हाथरसच्या बलात्काऱ्यांना फासावर लटकवा : संजय राऊत

Sanjay Raut

मुंबई : उत्तर प्रदेशमधील (UP) हाथरसमध्ये १९ वर्षीय तरुणीवर सर्वण समाजातील चौघांनी सामूहिक बलात्कार (Gang Rape) केला होता. दोन आठवड्यापूर्वी ही घटना घडली होती. आज उपचारांदरम्यान त्या तरुणीचा मृत्यू झाला, यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया देत हाथरसच्या बलात्काऱ्यांना फासावर लटकवा असे ते म्हणाले आहेत .

तसेच केंद्रात मंत्री असणारे दिल्लीमधील निर्भया बलात्कार प्रकरणानंतर न्यायाची मागणी करत रस्त्यावर उतरले होते अशी आठवण संजय राऊत यांनी यावेळी करुन दिली.

निर्भया प्रकरणानंतर नवीन कायदा करावा लागला होता. आज जे केंद्रात मंत्री आहेत ते आमचे साथीदार होते. आजही आहेत. निर्भयाला न्याय मिळावा यासाठी रस्त्यावर उतरले होते. पण आता मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश येथे जेव्हा अशा प्रकारच्या बलात्कार आणि हत्येच्या घटना होतात तेव्हा सगळे शांत बसतात. अशा घटनांशी सरकारचा कोणताही संबंध नसतो. पण जी पोलीस यंत्रणा, राजकीय व्यवस्था असते त्यांनी तपास करुन गुन्हेगांना फासावर पोहोचवण्याचं काम करायचं असते ,” असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

अशा घटना का घडतात यासंबधी वारंवार चर्चा झाली आहे. सध्या देशात अशा घटना वाढत आहेत. कायद्याची भीती संपत आहे असं वाटू लागलं आहे. निर्भयावेळी जी भूमिका घेतली आज तीच भूमिका केंद्रातील महिला नेत्यांनी घेणे गरजेचे आहे, असे संजय राऊत म्हणाले .

दरम्यान १४ सप्टेंबर रोजी जनावरांसाठी चारा आणण्यासाठी ही तरुणी आपल्या शेतात गेली होती. याठिकाणी चार तरुणांनी तिच्यावर सामुहिक बलात्कार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. रक्तबंबाळ अवस्थेत जेव्हा ही तरुणी घटनास्थळी आढळून आली तेव्हा तिची जीभ छाटलेली होती तसेच तिच्या मानेवर गंभीर जखमा होत्या. त्याचबरोबर तिच्या पाठीच्या कण्यालाही गंभीर दुखापत झाली होती.

याप्रकरणी पोलिसांनी सुरुवातीला फक्त जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर २३ तारखेला तरुणीच्या जबाबानंतर एफआयआरमध्ये सामूहिक बलात्काराचे कलम जोडण्यात आले. पोलिसांनी पीडित मुलीच्या घराजवळील तीन व्यक्तींना सुरुवातीला ताब्यात घेतले. गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यातील एकजण फरार झाला होता त्यानंतर त्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले.

ही बातमी पण वाचा : अमानुष कृत्य करणाऱ्यांना जबर शिक्षा झाली पाहिजे ; हाथरस घटनेवर अजितदादांनी व्यक्त केला संताप

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER