‘तुम्हाला मुख्यमंत्रीपद कळलेलं नाही, कोणाकडून तरी शिकून घ्या’, राणेंची मुख्यमंत्र्यांवर टीका

Maharashtra Today

सिंधुदुर्ग : तौक्ते वादळामुळे(Tauktae Cyclone) कोकणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. तसेच चिपी विमानतळावर आढावा बैठक घेत फळबागा, झाडे, महावितरण, घरे अशा नुकसानग्रस्तांचे पंचनामे करुन तात्काळ अहवाल सादर करावा अशी सूचना केली. तसेच पत्रकारांशी बोलताना पंचनामे होताच मदत जाहीर करु अशी माहितीही दिली. मुख्यमंत्र्याच्या या दौऱ्यावरुन भाजपचे नेते आणि माजी खासदार निलेश राणे(Nilesh Rane) निशाणा साधला.

कोकणात एवढे नुकसान झाले असतानाही मुख्यमंत्र्यांनी केवळ तीन तासात आपला दौरा आटोपता घेतला. या तीन तासात कुठलीही पाहणी केली नाही. केवळ आढावा बैठक घेऊन पंचनामे करण्याचे अधिकाऱ्यांना आदेश दिले. खरं पाहता उद्धव ठाकरेंना आतापर्यंत मुख्यमंत्रीपद काय असतं, कस वागावं लागत, कुठले निर्णय घ्यावे लागतात हेच कळलेले नाही. मुख्यमंत्र्यांना हे सगळं जमत नसेल तर कोणाकडून शिकून घ्यावे, असा टोला राणे यांनी लगावला.

मुख्यमंत्री आले, वरवर पाहणी केली आणि आढावा घेतला. अधिकाऱ्यांनाही कळले नाही की मुख्यमंत्र्यांचा हा दौरा नेमका कशासाठी होता. तुम्हाला आढावाच घ्यायचा होता तर तो आपल्या सवयीप्रमाणे घरात बसूनही घेता आला असता. तुम्ही कशाला आलात, तुम्हाला कोणी बोलावलं? असा खोचक सवाल केला. तुम्ही आलाच होता तर निदान मदत तरी जाहीर केली असती. आम्हालाही बोलण्याची संधी मिळाली नसती. मात्र अशा मुख्यमंत्र्यांची आम्हाला लाज वाटते, असेही निलेश राणे म्हणाले.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button