ओठात एक अन् पोटात एक असलेल्यांना त्याने दिला ‘प्रसाद ‘

Parasad Oak

तोंडावर कौतुक करायचं, गोड बोलायचं आणि पाठ फिरली की त्याच व्यक्तीबद्दल निंदानालस्ती करायची अशी माणसं आपल्या आयुष्यात अनेकदा भेटतात. निंदकाचे घर असावे शेजारी असं म्हटलं जातं. आयुष्यात फक्त कौतुक करणारी माणसं असावीत असं नाही तर आपलं जिथे चुकत असेल ते सांगणारीही माणसं आपल्याकडे असली पाहिजेत; पण यामध्ये दुटप्पीपणा असेल तर याचा त्रास अधिक होत असतो. याच गोष्टीवरून सध्या अभिनेता-दिग्दर्शक प्रसाद सोशल मीडियावर (Social Media) व्यक्त झाला आहे. त्याच्या विधानावरून हे स्पष्ट दिसत आहे की, त्यालाही तोंडावर गोड बोलणाऱ्या आणि पाठ फिरली की निंदा करणाऱ्या लोकांचा अनुभव आल्याचं त्याच्या या पोस्टवरून दिसून येत आहे. विशेष म्हणजे ‘देवास काळजी’ असे लिहिलेला लाल रंगाचा टी-शर्ट घातलेला फोटो पोस्ट करत ओठात एक आणि पोटात एक असलेल्या लोकांना चपखल उत्तर देत चांगलाच ‘प्रसाद’ दिला आहे.

प्रसाद ओक (Prasad Oak) हा अभिनेता म्हणून प्रसिद्ध आहेच; पण त्यापलीकडे तो दिग्दर्शक तसेच लेखक आणि हजरजबाबी व्यक्ती म्हणून इंडस्ट्रीमध्ये ओळखला जातो. कोणत्याही सामाजिक विषयावर त्याचे सोशल मीडियावर भाष्य काय असेल याकडे त्याच्या चाहत्यांचेच नव्हे तर प्रत्येकाचे लक्ष लागून राहिलेले असते. खरे तर प्रसादने अभिनयापासून मनोरंजन इंडस्ट्रीमध्ये प्रवेश केला; पण सध्या तो दिग्दर्शनात रमला आहे. लवकरच त्याचा ‘पिकासो’ हा सिनेमा ओटीटी पडद्यावर येणार आहे आणि याच निमित्ताने त्याला तोंडावर गोड बोलून माघारी निंदानालस्ती करणाऱ्या लोकांचा अनुभव आल्यामुळेच त्याने व्यक्त होण्यासाठी सोशल मीडियाचा वापर केला.

प्रसादने त्याच्या इंस्टाग्राम पेजवर (Instagram Page) ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांने असे लिहिले आहे की, तोंडावर गोड गोड बोलून पाठ फिरली की आपल्याविषयी चुकीचे बोलणारे किंवा निंदानालस्ती करणारे लोक तुमच्यासाठी प्रचंड धोकादायक असतात. एक वेळ तुमच्या तोंडावर तुमच्या चुका सांगणाऱ्या लोकांना तुम्ही जवळ ठेवा, पण पाठ फिरताच तुमच्याविषयी गॉसिप करणाऱ्या लोकांना जितके तुम्ही तुमच्यापासून दूर ठेवाल तितके तुम्ही यशाकडे लवकर पोहचाल. सध्या माझ्या आसपास अशाच लोकांची गर्दी झाली आहे आणि त्यांनाही मी दूर ठेवत आहे. माझा आत्मविश्वास ढळावा म्हणून ही मंडळी कार्यरत झाली आहेत; पण माझा माझ्या कामावर आणि माझ्या क्षमतेवर पूर्ण विश्वास असल्यामुळे मी अशा तोंडावर गोड बोलण्याने हुरळून जाणार नाही किंवा माझ्या माघारी बोलल्याने खचूनही जाणार नाही. जोपर्यंत माझं काम आवडणाऱ्या रसिकांचं माझ्यावर प्रेम आहे, कामावर माझी निष्ठा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देवाला माझी काळजी आहे तोपर्यंत माझ्या वाटेत येणाऱ्या दुटप्पी लोकांना माझ्या लेखी काहीच महत्त्व नाही.

आता जितकी चर्चा प्रसादच्या या पोस्टची झाली तितकीच चर्चा प्रसादने ही पोस्ट नेमकी कुणासाठी लिहिली याचीही झाली आहे. पोस्टमध्ये तरी प्रसादनं कुणाचं नाव अधोरेखित होईल असं काहीच सांगितलं नाही; पण त्याच्या बोलण्यात एक दुखरा भाग नक्कीच आहे. ‘बंदिनी’ या मालिकेपासून प्रसादने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. सध्या दिग्दर्शक म्हणून नावारूपाला आलेल्या प्रसादने ‘प्रेमाची गोष्ट’ या सिनेमात सहायक दिग्दर्शक म्हणून कामगिरी बजावली. ‘दोघात तिसरा आता सगळं विसरा’ आणि ‘जोशी की कांबळे’ या दोन्ही सिनेमात प्रसादच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं. ‘अवघाचि संसार’ या मालिकेत ग्रे शेड असलेला नायक प्रसादने उत्तम रंगवला होता.

सारेगमपच्या सेलिब्रिटी पर्वाचा विजेता म्हणून प्रसादच्या नावावर शिक्कामोर्तब झालं. वाडा चिरेबंदी, या घर आपलंच आहे, लहानपण देगा देवा, नांदी, मग्न तळ्याकाठी या नाटकांतील प्रसादच्या भूमिका आजही त्याच्या चाहत्यांच्या लक्षात आहेत. … आणि डॉक्टर काशिनाथ घाणेकर या बहुचर्चित सिनेमात नटवर्य प्रभाकर पणशीकर यांची भूमिका प्रसादने वठवली होती. ‘कच्चा लिंबू’ आणि ‘हिरकणी’ या प्रसादने दिग्दर्शित केलेल्या दोन्ही सिनेमांवर पुरस्कारांचा वर्षाव झाला आहे. अभिनय, लेखन, दिग्दर्शन आणि निवेदन या चार क्षेत्रांत सहज सुंदर मुशाफिरी करणाऱ्या प्रसाद ओकचा प्रवास निश्चितच कौतुकास्पद आहे.

ही बातमी पण वाचा : अद्वैतला वाटते या गोष्टीची भीती

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER