
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या दरबारी आजवर अनेक संस्था, अनेक मंंडळांनी आपल्या मागण्यांसाठी भेटी दिल्या आहेत. आता विश्व हिंदू परिषदेचे (Vishva Hindu Parishad) नेतेही राज ठाकरे यांना भेटणार आहेत.
राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा आयोजित केला आहे. मनसेच्या या घोषणेनंतर राज यांच्या अयोध्या दौ-यापूर्वीच विश्व हिंदू परिषदेचे नेते राज यांची भेट घेणार आहेत.
राम मंदिराच्या निधी संकलनाचा कार्यक्रम सध्या विश्व हिंदू परिषद आणि भाजप संघटना राज्यात राबवत आहेत. तसेच वेगवेगळ्या संस्था, ट्रस्ट यांच्या माध्यमातून दानशूर लोकदेखील मंदिराच्या उभारणीसाठी लाखो रुपयांचा निधी देत आहेत. या मंदिराच्या उभारणीच्या मुद्द्यावर विश्व हिंदू परिषदेमधील प्रांत संघटन मंत्री अनिरुद्ध देशपांडे, सहमंत्री श्रीराज नायर हे सोमवारी १ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता राज यांच्या ‘कृष्णकुंज’ निवासस्थानी भेट घेणार आहेत, अशी माहिती विश्व हिंदू परिषदेचे प्रचार-प्रसार विभागाचे कोकण प्रांत प्रशांत पळ यांनी दिली.
तथापि, प्रभू रामचंद्र मंदिराच्या निधी संकलनाचा कार्यक्रम परिषदेने हाती घेतला असून त्या पार्श्वभूमीवर ही भेट असल्याचे समजते.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला