अन्यायाविरोधात निरंतर संघर्षाची प्रेरणा त्यांच्याकडूनच मिळाली- राज ठाकरे

Raj Thackeray

मुंबई :- के.सी. ठाकरे अर्थात प्रबोधनकार ठाकरे यांची आज पुण्यतिथी. यानिमित्तानं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ट्विट करत प्रबोधकारांच्या स्मृतींना उजाळा देत अभिवादन केलं आहे. राजकीय नेते, सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांकडून प्रबोधनकार ठाकरे यांच्या स्मृतींना उजाळा देत अभिवादन केलं जात आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही ट्विट करून प्रबोधनकारांच्या आठवणी सांगितल्या.

“जिथे जिथे अन्याय दिसेल तिथे तिथे तुमची लाथ बसलीच पाहिजे, ही शिकवण आमचे आजोबा प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांची. ‘उक्ती आणि कृती’ यांचा उत्तम मेळ कसा असावा, हे आजोबांच्या आयुष्याकडे बघितलं की लक्षात येतं. लोकहितवादी, आगरकर आणि महात्मा ज्योतीबा फुलेंच्या समाजसुधारणांना पुढे नेणारे ते निडर समाजसुधारक होते. पाखंडी मानसिकता, अनिष्ट रूढी, जातिव्यवस्था ह्या विरोधात दोन हात करण्यासाठी त्यांनी वक्तृत्व, लेखन आणि प्रत्यक्ष कृती ही शस्त्रं वापरली. ” असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

ही बातमी पण वाचा : मनसेचा हुकमी एक्का मैदानात; राज ठाकरे पदवीधर निवडणुकीच्या प्रचारात?

“पुढे वय झालेलं असतानादेखील त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सक्रिय सहभाग घेतला. या चळवळीतील विविध पक्षांना, विचारधारांना एकत्र बांधून ठेवणं निव्वळ त्यांनाच शक्य होतं. कुठल्याही चुकीच्या गोष्टीच्या विरोधात संघर्ष करताना त्यांचं वय कधीच आड आलं नाही आणि त्याच ताकदीने ते आसूड ओढत राहिले. निरंतर संघर्षाची प्रेरणा त्यांच्याकडूनच मिळाली आहे. आजोबांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. ” अशा शब्दांत राज ठाकरे यांनी प्रबोधनकारांना अभिवादन केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER