मंतरलेले गंडे-दोरे, ताविज आणि दैवी सिद्धीची ‘यंत्रे’ विकण्यास बंदी प्रचार व विक्री बंद करण्याचा हायकोर्टाचा आदेश

Aurangabad HC

औरंगाबाद : माणसांच्या समस्यांचे हमखास निवारण करण्याची दैवी आणि चमत्कारी शक्ती असल्याचा दावा करून मंतरलेले गंडे-दोरे, ताबिज आणि ‘हनुमान चालिसा यंत्रा’सारखी कथित दैवी सिद्धीची ‘यंत्रे’ विकणे हा गुन्हा असल्याचे उच्च न्यायालयाने जाहीर केले आहे. अशा सर्व प्रकारच्या कथित दैवी व व गूढशक्तीधारी वस्तूंचा प्रसार आणि विक्री सरकारने कठोरपणे थांबवून जे कोणी असा फसवणुकीचा धंदा करत असतील त्यांना अटक करून खटले भरले जावेत, असा आदेशही न्यायालयाने दिला आहे.

महाराष्ट्र सरकारने सन २०१३ मध्ये केलेल्या मानवी बळी आणि अन्य अमानवीय व अघोरी प्रथांना प्रतिबंध करण्यासाठी केलेल्या कायद्याचा (Maharashtra Prevention and Eradication of Human Sacrifice and other Inhuman, Evil and Aghori Practices and Black Magic Act, 2013) आधार घेत न्या. टी. व्ही. नलावडे व न्या. एम. जी. सेवलीकर यांच्या औरंगाबाद  येथील खंडपीठाने हा आदेश दिला अशा वस्तूंच्या जाहिराती टीव्ही वाहिन्यांवर प्रसारित करणे हाही या कायद्यानुसार गुन्हा असल्याचे नमूद करत न्यायालयाने असाही आदेश दिला की, अशा जाहिराती टीव्ही वाहिन्यांवर प्रसिद्ध होणार नाहीत याची खात्री करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने परस्पर समन्वयाने मुंबईत विशेष कक्ष स्थापन करावा आणि अशा जाहिराती प्रसिद्ध होताना दिसल्यास त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी.

राज्यघटनेच्या अनुच्छेद ५१ मध्ये नमूद केलेल्या नागरिकांच्या कर्तव्यांचा संदर्भ देत न्यायालयाने म्हटले की, वैज्ञानिक दृष्टिकोन, चौकसपणा व मानवता अंगी बाणविणे हे नागरिकांचे कर्तव्य आहे. महाराष्ट्र सरकारने केलेला अघोरीविद्या प्रतिबंधक कायदाही याचसाठी आहे. अनिष्ठ प्रथा आणि अंधश्रद्धांच्या निर्मूलनासाठी आयुष्य वेचलेल्या महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व अन्य समाज सुधारकांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात प्रत्येक नागरिकास निदान किमान शिक्षण देण्याची गरज आहे.

न्यायालय म्हणते की, आजही समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन, चौकसपणा व सुधारणावादी विचार मुरलेला दिसत नाही. शिक्षित आणि उच्चशिक्षित लोकही मंत्र-तंत्र आणि अघोरी विद्येच्या नादी लागल्याचे दिसते. गरीब-श्रीमंत आणि अशिक्षित व शिक्षित असा लोकांच्या अंधश्रद्ध वृत्तीचा गैरफायदा घेत विविध प्रकारचे बाबा देवी व चमत्कारी शक्तीचा दावा करत मंतरलेले गंडे-दोरे, यंत्रे व तत्सम अन्य वस्तू विकून त्यांची फसवणूक करतात.

इंदूर येथील मे. टेलेमार्ट सआॅपिंग नेटवर्क प्रा. लि. या कंपनीकडून काही वर्षांपूर्वी अशाच प्रकारे विकल्या जाणाºया ‘हनुमानचालिसा यंत्रा’च्या अनुषंगाने हा विषय न्यायालयापुढे आला होता. या यंत्राची विविध टीव्ही वाहिन्यांवर जाहिरात केली जायची. अभिनेता मनोज कुमार, शिवाजी साटम व मनोज खन्ना, गायिका अनुराधा पौडवाल आणि अनुप जलोटा इत्यादी ‘सेलिब्रिटी’ मंडळी या यंत्राच्या वापरामुळे आपल्या बिकट समस्यांचे कसे निवारण झाले याचे त्या जाहिरातींमध्ये रसभरित वर्णन करायचे.

औरंगाबादच्या ‘सिडको’ वसाहतीत राहणाºया राजेंद्र गणपतराव अंभोरे या शिक्षकाने हे ‘हनुमानचालिसा यंत्र’ खरेदी केले व ते तद्दन बनावट असल्याचा अनुभव आल्यानंतर न्यायालयात याचिका केली. काही दिवसांनी अंभोरे यांनी याचिकिा मागे घेण्याची इच्छा प्रदर्शित केली, पण त्यांनी उपस्थित केलेला विषय व्यापक लोकहिताचा असल्याने न्यायालयाने त्यांना तशी परावनगी दिली नाही, न्यायालयाने जेष्ठ वकील व्ही. डी. सपकाळ यांची ‘अ‍ॅमायकस’ म्हणून नेमणूक केली व त्यांनी याचिकाकर्त्यातर्फे प्रकरण चालविले. न्ययालयाने सपकाळ यांना विधीसेवा प्राधिकरणाच्या निधीतून २५ हजार रुपये फी देण्याचा आदेश दिला. परंतु या लोकहिताच्या कामासाठी फी न घेण्याचे औदार्य सपकाळ यांनी दाखविले

अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER