हाथरस घटना: राहुल गांधींना धक्काबुक्की; शरद पवार संतापले

मुंबई: उत्तरप्रदेशमधील (UP News) हाथरस (Hathras incident) येथील घटनेचा सर्व स्तरांतून निषेध करण्यात येत आहे. त्यातच हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी रवाना झालेल्या काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांना उत्तरप्रदेश पोलिसांनी अटक केली आहे. तिथे त्यांना धक्काबुक्की करण्यात आली. या प्रकारानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी संताप व्यक्त केला आहे.

ही बातमी पण वाचा:- राहुल – प्रियंकाना उत्तर प्रदेश पोलिसांनी घेतले ताब्यात

“उत्तरप्रदेश पोलिसांनी राहुल गांधींसोबत केलेले वर्तन हे अत्यंत निंदनीय आहे. अशा पद्धतीने लोकशाही मूल्ये पायदळी तुडवली जात आहेत. कायदा हातात घेतला जातोय.” असे शरद पवार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

तर, राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही या घडलेल्या प्रकारावर संताप व्यक्त केला आहे. सुळे यांनी म्हटलं आहे की, त्या ठिकाणी यूपी सरकारकडून दडपशाही होणार असेल तर त्याचा मी जाहीर निषेध करते. पोलिसांनी न्याय्य मागणीसाठी जाणाऱ्या लोकप्रतिनिधी वा कुठल्याही व्यक्तीची कॉलर धरणं कितपत योग्य आहे? असा प्रश्न सुप्रिया सुळेंनी उत्तरप्रदेश सरकारला केला आहे.

तर, जयंत पाटील यांनीही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ‘महात्मा गांधींचं नाव घ्यायचं आणि कृती उलटी करायची. रामाचं नाव घ्यायचं आणि कृती नथुरामाची करायची ही भाजपची पद्धत पुन्हा एकदा पुढे आली आहे.’ असा टोला पाटील यांनी लगावला. राहुल गांधी यांना झालेल्या धक्काबुक्कीचा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी निषेध केला आहे. हाथरसमधील पीडित मुलीच्या नातेवाइकांना भेटण्यासाठी जात असताना राहुल गांधी यांना उत्तरप्रदेशच्या पोलिसांनी धक्काबुक्की करून खाली पाडले. देशातील एका प्रमुख पक्षाच्या प्रमुखाला अशा प्रकारे दिलेली वागणूक ही अत्यंत निंदनीय आहे, असेही जयंत पाटील म्हणाले.

राहुल गांधी पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यास गेले असता त्यांच्यासोबत काँग्रेसचे असंख्य कार्यकर्तेदेखील होते. पोलिसांनी धक्काबुक्की केली व राहुल गांधी यांची कॉलर पकडून त्यांना अटक केल्यानंतर काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER