शिवसेनेतील बंजारा समाजाची पोकळी भरुन काढणार, हरिभाऊ राठोडांचा मंत्रिपदावर दावा

Haribhau Rathod

मुंबई: पूजा चव्हाण आत्महत्या (Pooja Chavan Case) प्रकरणात नाव पुढे आल्यानंतर तत्कालीन वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. संजय राठोड हे बंजारा समाजाचे (Haribhau Rathod) नेतृत्व करतात. शिवाय यवतमाळ, वाशीम जिल्ह्यात असलेला बंजारा समाज हा नेहमीच शिवसेनेच्या बाजूने उभा राहतो. मात्र आता संजय राठोड यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर शिवसेनेतील (Shivsena) बंजारा समाजाची पोकळी भरुन काढण्यासाठी आता थेट बंजारा समाजाचे नेते हरिभाऊ राठोड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना पत्र लिहून वनमंत्री करण्याची मागणी केली आहे.

या पत्रात हरिभाऊ राठोड यांनी सध्या रिक्त असलेल्या वनमंत्री पदावर दावा केला आहे. शिवसेनेला बंजारा समाजाची गरज आहे. त्यामुळे संजय राठोड यांच्याऐवजी मला मंत्री करा. तुम्हाला मुख्यमंत्री करण्यासाठी मी स्वत:ची आमदारकी पणाला लावली. अन्यथा मला काँग्रेसच्या कोट्यातून सहज मंत्रिपद मिळाले असते. त्यामुळे आता वनमंत्रीपद मला द्यावे, अशी मागणी हरिभाऊ राठोड यांनी केली आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावर काय निर्णय घेणार, याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

हरिभाऊ राठोड यांनी सात मार्चला आणि 11 मार्चला अशी दोन पत्रं मुख्यमंत्र्यांना लिहली आहेत. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, या पत्रात हरिभाऊ राठोड यांनी निधानसभा निवडणुकीतील शिवसेनेच्या विजयात त्यांचा कसा सहभाग होता, याची माहिती दिली आहे. सोबतच तुम्ही मला सत्तेत वाटा देऊ, असे जाहीर आश्वासन दिल्याचे पत्रात नमूद करून अप्रत्यक्षपणे संजय राठोड यांचे रिक्त झालेले मंत्रिपद त्यांना द्यावे, असेच सूचित केले आहे. आपण विधानसभेच्या निवडणुकीवेळी शिवसेनेच्या आमदारांना निवडूण आणण्यासाठी काम केल्याचं सांगून आपला संपर्क आणि काम प्रत्येक जिल्ह्यात आहे. आपण भटक्या विमुक्त जाती, बारा बलुतेदार आणि ओबीसी समाजाचे नेतृत्व केल्यासं सांगत हरिभाऊंनी आपल्याला मंत्रिपदाची संधी मिळाली तर त्याचा फायदा शिवसेनेला संपूर्ण राज्यात होईल, असे हरिभाऊ राठोड यांनी पत्रात म्हटले आहे.

हरिभाऊ राठोड हे भारतीय जनता पक्षाचे यवतमाळ लोकसभेचे खासदार होते. मात्र त्यांनी नंतर काँग्रेसमधे कोलांटउडी मारली. काँग्रेसने त्यांना विधानपरिषदेची आमदारकीही बहाल केली होती. मात्र दुसऱ्या विधानपरिषद निवडणुकीत त्यांना काँग्रेसने उमेदवारी न दिल्याने आता ते शिवसेनेच्या मांडवाखाली आसरा घेण्याचा प्रयत्न करीत असल्याची चर्चा सध्या रंगू लागली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER