नीट आणि जेईई परीक्षांना स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाचा नकार

Nagpur HC

नागपूर : विदर्भातील पूरस्थितीमुळे नीट आणि जेईई परीक्षांना स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला. मात्र, पूरस्थितीमुळे विदर्भातील ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर पोहचता येणार नाही, ते फेरपरीक्षा घेण्यासाठी राष्ट्रीय परीक्षा मंडळाशी संपर्क करू शकतात, असा निर्देश न्यायालयाने दिला.

नीट आणि जेईईच्या प्रवेश परीक्षा सुरू होण्याच्या काही तास आधी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने, विदर्भात अचानक निर्माण पुराच्या स्थितीमुळे या परीक्षा स्थगित करता येतील का ? असे केंद्र आणि राज्य सरकारला  विचारले होते. सततच्या पावसामुळे विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांशिवाय अन्यत्रही काही भागांत  मोठे पूर आले होते. यामुळे आज मंगळवारी झालेल्या नीट आणि जेईईच्या परीक्षांसाठी हजारो विध्यार्थी परीक्षा केंद्रांवर पोहचू शकले नाहीत. भंडारा जिल्ह्यातील पवनी येथील नितेश बावनकर यांनी  याबाबत उच्च न्यायालयाला लिहिलेले पत्र न्यायमूर्ती रवी देशपांडे आणि न्यायमूर्ती पुष्पा गणेडीवाला यांच्या खंडपीठाने स्वतः जनहित याचिका म्हणून सोमवारी सायंकाळी दाखल करून घेतले.

बावनकर यांनी पत्रात विदर्भातील पूरस्थितीमुळे निर्माण झालेल्या स्थितीची माहिती देऊन, यामुळे अनेक विद्यार्थी परीक्षा केंद्रांवर पोहचू शकणार नाहीत हे लक्षात आणून दिले होते. केंद्र व राज्य सरकारचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने म्हटले की – राष्ट्रीय परीक्षा मंडळ स्थिती पाहून याबाबतचा निर्णय घेईल. या परीक्षा देशभरात आज सकाळी ९ वाजता सुरू झाल्यात. खंडपीठाने म्हटले आहे की – अनेक जिल्ह्यांत पुरामुळे स्थिती गंभीर आहे.

यात विद्यार्थ्यांचा काही दोष नाही; त्यांचे नुकसान व्हायला नको. परीक्षेला मुकलेला  कोणताही विद्यार्थी याबाबत न्याय मागण्यासाठी परीक्षा मंडळाकडे त्यांच्या केंद्र संयोजकांमार्फत अर्ज करू शकेल. परीक्षा मंडळ संबंधित जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क करून त्याबाबत १५ दिवसांत निर्णय घेईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER