कोरोनारूपी रावणाचा नाश करू या ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून दसऱ्याच्या शुभेच्छा

Uddhav Thackeray- Dussera

मुंबई :- विजयादशमी म्हणजे संकटावर, वाईट प्रवृत्तीवर विजय मिळवण्याची प्रेरणा. यंदाच्या या विजयादशमी म्हणजेच दसऱ्याच्या उत्सवातून सीमोल्लंघन करून विजय खेचून आणण्याची प्रेरणा घेऊन आपण एकजुटीने कोरोना विषाणूरूपी रावणाचा नाश करू या, असे आवाहन करतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्यातील जनतेला दसऱ्याच्या पूर्वसंध्येला शुभेच्छा दिल्या आहेत.

कोरोना (Corona) संकटावर मात करून महाराष्ट्र नव्या जोमाने भरभराट आणि समृद्धीकडे वाटचाल करेल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. लढवय्या महाराष्ट्र अशी आपली ओळख आहे. आपण अनेकदा संकटांचा यशस्वी मुकाबला केला आहे. त्यामुळे कोरोना विषाणूच्या विरोधातील लढ्यातही आपण सर्व भेद बाजूला ठेवून एकवटले आहोत. कोरोनाच्या संकटातच निसर्गाची अवकृपा झाली; पण या सगळ्या संकटांना न डगमगता सामोरे जात आहोत.

कोरोनाच्या विषाणूला पराजित करण्यासाठी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ (My Family MY Responsibility) मोहीम राबवत आहोत. घराघरांपर्यंत पोहचून विषाणूचाच पाठलाग करून, त्याला रोखण्याचा आपले कोरोना योद्धे  प्रयत्न करत आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी सगळ्यांनीच खूप संयम दाखवला आहे. सर्वच धर्मीयांनी आपले सण, उत्सव घरीच साजरे केले आहेत. उद्या विजयादशमी अर्थात दसऱ्याचा उत्सव साजरा करणार आहोत. दसरा संकटावर, वाईट प्रवृत्तीवर मात करण्यासाठी सीमोल्लंघन करून विजय खेचून आणण्याची प्रेरणा देतो.

त्यामुळे आपल्याला दसरा उत्साहात साजरा करतानाच विषाणूच्या समूळ उच्चाटनासाठी आरोग्य दक्षतेचे, गर्दी न करण्याचे – शारीरिक अंतर राखण्याचे, मास्क वापरण्याचे, वारंवार हात धुण्याच्या सूचनेचे पालन करावे लागेल. अशा प्रयत्नातूनच  आपण कोरोनारूपी रावणाचा नाश करू आणि नव्या जोमाने भरभराटीकडे आणि समृद्धीकडे वाटचाल करू, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

ही बातमी पण वाचा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोरोना लसीचे राजकारण करण्याइतके कोत्या मनाचे नाहीत : संजय राऊत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER