हर्षवर्धन आज जाआसंनेच्या कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारणार

Harsh Vardhan

नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांची जागातिक आरोग्य संघटनेच्या कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. ते आज (२२ मे रोजी) सूत्रे स्वीकारतील. सध्या जपानचे डॉ. हिरोकी नाकातानी हे जागतिक आरोग्य संघटनेच्या ३४ सदस्यीय कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष आहेत.

कार्यकारी मंडळावर भारताचा प्रतिनिधी नियुक्त करण्याच्या प्रस्तावावर १९४ देशांच्या जागतिक आरोग्य असेंब्लीने स्वाक्षऱ्या केल्या आहेत. त्यामुळे हर्षवर्धन पदभार स्वीकारणार ही केवळ औपचारिकता आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या दक्षिण-पूर्व गटाने कार्यकारी मंडळावर मे महिन्यापासून पुढील तीन वर्षांसाठी भारताची निवड करण्याचा निर्णय गेल्या वर्षी एकमताने घेतला.

जागतिक आरोग्य संघटनेच्या २२ मे रोजी होणाऱ्या बैठकीत हर्षवर्धन यांची कार्यकारी मंडळावर निवड होणार आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. अध्यक्षपद प्रादेशिक गटांमध्ये एका वर्षासाठी आळीपाळीने देण्यात येते आणि भारताचा प्रतिनिधी शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या पहिल्या वर्षासाठी मंडळाचा अध्यक्ष असेल, असे गेल्या वर्षी ठरविण्यात आले होते. हे पद पूर्णवेळ नसून केवळ कार्यकारी मंडळाच्या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषविणे गरजेचे आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER