हाथरसप्रकरण : शिवसेनेचे राष्ट्रपतींना पत्र

Neelam Gorhe & Ramnath Kovind

मुंबई : उत्तरप्रदेशातील हाथरस येथे एका युवतीवर सामूहिक बलात्कार करून अत्याचार करण्यात आले. मानवतेस काळिमा फासणाऱ्या या घटनेचे देशभर तीव्र पडसाद उमटले. उत्तरप्रदेश पोलिसांनी पीडितेच्या मृतदेहावर मध्यरात्री परस्पर अंत्यसंस्कार केल्याची धक्कादायक बाब बुधवारी उजेडात आली. या प्रकरणी आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यातच आता शिवसेनेच्या प्रवक्त्या आणि महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी थेट राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ramnath Kovind) यांना या प्रकरणामध्ये दोषींना कठोर शासन करण्यात यावे, अशी मागणी करणारे पत्र पाठवले आहे. गोऱ्हे यांनीच यासंदर्भातील माहिती ट्विटवरून दिली आहे.

उत्तरप्रदेशमधील हाथरसमधील १९ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याची बातमी वाचून खूप दु:ख झाले. १४ सप्टेंबर रोजी घडलेल्या या घटनेमध्ये तिचा गळा आवळण्यात आल्याने तिला गंभीर जखमा झाल्या आणि २९ सप्टेंबर २०२० रोजी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. पीडितेचा मृतदेह तिच्या नातेवाइकांना सुपूर्द करण्यात आला नाही. पोलिसांनीच परस्पर तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. यामुळे भारतीय लोकांमध्ये चुकीचा संदेश गेला आहे, असे गोऱ्हे यांनी या पत्रामध्ये नमूद केले आहे.

गोऱ्हे यांनी मांडलेले मुद्दे खालीलप्रमाणे :
१) आरोपींना कुठल्याही परिस्थितीत जामीन मिळता कामा नये.
२) या प्रकरणामध्ये पीडितेची बाजू मांडण्यासाठी सरकारने सक्षम आणि अनुभवी वकिलांची नियुक्ती करावी.
३) या प्रकरणासंदर्भातील सबळ पुरावे गोळा करण्यात यावेत.
४) स्थानिक पोलिसांनी प्रत्यक्षदर्शींना योग्य ती सुरक्षा पुरवली पाहिजे.
५) या प्रकरणाचे आरोपपत्र वेळेत न्यायालयामध्ये दाखल करण्यात यावे.
६) उत्तरप्रदेश सरकारने आरोपींना फाशीच्या तख्तापर्यंत पोहचवण्यासाठी सर्व ती कायदेशीर मदत करावी.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER