हर्षद मेहता व जेठमलानींचे वकिली चातुर्य

Harshad Mehta & Ram Jhetmalani

संपूर्ण देशाला हादरवून टाकलेल्या शेअर बाजारातील हर्षद मेहताच्या रोखे महाघोटाऱ्यास काही दिवसांपूर्वी २८ वर्षे पूर्ण झाली. या प्रकरणाच्या संपूर्ण न्यायालयीन प्रक्रियेस पत्रकार म्हणून मी साक्षीदार होतो. एकेकाळी शेअर बाजारातील ‘ब्ल्यू आईड बॉय’ असलेला हर्षदभाई एका रात्रीत ‘व्हिलन’ ठरला. त्याला फासावर लटकवावे, अशी तीव्र जनभावना त्यावेळी होती. पण हर्षद मेहतावरील सर्व खटल्यांत सर्व गुन्हे सिद्ध झाले असते तरी त्याला फाशी देणे शक्य नव्हते. कारण ज्यासाठी फाशी दिली जाऊ शकेल असा एकही गुन्हा त्याच्यावर नव्हता. अखेर ठाणे कारागृहात कच्चा कैदी असतानाच त्याचा नैसर्गिक मृत्यू झाल्याने आपली फौजदारी न्यायव्यवस्था त्याला कोणतीच शिक्षा करू शकली नाही.

हर्षद मेहताने हा सर्व घोटाळा एवढ्या अक्कलहुशारीने केला की, त्याची व्याप्ती व स्वरूप समजण्यासाठी ‘सीबीआय’च्या तपासी अधिकाऱ्यांना विशेष प्रशिक्षण द्यावे लागले. कायद्याने ठरवून दिलेल्या ९० दिवसांच्या मर्यादेत तपास पूर्ण होणे अशक्यच होते. त्यामुळे पुन्हा-पुन्हा वेळ वाढवून घेत अखेर तीन वर्षांनी तपास पूर्ण केला गेला. असे म्हणतात की, हर्षद मेहताकडून कोर्टात बचाव करण्यासाठी राम जेठमलानी यांच्या चेंबरमध्ये रोख दोन कोटी रुपये आधीच पोहचविले गेले होते. त्यामुळे जेठमलानी यांनीही या अशिलाला आपल्या सेवा अगदी सर्व तऱ्हेने दिल्या.

अटक झाल्यावर पहिल्या रिमांडच्या वेळीही जेठमलानी हर्षदसाठी उभे राहिले. जेठमलानींसारख्या वकिलाने मुंबईच्या किल्ला कोर्टात मॅजिट्रेटसमोर युक्तिवाद करण्याचा विरळ योग त्यानिमित्त पाहायला मिळाला. बिच्चार्‍या मॅजिस्टेटना नेमका गुन्हा काय घडला आहे, हे समजून घेण्यातही एक अख्खा दिवस खर्ची घालावा लागला होता. ताज महाल हॉटेलच्या आलिशान बॉलरूममध्ये भरगच्च पत्रकार परिषद घेऊन त्यावेळचे पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांनी हर्षदकडून दोन कोटी रुपये ‘लाच’ घेतल्याचा सनसनाटी आरोप करण्याची आणि एवढी रोख रक्कम एका छोट्याशा ब्रीफकेसमध्ये कशी काय मावू शकते याचे नाट्यपूर्ण प्रात्यक्षिक करून दाखविण्याची सेवाही वकील या नात्याने त्यावेळी दिली होती.

हर्षदला ज्या दिवशी अटक झाली त्याच दिवशी मध्यरात्री वटहुकूम काढून अनेक गोष्टी केल्या गेल्या. हर्षद, त्याचे सर्व कुटुंबीय, त्याच्या शेअर व रोख दलालीच्या कंपन्या आणि घोटाळ््यातील इतर ज्ञात-अज्ञात व्यक्ती व संस्थांना ‘नोटिफाईड एन्टिटी’ जाहीर करून त्यांच्या सर्व ज्ञात-अज्ञात स्थावर-जंगम मालमत्तांवर टांच आणण्यात आली. या मालमत्ता हुडकून त्यांचे कोर्टातील केसेस संपेपर्यंत जतन करणे व हिशेब ठेवणे यासाठी एक ‘कस्टोडियन’ नेमला गेला. या जप्तीचा एवढा हास्यास्पद अतिरेक केला गेला की, शेअर बाजाराशी काडीचाही संबंध नसलेल्या व महापालिकेच्या एका इस्पितळात डॉक्टर म्हणून नोकरी करणाºया हर्षदच्या एका भावाच्या दरमहा मिळणाºया पगारावरही टांच आणली गेली.

या घोटाळ्यातील हर्षद व अन्य आरोपींवरील कोर्टातील प्रकरणे फौजदारी व दिवाणी अशा दोन्ही स्वरूपाची होती. त्यासाठी मुंबई हायकोर्टातच एक विशेष न्यायालय स्थापन केले गेले. फौजदारी गुन्ह्यांबद्दल तुरुंगवासाची शिक्षा द्यायची व दिवाणी प्रकरणांमध्ये घोटाळ््यामुळे बँका व अन्य वित्तीय संस्थांकडून लुबाडली गेलेली कोट्यवधी रुपयांची रक्कम आरोपींकडून वसूल करून ती बँकांना परत करायची, अशी एकूण योजना होती. हर्षदची जप्ती आलेली बहुतांश मालमत्ता शेअर व रोख्यांच्या स्वरूपात होती.

याच अनुषंगाने जेठमलानी यांनी त्या विशेष न्यायालयात केलेला एक भन्नाट युक्तिवाद मुद्दाम सांगण्यासारखा आहे. तो अशासाठी सांगायला हवा की, असा युक्तिवाद फक्त जेठमलानी यांनी केला म्हणूनच कोर्टाने ऐकून घेतला होता व त्यात जेठमलानी यांनी त्यांचे वकिली चातुर्य पणाला लावले होते.

जेठमलानी यांनी न्यायालयास सांगितले की, आरोपींच्या मालमत्तांवर टांच आणून त्या ‘कस्टोडियन’कडे देण्याचा हेतू दिवाणी प्रकरणांचे निकाल लागतील तेव्हा नुकसान झालेल्या बँकांना पैसे देता यावेत, हा आहे. हे उद्दिष्ट साध्य  व्हावे यासाठी माझ्याकडे एक योजना आहे. ती योजना  मान्य केल्यास, दिवाणी प्रकरणांच्या निकालास कितीही वर्षे लागली तरी बँकांना त्यांचे बुडालेले सर्व पैसे व्याजासह परत मिळतील, याची खात्री होऊ शकेल.

जेठमलानी म्हणाले की, खरे तर हर्षदची जप्त झालेली मालमत्ता त्यांच्या संभाव्य देण्यांहून कितीतरी जास्त आहे. पण २०-२५ वर्षांनी दिवाणी प्रकरणे निकाली निघतील तेव्हा त्यातून सर्व देणी भागिवता येतील एवढे पैसे उभे राहू शकतील याची खात्री नाही. कारण या मालमत्ता शेअर व रोख्यांच्या स्वरूपात आहेत. निकाल लागल्यावर पैसे उभे करण्यासाठी एवढे २५-३० हजार कोटी रुपयांचे शेअर एकदम विकायला काढले तर बाजार कोसळेल व अपेक्षित रक्कम उभी राहणार नाही. त्यामुळे ही मालमत्ता शेअर व रोख्यांच्या स्वरूपात न ठेवता ते आत्ताच विकून त्याचे रोख पैसे करण्यात यावेत. ही रक्कम निकाल लागेपर्यत जशास तशी तर राहिलच. शिवाय त्यावर व्याजही मिळत राहील.

पण हे एवढे शेअर आत्ता विकायला काढले तरी बाजार कोसळून अपेक्षित रक्कम न मिळण्याचा धोका आहेच. हा धोका टाळण्याचा एकच उपाय आहे व तो म्हणजे या शेअर विक्रीसाठी ‘कस्टोडियन’ने हर्षद मेहताची मदत व सल्ला घेणे. कारण बाजार कोसळू न देता शेअर विक्रीतून जास्तीत जास्त रक्कम कशी मिळवायची याची अक्कलहुशारी व कसब फक्त त्याच्याकडेच आहे. जेठमलानी यांनी ही योजना अशा काही मखलाशी आर्जवाने मांडली होती की ती ऐकताना न्यायाधीशही स्तंभित झाले होते. परंतु शांत डोक्याने विचार करून काही दिवसांनी निकाल देताना त्यांनी ही योजना अमान्य केली, हे वेगळे सांगायला नकोच !

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER