त्यांना वाटलं की, संधी आली अशोक चव्हाणला ठोका…! पण जनता माझ्या पाठीशी

Ashok Chavan

नांदेड : भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याच्या 25व्या गळीत हंगामाचा आज शुभारंभ झाला. मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) आणि राज्यमंत्री विश्वजित कदम (Viswajit Kadam) यांच्या प्रमुख उपस्थितीत हा गाळप समारंभ पार पडला. या कार्यक्रमात बोलताना अशोक चव्हाण यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे एफआरपीचे पैसे थकले, पण यावर्षी गाळप सुरू होण्याआधी शेतकऱ्यांचे 33 कोटी रुपये आम्ही दिले. विरोधक बोंबलले पण जनता माझ्या पाठीशी राहिली, अशा शब्दांत सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाणविरोधकांवर बरसले.

अशोक चव्हाण म्हणाले, गेल्या 24 वर्षांपासून साखर कारखान्याच्या विरोधकांना बोलायला संधी मिळाली नाही, मात्र आता त्यांना वाटलं की, संधी आली अशोक चव्हाणला ठोका…! पण जनता माझ्या पाठीशी आहे. तुम्ही कितीही बोंबलत राहा, अशा शब्दांत अशोक चव्हाण यांनी विरोधकांचा समाचार घेतला. चव्हाण यांच्या कारखान्याकडे एफआरपीचे पैसे थकल्याने विरोधकांनी वेळोवेळी त्यांच्यावर टीका केली होती. आज गाळपा शुभारंभ प्रसंगी चव्हाण यांनी विरोधकांना शेलक्या भाषेत उत्तर दिलं आहे. आपल्या सुसंस्कृत शैलीत कायम बोलणारे चव्हाण आज विरोधकांवर चांगलेच घसरले, हे पाहून अनेक जण अवाक् झाले.

भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना हा स्वर्गीय शंकरराव चव्हाण यांनी सहकारी तत्त्वावर स्थापन केलेला कारखाना आहे, ज्याच्या गाळप हंगामाला यंदा 25वे वर्ष पूर्ण झाले. या कारखान्यामुळे अशोक चव्हाण यांच्या भोकर मतदारसंघात आर्थिक सुबकता आलेली आहे. त्यापाठोपाठ उमरी तालुक्यातील वाघलवाडा इथे देखील त्यांचा एक सहकारी साखर कारखाना होता, जो त्यांनी आता उद्योजक मारोती कवळे गुरुजी यांना विकलाय. त्यापाठोपाठ मराठवाड्यातील सर्वात जुना असा कारखाना असलेल्या डोंगरकडा इथला साखर कारखाना भाऊराव चव्हाण साखर कारखान्याने विकत घेतला, ज्याचे यंदा गाळप अद्याप होणे बाकी आहे.

हदगाव इथला हुतात्मा जयवंतराव सहकारी साखर कारखाना देखील भाऊराव चव्हाण साखर कारखान्याने विकत घेतला, मात्र यंदा खासगी उद्योजकाला तो विकून टाकला. हदगाव आणि वाघलवाडा इथले दोन्ही साखर कारखाने विकल्यामुळे शेतकऱ्यांत संभ्रम निर्माण झाला होता. मात्र विकलेले हे दोन्ही साखर कारखाने नीट चालतील याची ग्वाही स्वतः मंत्री चव्हाण यांनी आजच्या कार्यक्रमात दिली. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी निश्चिंत झाले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER