कष्ट म्हणजे स्ट्रगल नव्हे !

Anad Ingle

आयुष्यात प्रत्येक माणूस जे स्वप्न पाहात असतो त्या स्वप्नाची पूर्तता करण्यासाठी कष्ट घेतच असतो. जेव्हा एखादी व्यक्ती यशाच्या शिखरावर पोहचते तेव्हा त्यासाठी खूप कष्ट करते. आता मनोरंजन क्षेत्रात करिअर करण्यासाठी येणारे त्यांचं गाव सोडून मुंबईची वाट धरतात तेव्हा सुरुवातीच्या काळात त्यांना हौसेमौजेला मुरड घालावीच लागते. मग मी खिशात पाचशे रुपये घेऊन मुंबईत आलो. इथे स्टेशनवर, जिन्याखाली राहून दिवस काढले, वडापाव खाऊन भूक भागवली असे सांगून कष्टाचे भांडवल करू नये. हे सगळं तुमची स्वप्नं पूर्ण करण्यासाठीच केलेले असते. यालाच अनेक जण स्ट्रगलचे नाव देतात आणि यशस्वी झाल्यावर आपण कसे स्ट्रगल केले हे सांगताना याच गोष्टीची री ओढतात.

हे मत आहे अभिनेता आनंद इंगळे याचे. आपले उद्याचे काम आजच्या कामापेक्षा उत्तम झाले पाहिजे यासाठी तुम्ही आज काय करता त्याला स्ट्रगल म्हणा, असं आनंद सांगतो. मनोरंजन क्षेत्रात काही कलाकार त्यांच्या तगड्या अभिनयासोबतच त्यांच्या स्पष्टवक्तेपणाबद्दलही ओळखले जातात. यापैकीच एक आनंद इंगळे. आनंद मुळात रंगभूमीवरून सिनेमा असा प्रवास केलेला कलाकार आहे. अनेक नाटकांमध्ये त्याच्यासोबत काम केलेल्या सुलेखा तळवलकर हिच्या एका स्पेशल शोमध्ये तिने आनंदला बोलतं केलं. या गप्पांमध्ये अनेक गोष्टी सुरू असतानाच कलाकारांचा स्ट्रगल हा विषयही संवादात आला. आपल्या स्वप्नांसाठी केलेले कष्ट म्हणजे कलाकांराना जो स्ट्रगल वाटतो तो आनंदला पटत नाही.

आनंद सांगतो, अशा प्रकारे सहानुभूती कलाकारांनी मिळवू नये. अगदीच स्पष्ट सांगायचं तर हे सगळं तुम्ही कुणासाठी करता हा प्रश्न कलाकारांनी स्वत:ला विचारला पाहिजे. मला अभिनयात किंवा मनोरंजन क्षेत्रात करिअर करायचे आहे तर त्यासाठी आपले घर, गाव सोडून मुंबईत यायचे तर कुठेही राहण्याची, पैसे काटकसरीने वापरण्याची तयारी असलीच पाहिजे. हे ओघाने होणारच आहे. आज कोणताही शो असेल आणि त्यात स्ट्रगलविषयी विचारले की जे अनुभव सांगितले जातात त्यांनाच स्ट्रगलचे नाव दिले जाते. हीच गोष्ट चुकीची आहे. यशस्वी कलाकार झाल्यावर हमखास या सुरुवातीच्या दिवसांमध्ये केलेल्या तडजोडींना स्ट्रगलच्या नावावर खपवले जाते. स्पर्धा ही स्वत:शी असावी.

आज माझे काम कालच्यापेक्षा चांगले झाले का आणि उद्या ते आजच्यापेक्षा चांगले होईल का यासाठी केलेला आपल्याच कामासाठीचा संघर्ष म्हणजे स्ट्रगल. उगीच ऐकणाऱ्याच्या डोळ्यात पाणी आणण्यासाठी आपल्या कष्टाची भावनिक गोष्ट सांगून ‘स्ट्रगल’ या शब्दातून सहानुभूती मिळवू नये. आनंद सध्या ‘शुभमंगल ऑनलाईन’ या मालिकेत हरिभाऊ डॉटकॉम या वेबसाईटचा संचालक ही आगळीवेगळी भूमिका निभावत आहे. नाटक, मालिका आणि सिनेमा या तीनही माध्यमांमध्ये हुकूमत असलेल्या आनंदची इतर विषयांवरील मतंही रोखठोक आहेत.

लहान मुलांच्या कोणत्याही स्पर्धांनाही आनंदचा विरोध आहे. मुलांचे बालपण, निरागस आनंद हिरावून घेणाऱ्या या स्पर्धा आहेत असं तो म्हणतो. लहान मुलांच्या रिअॅलिटी शोमधून त्यांना आपण या स्पर्धेत ओढतो, ग्लॅमर दाखवतो आणि जर पुढे हे सगळं त्यांना झेपलं नाही तर त्यांच्या आयुष्याची माती होऊ शकते. त्यामुळे ऑफ स्क्रीन असो किंवा ऑन स्क्रीन , लहान मुलांच्या स्पर्धांवर आनंदची कायमच फुली असते. पुणेकर असलेल्या आनंदला कॉलेजपासूनच रंगभूमीचे वेड लागले. एकांकिका, प्रायोगिक नाटकांतून तो सिनेमा, मालिकांकडे वळला.

‘कुंकू’ या मालिकेतील त्याची भूमिका गाजली होती. बालकपालक, बाळकडू, अजब लग्नाची गजब गोष्ट, फ्रेंडशिप अनलिमिटेड या सिनेमात त्याने बाजी मारली. ‘माकडाच्या हाती शॅम्पेन’ हे नाटक त्याने एकहाती गाजवले. मराठी मालिका, नाटक आणि सिनेमा इंडस्ट्रीत तो आंड्या या टोपण नावाने ओळखला जातो.

विनोदी नट म्हणून जरी त्याची कारकीर्द सुरू झाली असली तरी गंभीर आणि वेगळ्या धाटणीच्या भूमिकांसाठी नेहमीच आनंद भाव खाऊन जातो. त्याला जितके विनोदाचे टायमिंग आहे तितकाच गंभीर भूमिकांचाही सेन्स आहे. व्यक्तिगत जीवनात आनंद त्याच्या ठाम मतासाठीही ओळखला जातो. त्यामुळेच कोणत्याही मुलाखतीमध्ये किंवा सोशल मीडियावर केवळ चाहत्यांनी वाहवा म्हणावे म्हणून तो शोबाजी करत नाही, तर त्याला जे वाटते ते रोखठोक मांडायला त्याला आवडते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER