14 वर्षात आणि 14 गोलंदाजांना जे जमलं नाही ते हर्षल पटेलने करून दाखवलं!

Maharashtra Today

आयपीएल 2021 (IPL 2021) चा सलामीचा सामना राॕयल चॕलेंजर्स बंगलोरच्या (RCB) हर्षल पटेलने (Harshal Patel) आपल्या नावावर केला. त्याने 27 धावात मुंबई इंडियन्सचा (MI) निम्मा संघ गारद केल्यानेच आरसीबीला विजयाच्या आवाक्यातील लक्ष्य मिळाले. तरीसुध्दा विजयाच्या 160 धावा करताना आरसीबीला शेवटच्या चेंडूपर्यंत खेळावे लागले यावरून हर्षल पटेलच्या गोलंदाजीचे महत्त्व लक्षात यावे. आयपीएलच्या 14 वर्षांच्या इतिहासात मुंबई इंडियन्सविरुध्द एकाच सामन्यात पाच बळी मिळवणारा तो पहिलाच गोलंदाज ठरला.

याच्याआधी 14 गोलंदाजांनी मुंबई इंडियन्सविरुध्द सामन्यात चार बळी मिळवले होते आणि त्यात आश्चर्य वाटेल पण मुंबई इंडियन्सचा आत्ताचा यशस्वी कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याचेच मुंबईविरुध्द गोलंदाजीचे सर्वोत्तम विश्लेषण होते. त्याने मे 2009 मध्ये सेंचुरीयन येथील सामन्यात डेक्कन चार्जरसाठी खेळताना मुंबई इंडियन्सचे चार गडी बाद केले होते. त्यात जीन पॉल ड्युमिनी, अभिषेक नायर, हरभजन सिंग आणि सौरभ तिवारी यांच्या विकेट काढताना त्याने 2-0-6-4 असे गोलंदाजीचे विश्लेषण नोंदवले होते.

रोहित शर्माशिवाय मुंबई इंडियन्सविरुध्द सामन्यात चार बळी घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये सॕम्युएल बद्री, मोहीत शर्मा, सोहेल तन्वीर, सुनील नरीन (दोन वेळा) , मार्कस् स्टोईनीस, अँड्र्यू टाय, अशोक दिंडा, भार्गव भट्ट, डेव्हिड वाईज, यो महेश, युझवेंद्र चहल आणि ड्वेन ब्राव्हो यांचा समावेश आहे. पण मुंबई पलटनचे एकाच सामन्यात पाच गडी बाद करणारा हर्षल पटेल हा पहिलाच. आधीच्या 14 गोलंदाजांना आणि 14 वर्षांच्या जे जमलं नाही ते हर्षलने करुन दाखवलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button