सर्वात कमी वयाच्या कसोटीपटूने केले 15 वर्षे वयाच्या नियमाचे स्वागत

Hasan Raza - ICC

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) 15 वर्षाआतील खेळाडूंना (पुरुष, महिला व युवा) आंतरराष्ट्रीय क्रिकेट (Cricket) खेळता येणार नाही असा निर्णय घेतला आहे. कसोटी सामने (Test Cricket) आणि एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांतील (ODI) सर्वात कमी वयाचा खेळाडू, पाकिस्तानचा (Pakistan) हसन रझा (Hasan Raza) याने या निर्णयाचे स्वागत केले आहे. आयसीसीच्या या निर्णयाने हसन रझाचा सर्वात कमी वयात कसोटी व वन डे सामने खेळायचा विक्रम सुरक्षित झाला आहे.

सध्या 38 वर्षांचा असलेला हसन हा 24 आॕक्टोबर 1996 रोजी झिम्बाब्वेविरुध्द कसोटी सामना खेळला होता तेंव्हा त्याचे वय फक्त 14 वर्ष 227 दिवस होते तर त्याच मालिकेत सहा दिवसानंतर तो वन डे सामना खेळला होता. आयसीसीच्या ताज्या निर्णयाने हसनचा हा विक्रम अबाधित राहणार आहे.

त्याने म्हटले आहे की, आयसीसीने घेतलेला निर्णय योग्यच आहे. माझा विक्रम कायम राहिल म्हणून मी हे म्हणत नाहीये तर साधारण 15 वर्षानंतर खेळाडू मानसिकदृष्ट्या सक्षम बनतात.खेळाडूंच्या हिताच्या दृष्टीने हा निर्णय चांगलाच आहे. मी खेळत होतो त्याकाळात कोर्टनी वाॕल्शसारखा जलद गोलंदाज खेळत होता. तो फारच वेगाने गोलंदाजी करायचा आणि कमी वयाच्या फलंदाजांना तशा गोलंदाजांना खेळणे फारच कठीण जायचे.

आपल्याला एवढ्या कमी वयात संधी कशी मिळाली याबद्दल तो म्हणाला की, शालेय पातळीवरच्या माझ्या कामगिरीने निवडकर्त्यांचे लक्ष वेधून घेतले. वसिम अक्रम हे माझे पहिले कर्णधार होते आणि ज्यांचा 38 वर्षांपासूनचा विक्रम मी मोडला त्या मुश्ताक मोहम्मद यांच्या हस्ते मला टेस्ट कॕप मिळाली होती.

सध्या हसन हा इस्लामाबाद येथे क्रिकेट अकादमी चालवतो. देशासाठी चांगले क्रिकेटपटू घडवायचा माझा प्रयत्न आहे आणि त्यासाठी मी पूर्ण तयारीने लागलो आहे.

पाकिस्तानी क्रिकेटपटूंच्या वयाबद्दल नेहमीच संभ्रम असतो त्याबद्दल हसन म्हणाले की, आधीच्या काळी जन्माच्या नोंदी नव्हत्या व दाखलेही मिळत नव्हते पण आता प्रत्येकाला राष्ट्रीय ओळखपत्र मिळत असल्याने तो प्रश्न राहिलेला नाही.

हसन रझापेक्षाही कमी वयात टी-20 मध्ये काही खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले आहेत. त्यात सर्वात कमी वयाचा विक्रम रुमानियाच्या मारियन घेरासीम (14 वर्ष 16 दिवस) आणि जर्सी संघाची निया ग्रेग (11 वर्ष 40 दिवस) हिच्या नावावर आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER