ते आपले आयुष्य ‘पुरेपूर’ जगले- जेन जोन्स यांची डीन जोन्स यांना श्रध्दांजली

Dean Jones

डीन जोन्स ( Dean Jones) हे ‘आयुष्य’ जसे जगायला हवे तसेच आपले आयुष्य जगले, सळसळते, उत्साहपूर्ण, चैतन्यदायी! अशा शब्दात त्यांच्या पत्नी जेन जोन्स (Jane jones) यांनी वन डे क्रिकेटचे (one day cricket) आपल्या काळातील आक्रमक व मनोरंजक फलंदाज राहिलेले डीन जोन्स यांना श्रध्दांजली (tribute) वाहिली आहे. जोन्स यांचे दोन दिवसांपूर्वी मुंबईत हृदयविकाराने निधन झाले.

क्रिकेट कारकिर्दीनंतर एक उत्तम समालोचक व नेहमी मदतीसाठी पुढे राहणारे प्रशिक्षक म्हणून त्यांनी लौकिक कमावला होता आणि म्हणूनच ‘प्रोफेसर’ म्हणून ते क्रिकेट वर्तुळात ओळखले जात होते.

जेन आणि त्यांचे 34 वर्षांचे वैवाहिक आयुष्य राहिले. या दाम्पत्याला दोन मुली आहेत. वयाच्या 59 व्या वर्षी डीन यांचे अचानक निधन झाल्यावर जगभरातुन त्यांच्याप्रती ज्या शोकसंवेदना व्यक्त केल्या गेल्या त्याबद्दल जेन यांनी आभार मानले आहेत. विशेष करुन जलद गोलंदाज ब्रेट ली यांना त्यांनी विशेष धन्यवाद दिले आहेत कारण शेवटच्या क्षणांमध्ये ब्रेट लीनेच त्यांचा जीव वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले होते.

जेन यांनी म्हटले आहे की, डीन यांचे भारतात निधन झाल्याच्या वृत्ताने आम्हाला कल्पनेपलीकडे दुःख झाले आहे आणि मी व माझ्या मुली अक्षरशः हादरुन गेल्या आहोत. माझा देखणा पती, माझे प्रेम डीन ह्यांनी आयुष्याचा पुरेपूर आनंद घेतला आणि ते निघून गेल्याने आमच्या जगण्यात कधीही न भरुन निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. मात्र कितीतरी संस्मरणीय आठवणी ते आमच्यासाठी मागे ठेवून गेले आहेत. त्या आठवणी सदैव आमच्यासोबत राहतील.

या कठीण समयी आमचे दुःख ताजे असताना आम्हाला जगभरातून आलेल्या सहकार्याच्या आणि संवेदनांच्या संदेशांनी आम्हाला फार मोठा दिलासा मिळाला आहे. डीनला भारतीय उपखंडातील देशांबद्दल विशेष प्रेम होते. त्यामुळे भारत, पाकिस्तान, श्रीलंका व अफगणिस्तानमधून ज्या मोठ्या प्रमाणात संदेश आले ते पाहता मन भरुन आले.

डीन जोन्स आणि जेन हे 1986 मध्ये विवाहबध्द झाले होते आणि ते व त्यांच्या दोन मुली असे हे चौकोनी कुटुंब मेलबोर्नपासून तासाभराच्या अंतरावर असलेल्या रोमसी शहरात गेल्या 25 वर्षांपासून राहात आहेत.

जेन्स यांनी पुढे म्हटलेय की दुःखाच्या या घडीमध्ये कृपया आमच्या खासगी आयुष्याचे खासगीपण कायम राहू द्या. डीन यांच्या अंत्यसंस्कार व शोकसभेबद्दल योग्यवेळी कळविण्यात येईलच. त्यावेळी प्रत्येकाला त्यांना सन्मानपूर्वक निरोप देण्याची संधी मिळेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER