हर्षद आणि समृद्धीने दिला स्वच्छतेचा संदेश

Harshad & samrudhi

दैनंदिन मालिका हा मनोरंजनाचा जरी भाग असला तरी आपण अनेकदा पाहतो की, मालिकांच्या माध्यमातून वेगवेगळे सामाजिक संदेशदेखील दिले जातात. प्रेक्षक स्वतःला दैनंदिन मालिकेशी रिलेट करत असल्यामुळे मालिकांच्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्याकडे कल वाढलेला आहे, याची प्रचिती आपल्याला अनेकदा मालिका पाहताना येते. सध्या मालिकांच्या विषयांमधूनही असे काही सामाजिक संदेश दिले जात आहेत की, त्यामधून समाजाची मानसिकता बदलली जाईल. सध्या छोट्या पडद्यावर सुरू असलेल्या ‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश देण्यात आला. यासाठी मालिकेचा नायक हर्षद अटकरी (Harshad Atkari) आणि नायिका समृद्धी केळकर (Samrudhi Kelkar) यांनी कठपुतली नृत्याच्या माध्यमातून स्वच्छतेविषयी प्रबोधन केले आहे.

समाजामध्ये अशा काही गोष्टी घडत आहेत की, ज्यामुळे सामाजिक स्वास्थ्याला धोका निर्माण होत आहे. अशा वेळी समाजामध्ये जी मनोरंजनाची माध्यमे आहेत त्याद्वारे लोकांपर्यंत याबाबत जाणीव जागृती केली जाते. याचा चांगला परिणाम होत असतो. कारण लोक मनोरंजन म्हणून जेव्हा मालिका, सिनेमा, नाटक पाहतात तेव्हा त्यातून दिलेल्या संदेशाचा विचार ते करत असतात. अगदी नोटाबंदी झाली तेव्हादेखील त्याचे अनेक संदर्भ मालिकांमध्ये दाखवण्यात आले होते. त्याशिवाय गेल्या आठ महिन्यांमध्ये जेव्हा कोरोनामुळे लॉकडाऊन होतं तेव्हा चित्रीकरण बंद राहिले. मात्र लॉकडाऊननंतर जेव्हा मालिकांचे चित्रीकरण सुरू झाले तेव्हा मास्क वापरण्याबद्दल, सॅनिटायझरने हात निर्जंतुक करण्याबाबत किंवा आरोग्याबाबत काळजी याबाबतचे संदेश देणारे सीन मालिकांमध्ये दाखवण्यात आले होते.

सध्या स्वच्छतेचा प्रश्न समाजामध्ये ऐरणीवर आहे आणि याबाबत कुठे तरी प्रबोधन व्हावे या हेतूने ‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेमध्ये एक खास सीन चित्रित करण्यात आला. प्रत्येक मालिकेमध्ये सध्या नवीन वर्षाच्या शुभेच्छांचा ट्रॅक सुरू आहे. प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यासाठी अनेक प्रयोग मालिकांची निर्मिती टीम करत असते. ‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेच्या टीमनेही नव्या वर्षामध्ये स्वच्छतेचा संदेश देण्याची भूमिका मांडली. यासाठी मालिकेमध्ये शुभमची भूमिका करणारा हर्षद अटकरी आणि कीर्तीच्या भूमिकेत असलेली समृद्धी केळकर यांच्यावर एक नृत्य चित्रित  करण्यात आलं. या नृत्यामध्ये कठपुतली हा फॉर्म वापरण्यात आला होता. त्यासाठी समृद्धी आणि हर्षदने खास राजस्थानी वेशभूषा केली होती.

कोरोनाकाळामध्ये स्वच्छतेचे महत्त्व प्रत्येकालाच वेगळ्या अर्थाने समजले आहे. पण स्वच्छता ही फक्त कोरोनाकाळापुरतीच मर्यादित राहू नये तर ती माणसाच्या आयुष्यामध्ये एक सवय बनली पाहिजे, असा संदेश या मालिकेतील या नव्या वर्षाच्या शुभेच्छा नृत्यातून देण्यात आला.

याबाबत हर्षद आणि समृद्धी सांगतात, जेव्हा आम्हाला सांगितलं की आपण नवीन वर्षासाठी एक खास नृत्य मालिकेमध्ये आणत आहोत तेव्हा आम्हाला ते काय असेल याची उत्सुकता होती. सध्या कौटुंबिक आनंद मालिकेमध्ये दिसत आहे. नव्या वर्षाच्या पार्श्वभूमीवर अशा पद्धतीचे आनंदी कुटुंब या मालिकेचा यूएसपी असेल हे माहीत  होतं. पण नृत्याच्या माध्यमातून आम्ही आमच्या प्रेक्षकांना स्वच्छतेचा संदेश देणार आहोत हे जेव्हा कळले तेव्हा आम्हालादेखील हे नृत्य करण्यासाठी एक वेगळं बळ मिळालं. मालिकेतील कलाकार जे काही सांगतात त्याचा चांगला परिणाम होत असतो.

या निमित्ताने भविष्यामध्ये स्वच्छता ही आपली गरज आहे हे सांगण्यासाठी कठपुतली डान्सच्या माध्यमातून आम्हाला प्रेक्षकांशी संवाद साधता आला याचा वेगळा आनंद आहे. कठपुतली नृत्य करताना खूप मजा आली. समृद्धी सांगते, नृत्य करण्यासाठी मला नेहमीच एक निमित्त लागत असतं. पण यावेळी हे नृत्य मला आनंद देण्यापेक्षा त्यातून मला स्वच्छतेचा संदेश देता आला याचा सगळ्यात जास्त आनंद होत आहे. तर हर्षद म्हणाला की, मी आतापर्यंत ज्या मालिकांमध्ये काम केले आहे त्यामध्ये नृत्याचा फारसा संबंध आला नव्हता; पण या मालिकेच्या निमित्ताने डान्स करत मला स्वच्छतेचा संदेश देण्याचं भाग्य मिळालं. अभिनेता आणि माणूस म्हणून माझ्यासाठी ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER