कथ्थक बॉल टाकणारा असा ‘शक्तिमान’ बोलर पाहिलाय का कधी?

Katthak Bowler

पूर्वी ‘टीव्ही’ वर येणारी ‘शक्तिमान’ (Shaktiman) ही मालिका बच्चे कंपनीत फार लोकप्रिय होती. त्यातला हिरो ‘गंगाधर’ उर्फ ‘शक्तिमान’ असा भोवऱ्यासह गर्रगर फिरुन कोणत्याही संकटाच्या ठिकाणी मदतीला जातो. अगदी त्या ‘शक्तीमान’ सारखाच गर्रगर फिरुन गोलंदाजी करणाऱ्या भन्नाट फिरकी गोलंदाजाचा व्हिडिओ समोर आलाय आणि त्याच्यावर अगदी गमतीशीर कॉमेंटसचा पाऊस पडतोय…हा अफलातून गोलंदाज पाहिल्यावर क्रिकेटप्रेमींनी म्हटलेय की हा गडी जर भारतीय संघात आला तर आपल्याकडे ‘बुमराह’ ‘गुमराह’ (Bumrah Gumrah) असे दोन्ही गोलंदाज असतील.

माजी क्रिकेटपटू व माजी निवडसमिती सदस्य जतीन परांजपे (Jatin Paranjape) यांनी पोस्ट केलेला हा व्हिडिओ रोहन गावसकरने (Rohan Gavaskar) शेअर केलाय. आणि तो शेअर करताना त्याच्या टॉपस्पीनर बद्दल नक्कीच काळजी घ्यावी लागेल असे म्हणतानाच आपल्यापेक्षा त्याचा टप्पा चांगला व अचुक असल्याचे स्वतःवरच कोटी करत म्हटले आहे.

धवल कुलकर्णी (Dhawal Kulkarni) व अमोल मुजुमदार यांनी या शैलीचे ‘कथ्थक बाॕल’ (Katthak Ball) असे वर्णन केले आहे. ज्येष्ठ क्रीडा पत्रकार विजय लोकापल्ली यांना अशा गोलंदाजाचा सामना करण्यासाठी फलंदाजाने नेमका कोणता गार्ड घ्यावा (लेग, लेग व मिडल, मिडल, मिडल व आॕफ, आॕफ, आऊटसाईड आॕफ की आऊटसाईड लेग) असा प्रश्न पडलाय.

अजीत नावाच्या एकाने म्हटलेय की असे तीन चेंडू खेळल्यावर फलंदाज स्वतःच गोलगोल फिरायला लागेल.

या नाचऱ्या, भोवऱ्या गोलंदाजाला फक्त एकच फलंदाज खेळू शकतो तो म्हणजे ‘लगान’ मधला ‘कचरा’ असे मीम एकाने पोस्ट केले आहे. कचराचे हे प्रो व्हर्जन असल्याचेही काहींनी म्हटलेय.

काहींनी म्हटलेय की कोरोना महामारीमुळे डान्स क्लासेस बंद असल्याने तो क्लास सोडून मैदानावर आलाय. जेंव्हा बॕले डान्सर गोलंदाज बनतो असे काहींनी म्हटले आहे. एकाने तर म्हटलेय की पाठदुखी झाल्यावर सरप्राईज डिलिव्हरीसाठी रविचंद्रन अश्विनने ही स्टाईल काॕपी करायला हवी.

याने बहुधा शक्तिमानपासून प्रेरणा घेतलेली दिसतेय असे काहींना वाटले तर एकाने तर शंका उपस्थित केलीय की बहुधा याच्या गर्लफ्रेंडने याला ताकिद दिली असावी की काहीही कर पण विकेट मिळायलाच हवी. चेंडूनेच एकट्याने मजा का करायची म्हणून हा गडी स्वतःच चेंडूच्या आधी फिरतोय, याला ब्रिस्बेनला घेऊन जा…हाच भारताला जिंकून देईल असेही काहींनी म्हटले आहे तर ‘ये लट्टू क्रिकेट क्यू खेल रहा’ असा प्रश्न काहींना पडला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER