पाच वर्षात मिळाले नाही तेवढे यश हर्षल पटेलला यंदा एकाच वर्षात

Harshal Patel

यंदाच्या आयपीएलमध्ये (IPL) ज्या एका नव्या चेहऱ्याने लक्ष वेधून घेतले आहे तो म्हणजे हर्षल पटेल (Harshal Patel). रॉयल चॕलेंजर्स बंगलोरचा (RCB) हा मध्यमगती गोलंदाज. यंदाच्या पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्सविरुध्द मिळवलेले पाच बळी असतील की चेन्नईच्या रवींद्र जडेजाकडून झालेली धुलाई असेल. त्याने प्रत्येक सामन्यात आपली छाप पाडली आहे. यंदाच्या आयपीएलच्या 6 सामन्यात आताच 17 बळी त्याच्या नावावर असून प्रत्येक सामन्यात त्याने किमान दोन तरी गडी बाद केले आहेत. असे सातत्य राखणारा यंदाच्या आयपीएलमधील तो एकमेव गोलंदाज तर आहेच शिवाय गोलंदाजांमध्ये 5 विकेटच्या अंतराने इतर सर्वांच्या पुढे आहे.

विशेष म्हणजे यंदाच्या आधीच्या पाच आयपीएल मिळून त्याच्या नावावर 16 च विकेट होत्या आणि आता केवळ यंदाच्याच आयपीएलमध्ये त्याच्या नावावर आतापर्यंत 17 बळी लागले असून अजून किमान 8 सामने बाकी आहेत. त्याच्याआधी 2015 च्या सिझनमध्ये त्याने 19.29 च्या सरासरीने 17 विकेट काढल्या होत्या पण 2015 नंतर आता प्रथमच तो लक्ष वेधून घेत आहे. यंदाच्या आयपीएलची पर्पल कॕप तोच पटकावेल असा विश्वास आयपीएलच्या दर्शकांनी अलीकडेच एका पोलमधून व्यक्त केला आहे. त्याने ओईन मॉर्गन, किरोन पोलार्ड, आंद्रे रसेल, फाफ डू प्लेसीस, सुरेश रैना, हार्दिक पांड्या यांच्यासारखे दिग्गज यंदा बाद केले आहेत.

2008- 09 पासून हर्षल यश मिळवतोय. त्या मोसमात त्याने विनू मंकड ट्रॉफी स्पर्धेत 23 विकेट मिळवल्या होत्या. 2010 च्या 19 वर्षाआतील विश्वचषक स्पर्धेत तो खेळला. 2009 मध्ये तो गुजराथसाठी मर्यादीत षटकांचे क्रिकेट खेळला आणि 2010 मध्ये मुंबई इंडियन्सने त्याला आपल्याकडे घेतले. पण प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याला संधी मिळत नव्हती. शेवटी हर्षल हा मूळचा गुजरातचा असला तरी त्याने हरियाणाकडे धाव घेतली तेंव्हा 2011 मध्ये त्याला हरियाणातर्फे प्रथम श्रेणी क्रिकेटची संधी मिळाली. त्याच काळात त्याचे कुटुंब अमेरिकेत स्थलांतरीत होणार होते पण हर्षलसाठी प्रशिक्षक तारक त्रिवेदी यांनी आग्रह केल्याने ते भारताताच थांबले.त्यानंतरच्या प्रवासात त्याने 64 प्रथम श्रेणी सामन्यात 226 बळी मिळवले आहेत. आपल्या पहिल्याच रणजी सिझनमध्ये त्याच्या नावावर 28 विकेट होत्या.

त्याला 2010 मध्ये मुंबई इंडियन्सने आपल्या संघात घेतले असले तरी त्याचे आयपीएल पदार्पण मात्र आरसीबीकडून झाले ते 2012 मध्ये. 2018 पर्यंत तो आरसीबीकडून खेळल्यावर पुढचे तीन सिझन दिल्ली कॕपिटल्ससाठी खेळला पण विशेष उल्लैखनीय काही घडले नाही. मात्र यंदा तो आरसीबीच्या तंबूत परतलाय आणि त्याला यशही मिळाले आहे.पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्सविरुध्द पाच बळी मिळवणारा तो पहिला गोलंदाज ठरला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button