दसऱ्याच्या गर्दीत शुभ दीपावलीचे वर्तमान

Dusherra & Diwali

Shailendra Paranjapeदसऱ्याला सीमोल्लंघन झाले आहे आणि अपेक्षेप्रमाणे जीवनाच्या विविध क्षेत्रांत अनलॉकपर्व, मिशन बिगिन अगेनही जवळपास सुरू झालेय. मात्र, ते होताना परिस्थितीच्या रेट्यामुळं गोष्टी होताहेत, निर्णय होताहेत हे स्पष्टपणे जाणवतेय. म्हणजे असं की, लोक आता ऐकतच नाहीत तर काय, मग द्या परवानगी, असं काही तरी घडतंय अशीच लोकांची भावना होतेय. कारण सरकार म्हणून काही व्यवस्था अस्तित्वात आहे, असं जाणवत नाहीये आणि म्हणूनच निर्णयांमधल्या विसंगती आता मिशन बिगिन अगेनच्या शेवटच्या पर्वातही दिसताहेत.

हळू हळू उद्योगधंदे सुरू झाले. दुकानंही सुरू झाली. हॉटेलं आणि बार आता रात्री साडेअकरापर्यंत सुरू राहणार. जिम, क्रीडांगणंही खुली झाली. आता उद्यानं या आठवड्यात सुरू होताहेत. हे सगळं होत असताना देऊळ बंद हे धोरण का आणि कशासाठी, असा प्रश्न पडतो.

मुळात देवळात जाणारे लोक मुख्यत्वे सिनिअर सिटिझन असतात. लोक घरी बसून कंटाळलेले आहेत. शाळा ऑनलाईन असल्याने मध्यमवर्गीयांच्या घरात वायफाय, ऑनलाईनमुळे डेटायुसेज वाढतोय. टीव्हीवर ज्येष्ठ नारिकांना हवं ती मालिका किंवा कार्यक्रम बघायला मिळणं तसं अवघडच. त्यामुळे चार घटका देवळात जाऊन प्रवचनात, कीर्तनात मन रमवलं तर कोरोना (Corona) कसा काय पसरणार आहे, हे लक्षात येत नाही.

हॉटेल्स, ग्रंथालये, मंगल कार्यालयवाले, जिमचालक, मद्यविक्री दुकानं आणि बार्स यांची शिष्टमंडळे भेटली की सरकार त्यांच्यासमोर नमते. एसओपी किंवा स्टॅण्डर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर तयार करते आणि त्या त्या क्षेत्रांना मिशन बिगिन अगेनला परवानगी देते. पण देवळांसाठी भारतीय जनता पक्ष हा प्रमुख विरोधी पक्ष मागणी करत असल्याने देऊळ बंद हाच सरकारचा हट्ट दिसतो. त्यातून मंदिरचालक आणि संबंधित मोठ्या देवस्थानांवर होणाऱ्या नेमणुका राजकीय स्वरूपाच्या होत असल्याने ते सरकारविरोधात आवाज उठवणे अशक्यच आहे. परिणामी, सारे देवही आपापल्या देवळात भक्तांच्या प्रतीक्षेत आहेत.

मधेच एकदा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गटाचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी पंढरपूरला लॉकडाऊन काळात हजारो लोक जमवून देऊळ बंदविरुद्ध आवाज उठवला. तेव्हा त्यांच्यासह मोजक्या भक्तांचा मंदिरप्रवेश मुखदर्शनही झालं. पण देवळं काही उघडलेली नाहीत.

कोरोनाच्या पहिल्या दोन लॉकडाऊननंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आता देशपातळीवर निर्णयांची गरज नाही. उलट जिल्हापातळीवर कोरोनाशी मुकाबला करण्यासंदर्भातले निर्णय घेतले जायला हवेत, असं सांगितलं होतं. विकेंद्रित पद्धतीने निर्णय होताना दिसत नाहीत. उलट राजकीय अहमहमिकेमुळे केंद्र सरकारने शाळा सुरू केल्या तरी महाराष्ट्रात त्या संदर्भात दिवाळीनंतरच विचार करू, असं राज्य सरकारनं स्पष्ट केलंय. केंद्र सरकारनं १५ ऑक्टोबरलाच सिनेमागृहे सुरू केलीत आणि दिल्लीसह इतरत्र ती सुरूही झालीत. पण महाराष्ट्रात अजूनही सिनेमागृहे, नाट्यगृहे उघडण्याची प्रतीक्षाच आहे.

शाळा, सिनेमागृहे सुरू होतील तेव्हा होतील; पण बाजारपेठा मात्र पूर्वीसारख्या फुलू लागल्यात. किमान दसऱ्याच्या पूर्वसंध्येला आणि एकूणच नवरात्रीच्या नऊ दिवसांत पुण्याच्या बाजारपेठा गर्दीनं फुलून गेल्या होत्या.

व्यापारी, दुकानदार कधीच धंदा जोरात आहे, असं सांगत नाहीत; पण मिशन बिगिन अगेन नक्कीच झालंय, हे मात्र मान्य करताहेत. त्यामुळे अर्थचक्राची गती यायला वेळ लागणार असला तरी दिवाळी नक्कीच निराशेची जाणार नाहीये, हेही दसऱ्याच्या गर्दीनं स्पष्ट झालंय. ता. क. दोन शब्दांत दोन संस्कृती – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक दसरा मार्गदर्शनात देशवासीयांना सांगतात की, सर्व क्षेत्रांत चीनला मागे टाकण्याची कामगिरी आपण करायला हवी. मुख्यमंत्री आव्हान देतात की, हिंमत असली तर सरकार पाडून दाखवा. तात्पर्य – विजयादशमीला हिंदुत्वाचा झेंडा घेतलेल्यांची दिशा पुन्हा एकदा स्पष्ट झालीय. जो जे वांछील तो ते लाहो…

ही बातमी पण वाचा : चला, सारे विजयाकडे कूच करू या…

Disclaimer :-‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER