आणिबाणीची वैधता ४५ वर्षांनी तपासण्यास सुप्रीम कोर्ट झाले राजी कोर्टाचे मन वळविण्यात हरीश साळवेंना यश

Harish Salve & SC

नवी दिल्ली :- दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांनी २५ डिसेंबर १९७५ रोजी देशात लागू केलेल्या आणिबाणीची वैधता आता ४५ वर्षे उलटून गेल्यानंतरही तपासण्यास सर्वोच्च न्यायालय सोमवारी राजी झाले. आणिबाणीची घोषणा अवैध होती असे जाहीर करावे आणि त्या आणिबाणीतील छळामुळे पतीचे निधन झाल्यानंतर माझ्या कुटुंबाची जी वाताहात झाली त्याबद्दल २५ कोटी रुपयांची भरपाई देण्याचा आदेश सरकारला द्यावा, अशी याचिका दिल्लीतील एका ९३ वर्षांच्या विधवेने केली आहे. न्या. संजय कृष्ण कौल, न्या. दिनेश माहेश्वरी व न्या. ऋषिकेष रॉय (Rishikesh Roy) यांच्या खंडपीठाने गेल्याच आठवड्यात या याचिकेची अवास्तव म्हणून संभावना केली होती. परंतु ज्येष्ठ वकील हरीष साळवे युक्तिवाद करणार आहेत, असे सांगून यायिकाकर्तीच्या वकील अ‍ॅड. नीला गोखले यांनी सुनावणी नंतर घेण्याची विनंती केली होती.

त्यानुसार साळवे सोमवारी न्यायालयात हजर झाले व त्यांनी त्यांच्या नेहमीच्या आग्रही शैलीत आधी सुनावणीस राजी नसलेल्या न्यायालयाने मन वळविले. मात्र आणिबाणीची घोषणा वैध होती का व नसेल तर आता ४५ वर्षे उलटून गेल्यानंतर तसे जाहीर करणे रास्त होईल का एवढ्याच मर्यादित मुद्द्यावर सुनावणी होईल, असे खंडपीठाने स्पष्ट केले. त्यानुसार साळवे यांना याचिकेत १८ डिसेंबरपर्यंत अनुरूप अशा सुधारणा करण्यास सांगण्यात आले.

ही बातमी पण वाचा : राज्यातील न्यायाधीशांची याचिका सुप्रीम कोर्टाने तात्काळ फेटाळली

न्यायालयान नमूद केले की, एवढा काळ उलटून गेल्यानंतर हा विषय हाताळावा का अशी साशंकता मनात असूनही आम्ही साळवे यांचे म्हणणे ऐकले. इतिहासात घडलेल्या चूका जेव्हा शक्य होईल तेव्हा सुधारायला हव्यात, असे त्यांचे म्हणणे होते. पण आणिबाणीत अनेक व्यक्तिंच्या बाबती अनेक वाईट गोष्टी घडलेल्या असू शकतात. त्यामुळे अशी सर्व प्रकरणे पुन्हा खोलावीत असे आम्हाला वाटत नाही. मात्र आणिबाणी जाहीर करणे वैध होते का व नसेल तर त्याचा फैसला आता इतकी वर्षे उलटल्यानंतर करणे रास्त होईल का एवढ्याच मर्यादित मुद्द्यावर सुनावणी व्हायला हरकत नाही, असे आम्हाला वाटते.

सरकार काय भूमिका घेणार?

न्यायालयाने या याचिकेवर केंद्र सरकारला नोटीस जारी केली. त्यामुळे सरकारला प्रतिज्ञापत्र करून काही तरी भूमिका घ्यावी लगेल. आता सत्तेत असलेली भाजपा आणिबाणी हा देशावरील कलंक होता, असे सतत मानत आली आहे. पक्षाच्या (पूर्वीच्या जनसंघाच्या) अनेक नेत्यांना आणिबाणीत तुरुंगातही डांबण्यात आले होते. परंतु आता संवैधानिक निकषांवर आणिबाणीच्या वैधतेविषयी भाजपाचे सरकार काय भूमिका घेते हे पाहणे महत्वाचे आहे.

अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER