“आरोग्यम् धनसंपदा !” ( भाग 2)

Health

हृदय दिनानिमित्त ,,ह्या मागच्या लेखात आपण आरोग्यासाठीचा एक समभुज त्रिकोण बनवला होता. प्रत्यक्षात तुम्हाला करायला तो जमला असणार ,त्यासाठी प्रयत्नही सुरु झाले असतील !तो समभुज त्रिकोण होता ,आहार ,विहार आणि व्यायाम यासंबंधीचा ! म्हणजे ज्यामध्ये बायोलॉजिकल फॅक्टर्स होते. आज आपण बघणार आहोत ,मानसिक आरोग्य ज्याच्या समतोलातून बनते, त्या विचार, भावना व वर्तन या त्रयीविषयी !

एखादी घटना ,प्रसंग घडतो .तेव्हा तुम्हाला काय वाटतं ,की अमुक एक घटना घडली ,त्यामुळे मला राग आला ,आणि मी अमुक एक कृती केली. उदाहरणार्थ एखादे वयाने अगदी लहान पोर ,आले आणि त्याने येऊन मला अद्वातद्वा बोललं शिव्या दिल्या. या घटनेमुळे मला राग आला. मी त्याला एक चापट दिली. म्हणजे त्याच्या “वाईट बोलणे “या घटनेने मला राग आला व मी चापट दिली.

पण तेच पोर, आपल्यासमोर येऊन कुठल्यातरी ,आपल्याला न कळणाऱ्या भाषेत, तेलगू ,मल्याळम जर्मन मध्ये तेच अद्वातद्वा शब्द बोलले, तर काय कराल तुम्ही ? काय होईल तुमची प्रतिक्रिया ? थोडंसं हसू येईल ,चेहरा प्रश्नार्थक होईल, काय म्हणतो काय माहित ,काही कळत नाही .असं म्हणून तो विषय आपण तिथेच थांबवू !

वाईट शब्द, अद्वातद्वा बोलणे तेच ! पण आता तुमची प्रतिक्रिया वेगळी झाली, ती का ? म्हणजे घटना तीच, कृती वर्तन मात्र वेगळे . असं का? तर मला त्याचा अर्थ कळला नाही ,त्यामुळे मला राग येण्याचा प्रश्नच नव्हता .याआधी ज्यावेळी त्या चिटुकल्या मुलाने आपल्याला चुकीचं बोललं ते बोलल्याने राग येण्यामागे काय कारण होतं?

तर त्याचा अर्थ कळल्यामुळे त्याबद्दल माझ्या मनात आलेले विचार !

त्याने वाईट-साईट बोलून शिव्या दिल्या .अर्थ कळला. तेव्हा माझ्या मनात पटकन विचार सुरू होतात.” अरे याला काय कळतंय का! हा कोणाशी बोलतोय ? समजतो कोण स्वतःला ?माझा एवढा अपमान करताना काही कसं वाटत नाही ? याला काय संस्कार केले याच्या पालकांनी?

आणि आता बघा ,जेव्हा तीच घटना तेलगूत होते ,आपल्याला अर्थ कळलेला नसतो. तेव्हा विचार येतात ,कोण मुलगा आहे काय की ? कुठल्या भाषेत बडबडतोय ?विचित्रच बोलतोय काहीतरी? आणि त्याचे ‘हेल ‘पण किती वेगळेच आहेत! म्हणजे आता एक प्रकारची ,उत्सुकता किंवा मनोरंजन या दृष्टीने आपण ते बघतो.

हे उदाहरण देण्यामागे कारण एवढेच की असं लक्षात येतं, कुठलीही घटना घडल्यावर आपल्या मनात डायरेक्ट भावना उत्पन्न होऊन आपल्याकडून कृती किंवा वर्तन घडत नाही ,तर त्या एवढ्याशा वेळामध्ये ती विशिष्ट भावना निर्माण करणारे त्यासंबंधीचे विचार हे त्या वर्तना मागे किंवा कृती मागे कारणीभूत असतात. एखादी घटना, होणारे आपले विचार ,त्यानुरूप उत्पन्न होणारी भावना आणि मग त्याचं कृतीमध्ये वर्तनामध्ये रूपांतर ही प्रक्रिया क्षणभरात घडून जाते. आणि म्हणूनच आपण त्यांना” रिएक्शन किंवा प्रतिक्रिया” असे म्हणतो.

मानसशास्त्र सांगत की ,आपले वर्तन जर योग्य घडायचे असेल तर प्रतिक्रिया ( रिअॅक्शन )नव्हे तर (रिस्पॉन्स )प्रतिसाद द्यायला हवा. कसा देता येईल हा रिस्पॉन्स? आतापर्यंतच्या विवेचनाने लक्षात आले का? योग्य प्रतिसाद द्यायचा असेल तर कशावर काम करावे लागेल ? आपल्या कृती व त्यामागील भावना ज्यामुळे निर्माण झाल्या ,त्या विचारांकडे डोळसपणे बघायला लागेल. तसं बघितलं तर येणाऱ्या भावना ह्या अशा नकारात्मक न येता हळूहळू सकारात्मक येतील आपोआपच योग्य कृती ,वर्तन घडेल .

या विचारांवर काम कसं करायचं त्यासाठी “विवेकनिष्ठ विचार प्रणाली” (REBT) ही मानसशास्त्रात सांगितली आहे. आणि त्याचा प्रत्यक्ष व्यवहारामध्ये खूप उपयोग होतो असा अनुभवही आहे.

फ्रेंड्स ! आपण वेगवेगळ्या वेळी नॉर्मल आणि अँ ब नॉर्मल या अवस्थांचा अनुभव खरतर घेत असतो.

माझ्या सर्व भावना विचारांवर माझे कायमस्वरूपी नियंत्रण म्हणजे मी नॉर्मल ! पण खरंच ही अवस्था कायमस्वरूपी असते ? परिस्थिती तर सतत बदलत असते.

आणि abnormal म्हणजे ताणाची परिस्थिती, आपापसातील ,वादळ अशामुळे आपण नॉर्मल पासून दूर जातोच की !
म्हणजेच नॉर्मल आणि अब नॉर्मल ही सीमारेषा अत्यंत धूसर आहे. गतिशील आहे .कधीही तळ्यात-मळ्यात खेळू शकतो अशी आहे. एकूणच संपूर्ण आपला अनुभव म्हणजे नॉर्मल ॲप नॉर्मल गाठोडं आहे ! आणि याला कुणीच अपवाद नाही .अगदी सायकॉलॉजिस्ट ,मानसरोगतज्ञ ,उद्योगपती, विद्यार्थी, गृहिणी सगळ्यांसाठी नियम सारखा!

म्हणूनच पहिली गोष्ट म्हणजे काय नॉर्मल आणि काय नॉर्मल नाही याची खंत करायची नाही. राग, भीती ,विषाद याने लाज वाटायची तर त्याहून गरज नाही. अहो! अर्जुनासारखा शूर योद्धा त्याला ते जमले नाही. त्याचीही अवस्था अशीच झाली कि ज्याला कृष्णाच्या समुपदेशनाची गरज पडली होती. मग आम्हा पामराची काय कथा ?

“समोरील या व्यक्तीच्या बोलल्याने मी hurt झाले! ” (विशिष्ट घटना जबाबदार) “नेहमी हे सगळं माझ्याच बाबतीत घडत! ” “आज अमुक या व्यक्तीचा फोन आला होता ,नेहमी या व्यक्तीचा फोन आला किंवा भेट झाली की माझा मूडच जातो!  (समोरील व्यक्ती जबाबदार.)

आपल्या सारखी सगळीच लोकं कुठलीही घटना घडली, किंवा कुठल्याही त्रासदायक भावनेने ग्रासलं तर माझ्या वाईट वाटण्याला ,राग येण्याला ,दुःखाला “एखादी घटना वा व्यक्ती किंवा परिस्थिती च जबाबदार आहे,” म्हणून जाहीर करून टाकतात !कारण त्याने “माझी” जबाबदारी संपते.

“शी ! बोअर होतंय ! हल्ली ना ,अजिबात व्यायाम करावासा वाटत नाही. काय चाललंय दिवसभर उकाडा आणि संध्याकाळ झाली की पाऊस. कंटाळ आणलाय पावसाने! “(मला व्यायामाचा कंटाळा येतो त्याचे खापर पावसावर म्हणजे- परिस्थितीवर)

“हट बटे यार ! कधी संपणार हा कोरोना ! आमचे कॉलेज लाईफ एन्जॉय करायचे एक वर्ष तर असेच चालले ! “(खरेय हे ! पण कुणाला कशाचे तर कुणाला कशाचे दुःख ,ती गोष्ट वेगळी !) आणि आता हे बघा,” आज भाजी छान झाली आहे !”असं कुणी म्हटलं की,” हो ! मी मीच बाईला ट्रेन केलंय, छान तयार झाली आहे आता ती! सगळा स्वयंपाक छान जमतो!” म्हणजे वाईट भावना व चुकीच्या भावना ,याचे खापर दुसरा व्यक्ती, परिस्थिती आणि घटनेवर फोडायचे. आणि स्वतःला सुखदायक, खूष करणाऱ्या ,भावनांचे कर्तुत्व फक्त स्वतःकडे ओढायचे. ही मानवी प्रवृत्ती आहे .ती नकळतपणे व्यक्ती कमी-अधिक प्रमाणात वापरत राहते.

खरेतर ज्या गोष्टी माझ्या हातातल्या आहे त्या मिळवणे ,आणि ज्या माझ्या शक्तीच्या कुवतीच्या बाहेर आहेत ,त्यावर उगीच वेळ किंवा शक्ती न दवडता त्या सहजतेने स्वीकारणे .हे धोरण ठेवले तर प्रत्येक मनुष्य स्वतःमध्ये सुधारणा घडवून सुखी बनू शकतो!

“स्वभावाला औषध नाही”,” कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच “हे चॅलेंज मात्र आपण स्वीकारू या! कारण स्वतः बदल करणं शक्य आहे .ते विवेकी विचार प्रणालीच्या मदतीने ! अर्थात REBT मुळे!! कसे ? बघूया उद्याच्या भागांमध्ये !!!

मानसी गिरीश फडके.
समुपदेशक व साययकोथेरपिस्ट .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER