हाथरस घटना : महाराष्ट्रविरोधी वक्तव्य करणारे आता कुठे गेले? ; शिवसेनेचा विरोधकांना सवाल

उत्तर प्रदेशातील योगी सरकार बरखास्त करून तेथे राष्ट्रपती राजवट लागू करा

Yogi & Uddhav Thackeray

मुंबई : हाथरस सामुहीक बलात्कार घटनेवर देशभरातून संतापाची लाट उसळली आहे. महाराष्ट्रातील नेत्यांनी यावर संतप्त प्रतिक्रिया देत या घटनेचा निषेध नोंदवला आहे. शरद पवार, राज ठाकरे अशा सर्वच बड्या नेत्यांनी हाथरस घटनेवर संताप व्यक्त केला आहे. तर, शिवसेनेने थेट उत्तर प्रदेशातील योगी सरकार बरखास्त करून तेथे राष्ट्रपती राजवट लागू करा अशी मागणी केली आहे.

उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये घडलेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणाचे पडसाद आज मुंबईतदेखील उमटले. हाथरसमधील (Hathras) पीडित मुलीवरील बलात्कार आणि हत्येच्या निषेधार्थ आज दुपारी शिवसेनेने (Shivsena) चर्चगेट रेल्वे स्थानकाच्या बाहेर आंदोलन केले. उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांचं सरकार बरखास्त करून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा, अशी मागणी यावेळी शिवसेनेने केली.

महाराष्ट्रविरोधी वक्तव्य करणारे आता कुठे गेले? त्यांना उत्तर प्रदेशमधील अराजकता दिसत नाही का? असा सवाल शिवसेनेच्या नेत्यांनी यावेळी केला. शिवसेना खासदार अरविंद सावंत आणि खासदार अनिल देसाई यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनात शिवसैनिकांनी योगी सरकार आणि उत्तर प्रदेश पोलिसांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली व या घटनेचा निषेध नोंदवत योगी सरकार बरखास्त करण्याची मागणी शिवसेनेने केली.

दरम्यान, देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटताना पाहून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. योगी आदित्यनाथ यांनी ट्विट करून हाथरस येथील घटनेवर भाष्य केलं आहे. उत्तर प्रदेशातील माता-भगिनींच्या सन्मान आणि स्वाभिमानाला ठेच पोहोचविण्याचा विचार सुद्धा करणाऱ्यांचा सत्यानाश होईल. लोक भविष्यातही लक्षात ठेवतील अशी शिक्षा या लोकांना देऊ. राज्यातील माता-भगिनींच्या संरक्षण आणि विकासासाठी उत्तर प्रदेश सरकार वचनबद्ध आहे. हा आमचा संकल्प असून वचन आहे, असं ट्विट योगी आदित्यनाथ यांनी केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER