‘संजय राऊत आणि फडणवीसांच्या भेटीने आनंद !’ दरेकरांचे सूचक विधान

SAnjay Raut & Devendra Fadnavis & Praveen Darekar

मुंबई : शिवसेनेचे खासदार आणि प्रमुख प्रवक्ते संजय राऊत आणि भाजप नेते व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची गुप्त भेट झाल्याची माहिती पुढे आली आहे. या दोन्ही नेत्यांच्या या भेटीनंतर मोठ्या राजकीय भूकंपाची चर्चा सध्या सुरू आहे. यावर आता भाजप नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सूचक विधान केलं आहे.

राजकारणात दोन अधिक दोन चार कधीच होत नाही. शिवसेना ज्या अर्थी काँग्रेससोबत युती करू शकते तर राजकारणात काहीही होऊ शकते. या भेटीचा आनंदच आहे, असं सूचक विधान प्रवीण दरेकर यांनी केलं आहे.

महाराष्ट्रातील जनतेला देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्या भेटीची काहीही माहिती नाही. राऊतांच्या एका भेटीनं लगेच राजकीय भूकंप होणार नाही. त्यांनी अनेकदा अशा अनेक भेटी घेतल्या आहेत. प्रत्येक वेळी वेगवेगळी कारणंही दिली आहेत. मात्र, शिवसेना जर काँग्रेससोबत जाऊ शकते तर राजकारणात काहीही होऊ शकते हा संकेत शिवसेनेनेच दिला आहे. त्यामुळे राजकारणात काय होईल हे सांगता येत नाही, असं दरेकर म्हणाले. राऊत सातत्याने फडणवीसांवर टीका करत होते. त्यामुळे कटुताही आली होती. ही कटुता कमी करण्यासाठी फडणवीसांसोबत त्यांना सल्लामसलत करावी वाटली असेल तर त्याचं स्वागतच आहे, असंही ते म्हणाले.

राऊतांनी ‘सामना’साठी देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यावर या मुलाखतीसाठी एकदा भेटण्याचे ठरले होते. ती संपूर्ण मुलाखत अनएडिटेड जावी, अशी फडणवीस यांची इच्छा असल्याने एकदा भेटून प्रारूप ठरविण्यासाठी ही भेट झाली. बिहार निवडणुकीतून परतल्यानंतर ही मुलाखत देण्याचे फडणवीस यांनी त्यांना सांगितले आहे. या भेटीला कुठलाही राजकीय संदर्भ नाही, असंही स्पष्टीकरण दरेकर यांनी दिलं.

भाजप नेहमी मूल्य आणि तत्त्वांना महत्त्व देणारा पक्ष आहे. त्यामुळे जनतेला जी भूमिका भावते तीच भूमिका भाजप घेत असतो. राऊत-फडणवीस भेटीवर मला भाष्य करता येणार नाही. कारण राऊत उद्या भेट झाल्याचा इन्कारही करतील. आम्ही आज फडणवीसांसोबत ‘आत्मनिर्भर भारत अभियाना’त एकत्र होतो. त्याआधी ही भेट झाली असेल तर त्याची माहिती नाही, असंही ते म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER