतो .
  • तिसरी गोष्ट प्रायोरिटी , प्राथमिकता ! आपण इतक्या चुकीच्या गोष्टींना प्राथमिकता देतो बरेचदा! फार गरज नसलेल्या गोष्टी जसे की अती स्वच्छता किंवा अर्थ न कळलेल्या रूढी आणि सवयी ! माझी एक मैत्रीण सांगत होती, की रात्रीचे बारा वाजले तरी मी स्वयंपाकाचा ओटा स्वच्छ धुतल्या शिवाय झोपत नाही. स्वच्छता ही प्रत्येक गृहिणीसाठी न संपणारी गोष्ट आहे. मुख्य म्हणजे ते करुन कुणी आपल्याला बक्षिस देऊन सन्मान करणारं नसतं! त्या गोष्टी महत्त्वाच्या आहेतच, यात शंका नाही ! पण माझ्या तब्येती पेक्षा नाही! म्हणूनच “”व्यायामाला वेळ होईल तेव्हा करण्याचा ऑप्शन म्हणून” ठेवू नका.

निरोगी हृदयासाठी हेल्दी फॅट्स, फायबर्स पालक आतील विटामिन के आणि घातक कोलेस्ट्रॉल कमी करण्याची क्षमता असणारी काही फळं यांचा वापर करावा लागतो. स्वयंपाकातील तेलाचा वापर कमीत कमी करून ,भाजणे, वाफवणे या पद्धतीचा वापर वाढवावा. मिठाचा वापर अगदी नॉमिनल म्हणजे दिवसातून एक चमचा ,साखरेची तर शरीराला गरज नसतेच. आवश्यक ती साखर अन्न आणि फळ यातून मिळत असते. बेकरी प्रॉडक्ट्स ,चीप्स ,रेडी टू इट हे टाळलेलेच बरे!
इतर आहाराची पद्धत ही स्वतःला रुचेल, पचेल ,जमेल कशी वापरावी .फक्त मागे आपण” इकिगाई ” चे नियम बघितल्याप्रमाणे, पोटाचा काही भाग रिकामा राहू द्यावा ,गच्च जेवण करू नये.

सध्याच्या कोविदच्या परिस्थितीत आपली बैठे व जीवनशैली आणखीनच बैठी बनते आहे. त्यामुळे हृदयविकाराचा धोकाही दीड पट वाढला आहे. वैद्यकीय तज्ञांच्या नुसार जास्तीत जास्त भर शारीरिक हालचालींवर हवा .सतत बसून राहिल्याने हार्ट प्रॉब्लेमची जोखीम वाढते .तसेच मधुमेह ,स्ट्रोक, उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्ट्रॉल चा धोका वाढतो ..या सर्व परिस्थितीतून हृदयरोग उद्भवतो.

त्यामुळे वयानुसार कार्डिओवर्कआऊट, विविध प्रकारचे ,वेगवेगळ्या वेळेपर्यंत करावे. त्यासाठी एक्सपर्टचा सल्ला घ्यावा. साठ वर्षानंतरही निरोगी असल्यास व्यायाम थांबवू नका असे तज्ञ सांगतात.

आपली दिनचर्या व्यवस्थित असेल, झोपायला फार उशीर न करणे आणि वेळेवर उठणे ,यामुळे आपल्याला सगळ्या गोष्टींसाठी वेळ मिळतो, त्यामुळे खूप ताण कमी होतो. ताण हा सगळ्याच आजारांचे मूळ आहे! तणावामुळे अँडरेनालाईन सारखे हार्मोन्स तयार होतात. रक्तवाहिन्या अरुंद होतात, रक्तदाब वाढतो. त्यासाठी योगासने ,मंद संगीतावर केलेलं नृत्य ,मनसोक्त गप्पा, मोठ्याने हसणे, त्यासाठी कॉमेडी कार्यक्रम बघणे ,उन्हात चालणे आवश्यक गोष्टी आहेत.

विहारामध्ये दररोजची कमीत कमी सहा ते आठ तास झोप ,जेवण ही रात्री फार उशिरा न करता जेवल्यानंतर दोन तास झोपण्यासाठी राहतील अशा पद्धतीने घेणे, अशी काही प्रमाणात तरी नेमस्त जीवनशैली खूप मोठं काम करते. कारण बरेचदा ना आजकाल काम असो , नसो उशिरापर्यंत जागरण किंवा सकाळी उशिरा उठणे ही एक पद्धत होऊन गेलेली आहे आणि तिचं रूपांतर सवयीत झालेले आहे. त्यामुळे ते बदलणेही अवघड वाटू लागतं.

पण जर आपल्याला आहार ,विहार, व्यायाम हा त्रिकोण समभूज करायचा असेल तर ते करायलाच लागेल. उद्याला आपण बघू या विचार, भावना आणि वर्तन किंवा कृती या त्रिकोणाला समभुज कसा करायचा ते ! आणि हे दोन्ही ही त्रिकोण एकरूप आणि समरूप होऊन जो समतोल निर्माण होईल ते असेल आरोग्य ! संपत्ती !!. आरोग्यम् धनसंपदा !!!

मानसी गिरीश फडके.
समुपदेशक व सायकोथेरपिस्ट .

ही बातमी पण वाचा : “आई मला खेळायला जायचय,…….!”

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER