
राळेगणसिद्धी : भाजपाचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे (Haribhau Bagade) यांनी राळेगणसिद्धीत आज आण्णांशी चर्चा केली. अण्णा हजारे यांनी दिल्लीत जाऊन केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासंदर्भात केंद्राची भूमिका अण्णांना पटवून देण्यासाठी या भेटीत चर्चा झाली असावी, अशी चर्चा आहे.
राळेगणसिद्धीमध्ये काल पंजाबचे शेतकरी आले होते. त्यांनी थाळी वाजवून अण्णा हजारे यांच्यासमोर निदर्शने केली. त्यानंतर अण्णांशी चर्चा केली. अण्णांनी शेतकरी आंदोलनाला सुरुवातीपासूनच पाठिंबा असल्याचे सांगून आंदोलकांना बळ देण्यासाठी दिल्लीत येऊन आंदोलन करण्याचे आश्वासन त्या शेतकऱ्यांना दिले.
अण्णांनी दिल्लीत आंदोलन केल्यास हे आंदोलन आणखी तापून देशभरातील शेतकरी त्यात सामील होण्याची भीती असल्याने भाजपाच्या नेत्यांनी अण्णांची भेट घेण्यास सुरुवात केल्याचे सूत्रांनी सांगितले. विधानसभेचे माजी अध्यक्ष, आमदार हरिभाऊ राठोड आणि अण्णा या दोघांमध्ये सुमारे दीड तास बंद दाराआड चर्चा झाली. अण्णा आणि बागडे यांनी या भेटीबाबत काहीही बोलण्यास नकार दिला.
अण्णांना कायद्याचे पुस्तक दिले भेट
हरिभाऊंनी अण्णांना कृषी कायद्याचे मराठी भाषेतील पुस्तक भेट दिले. यावेळी राज्यसभेचे खासदार डॉ. भागवत कराड, माजी जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड आणि सुनील थोरातही उपस्थित होते. अण्णांनी उपोषणाचा निर्णय घेऊ नये, अशी विनंती या नेत्यांनी अण्णांना केल्याचे कळते.
अण्णांचे एक दिवसाचे उपोषण
शेतकरी आंदोलनात ८ डिसेंबर रोजी भारत बंदची हाक दिली होती. त्यावेळी अण्णा हजारे यांनी राळेगणसिद्धी इथे आंदोलनाला पाठिंबा देत एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले होते. केंद्र सरकारने शेतकरी आंदोलनावर लवकरात लवकर तोडगा काढावा अशी मागणी अण्णांनी त्यावेळी केली होती.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला