नक्षलवाद्यांकडे ड्रोन आढळून आल्याने दिसताक्षणीच गोळ्या घालण्याचे आदेश

नवी दिल्ली : नक्षलवाद्यांकडे आढळून आलेल्या ड्रोनची केंद्र सरकारने गंभीर दखल घेतली असून त्यांच्याकडे पुन्हा ड्रोन आढळून आल्यास दिसताक्षणीच गोळ्या घालण्याचे आदेश सुरक्षा दलाला देण्यात आले आहे. संरक्षण आणि गुप्तचर यंत्रणांच्या शिखर संस्थेने हे आदेश दिले आहेत.

मानवरहित यान नक्षलवाद्यांकडून ऑपरेट केलं गेल्याचे उघड झाल्यानंतर हे आदेश दिले आहेत. छत्तीसगडच्या बस्तरमधील सुकमा जिल्ह्यात सीआरपीएफ शिबिरादरम्यान काही दिवसांपूर्वी हे ड्रोन फिरताना दिसले होते. गेल्या महिन्यात तीन दिवस किस्ताराम आणि पालोडीमध्ये सीआरपीएफ शिबिराजवळ लाल आणि पांढरा उजेड निघणारे हे ड्रोन फिरताना दिसले. या ड्रोनच्या आवाजाने त्याकडे सुरक्षा दलाचे लक्ष गेले. त्यानंतर जवान सतर्कही झाले होते.

घिरट्या घालणाऱ्या ड्रोन्समधून लाल आणि पांढरा प्रकाश बाहेर पडत असल्याचे दिसले तसेच ड्रोन्सचा गुणगुणणारा आवाजही ऐकू आला. त्यानंतर त्या कँपसह जवळच्या अन्य कँपवर सावधानतेचा इशारा देण्यात आला. गुप्तचर विभागाने केलेल्या तपासातून मुंबईतील एका विक्रेत्याने काही संशयित माओवाद्यांना ड्रोनची विक्री केल्याचा संशय आहे. याबाबत आणखी चौकशी सुरू आहे.

ज्या दोन कँपवर हे ड्रोन व मानवविरहित विमाने घिरट्या घालताना आढळली ते दोन्ही कँप अत्यंत संवेदनशील असून दुर्गम भागात दाट जंगलात आहेत. त्यांच्याशी संपर्क साधणे तुलनेने कठीण आहे. या परिसरात माओवाद्यांचा वावर असतो. ओडिशा, महाराष्ट्र आणि आंध्रप्रदेश या राज्यांच्या सीमा या ठिकाणी जोडल्या जात असल्याने ही घटना अत्यंत चिंताजनक आणि गंभीर स्वरूपाची असल्याचे मत एका वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केले.

नक्षलवादी मोठा घातपात घडवून आणण्याची शक्यता असल्याने सर्व जवानांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले होते. या घटनेनंतर संरक्षण यंत्रणांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.