हार्दिकचा जीव रंगला ‘कोल्हापुरी’त

Hardik Ranvijay Gaikwad

कोल्हापुरात (Kolhapur) येणारा पर्यटक कोल्हापुरी चप्पलची खरेदी केल्याशिवाय परतीच्या प्रवासाला लागत नाही. करकर वाजणारी कोल्हापुरी चप्पल अनेकांना भुरळ पाडतेच. तांबडापांढऱ्या रश्श्याचे भुरके मारून पापाची तिकटीच्या चप्पललाइनला अस्सल कोल्हापुरी चप्पल खरेदी होतेच. कोल्हापुरी चप्पलच्या प्रेमात न पडणारा पर्यटक शोधून सापडणार नाही. पडद्यावरचा राणादा म्हणजे हार्दिक जोशी हादेखील कोल्हापुरीच चप्पलवर इतका फिदा आहे की नुकतीच त्याने नवीन खरेदी केलेल्या  कोल्हापुरी चप्पलचा फोटो (Kolhapur Chappal Photo) सोशल मीडियावर शेअर करत ‘रुबाबदार’ असे  कॅप्शन देत लक्ष वेधले आहे. वजनदार शाहू पॅटर्नची ही कोल्हापुरी चप्पल राणाच्या भूमिकेमुळे गेल्या तीन वर्षांपासून इतकी जवळची बनली आहे की, जेव्हा राजा राजबिंडा, पोलीस या व्यक्तिरेखांमध्ये असताना कोल्हापुरी चप्पलला मिस केलं असंही हार्दिकनं सांगितलं.

तु’तुझ्यात जीव रंगला’ (Tuzhat JeevRangala) या मालिकेत हार्दिक रणविजय गायकवाड (Hardik Ranvijay Gaikwad) या शेतकरी, पहिलवानाच्या भूमिकेत दिसत आहे. रणविजय यापेक्षा राणादा याच नावाने हार्दिक लोकप्रिय आहे. या मालिकेत त्याचा लूक अस्सल कोल्हापुरी असल्याने त्याच्या पायात कोल्हापुरीच चप्पल दिसली नसती तरच नवल. खरं तर या मालिकेतून राणा म्हणून ऑनस्क्रीन येण्याआधी मुंबईकर हार्दिकने अनेकदा कोल्हापुरी चप्पल वापरली होती. हार्दिकला याविषयी विचारले तेव्हा तो म्हणाला, मला कायम कोल्हापुरी चप्पल आवडायची. कोणताही सण, उत्सव असेल
तेव्हा सलवार कुर्त्यावर मी हमखास कोल्हापुरी चप्पल घालायचो. पण ती कोल्हापुरी चप्पलच मुंबईत खरेदी व्हायची; शिवाय ती खूप हलकी असायची. पण ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत माझी राणादा या भूमिकेसाठी निवड झाली तेव्हा आमचा मुक्काम शूटिंगच्या निमित्ताने कोल्हापुरातील वसगडे या गावी झाला. सध्या आम्ही केर्लीत शूटिंग करत आहोत. राणा हा कोल्हापूरचा पहिलवान गडी असल्याने साधासा शर्ट, पँट आणि पायात कोल्हापुरी हा लूक मलाही फार आवडला.

Hardeek Joshi aka Rana from Tuzyat jeev Rangala personal info, wiki — TVKiDuniya.Comया मालिकेत राणा म्हणजे हार्दिकच्या पायात दिसणारी कोल्हापुरी चप्पल शाहू पॅटर्नची असल्याने वजनाला खूप जड आहे. सुरुवातीला या चप्पलचं वजन पेललं का, असं विचारताच हार्दिकनं दिलेलं उत्तरही वजनदार आणि कोल्हापूरला साजेसं होतं. हार्दिक म्हणाला, राणा पहिलवानाच्या भूमिकेसाठी मी वजन वाढवलं होतच; शिवाय कोल्हापूरचा पहिलवान ही अनुभूतीच इतकी वजनदार आणि रुबाबदार आहे की जेव्हा शाहू चप्पल मी जेव्हा पहिल्यांदा पायात घातली तेव्हा आपोआपच एक रुबाबदार फिलिंग आलं. कोल्हापूरचे राजे शाहू महाराज यांच्या पायात या डिझाईनची चप्पल असायची म्हणून तिला शाहू पॅटर्न म्हणतात.  हे कळल्यावर तर मला माझ्या पायातील चप्पलचा खूपच आदर वाटायला लागला. जशी ही मालिका सुरू झालीय तेव्हापासून माझं कोल्हापुरी चप्पलशी नातं जडलं आहे.

या मालिकेत हार्दिक जरी राणादा ही भूमिका करत असला तरी मध्यंतरी कथेच्या गरजेनुसार राजा राजबिंडा नावाच्या गुंडाच्या तर काहीकाळ पोलिस हवालदार म्हणूनही हार्दिक दिसला. तेव्हा मात्र राजा राजबिंडाच्या पायात कोल्हापुरी नव्हती आणि पोलिसाच्या रूपात असल्याने हार्दिकने कोल्हापुरी बाजूला ठेवून बूट वापरले. व्यक्तिरेखेची गरज नसल्याने त्या काळात कोल्हापुरी चप्पल घालता आली नाही आणि मी कोल्हापुरी चप्पलला खूप मिस केले. एकदा राणाचा लूक बदलायचा म्हणून त्याला जीन्समध्ये दाखवण्यात आले होते. शिवाय त्याच्या शर्टच्या स्टाइमलमध्येही बदल केला होता. पण राणाचा हा लूक काही त्याच्या चाहत्यांना रूचला नाही आणि अनेक प्रतिक्रिया आल्या की राणा त्याच्या नेहमीच्या हाफस्लीव्हज पैलवानस्टाइल शर्टमध्येच पहायला आवडेल. जीन्सतर नकोच घालू असेही त्याला चाहत्यांनी सांगितले. मग काय, पुन्हा हार्दिक राणादाच्या रांगड्या रूपात पडद्यावर आला.

गेल्या तीन वर्षात पाच ते सहा वेळा नव्याने कोल्हापुरी चप्पलची खरेदी हार्दिकसाठी करण्यात आली. अर्थात चप्पल हार्दिक वापरणार असल्याने तो स्वत: खरेदीसाठी जायचा. काही दिवसांपूर्वीच हार्दिकने नवीन कोल्हापुरी चप्पल खरेदी केले. ही खरेदी करण्यासाठी हार्दिकची स्वारी चप्पललाइनच्या नेहमीच्या दुकानात पोहोचली. पण यावेळी कोरोनामुळे हार्दिकच्या तोंडाला मास्क होता. आणि त्याने स्कार्फने डोकेही झाकले होते. दुकानदारने चप्पल दाखवायला सुरूवात करत एकेक पॅटर्न काढले त्यात शाहू पॅटर्नही होता. दुकानदार हार्दिकची तब्येत बघून म्हणाला, साहेब, तुमची पर्सनॅलिटी पैलवानासारखी आहे बघा. अगदी राणादासारखी. शाहू चप्पल शोभून दिसेल. हार्दिक त्याची फिरकी घेत म्हणाला, कोण राणा, तो तुझ्यात जीव रंगला मालिकेतला? मला नाही आवडत तो. त्याचं सोडा, मला चांगली दिसत असेल तर शाहू चप्पल पॅक करा. खरेदी झाल्यानंतर हार्दिक तोंडाचा मास्क काढून दुकानदाराकडे बघून हसला तेव्हा दुकानदाराच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद होता. हा किस्सा सांगताना हार्दिकलाही हसू आवरत नव्हते.

ही बातमी पण वाचा :

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER