पालकमंत्री हसन मुश्रीफ हरवले आहेत, त्यांना तातडीने शोधून द्या; मनसेचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई :- पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना अहमदनगरकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाही. जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हरवले आहेत, त्यांना तातडीने शोधून द्या. अशी मागणी करणारे पत्र मनसेचे शहराध्यक्ष परेश पुरोहित यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे.

देश, राज्य, शहरे कोरोनाने ग्रासले आहेत. राज्यात कोरोनाची स्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. त्यातच पालकमंत्री, त्या त्या शहरातील अधिका-यांनी अधिक सावध राहणे, नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने सेवासुविधांसह तत्पर राहणे आवश्यक आहे. मात्र, असे असतानाही अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना आपल्या जिल्ह्याकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाही. अहमदनगरमध्ये कोरोनाची स्थिती अत्यंत गंभीर झाली असताना पालकमंत्र्याचे जिल्ह्याकडे दुर्लक्ष होत आहे.

अहमदनगर शहरासह जिल्ह्यात दररोज मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळत असून, मृतांच्या आकड्यातही वाढ होत आहे. जिल्ह्यात दररोज ८०० ते ९०० कोरोनाबाधित रुग्ण सापडत आहेत.

हसन मुश्रीफ यांनी स्वतःच्या कागल मतदारसंघामध्ये लॉकडाऊन केला. परंतु अहमदनगरमध्ये दररोज मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्ण आढळत असूनही त्यांना अहमदनगरकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाही. अशी तक्रार मनसेने मुख्यमंत्र्यांना पत्रात केली आहे.

तसेच, अमरधाममध्ये मृत्यू झालेल्यांना जाळण्यासाठी जागा उपलब्ध नाही. मात्र पालकमंत्री हसन मुश्रीफ हे बैठकांव्यतिरिक्त जिल्ह्यात फिरकत नसल्याने ते हरवले आहेत का? असा टोला पुरोहित यांनी पत्रातून लगावला आहे.

अहमदनगर शहर व जिल्ह्यात १० ते १२ दिवसांचा जनता कर्फ्यू लावण्याची मागणी होत असतानाही मुश्रीफ यांना सर्व नियंत्रणात असल्याचे वाटते, असे पुरोहित यांनी या पत्रात नमूद केले आहे. फक्त बैठकीसाठी मुश्रीफ जिल्ह्यात येतात. त्यांनी सिव्हील हॉस्पिटल तसेच अमरधामला अजूनही भेट दिलेली नाही. अशी तक्रारदेखील मनसेने पत्रात केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER