शुभेच्छा दिवाळीच्या मनांकडून……. मनांकडे !

Diwali Mnamanachi

पाहता पाहता दिवाळी आली .आकाश दिवे (Akash Dive) ,पणत्या ,रांगोळ्या (Rangoli) ,सजावट आपण सगळ्यांनीच ,तुम्ही आम्ही केली .ही सगळी आनंदाची बाह्यरूप !फराळांची देवघेव ,ओवाळणी ,परस्परांना भेटी देणे आणि घेणे ही सगळी एकमेकांबद्दल मनातून वाटणाऱ्या भावनांची केवळ प्रतीक असतात .

फ्रेंड्स ! खरी दिवाळी असते मनामनात ! आपल्या एकमेकांबद्दल वाटणारा स्नेह, प्रेम ,माया ,वात्सल्य जपलेपणा हीच खरी दिवाळी मनामनाची…..!

आपण जे माझे मन म्हणतो ते मुळात अस्तित्वातच नाही, जे आहे ते कलेक्टिव माईंड किंवा कलेक्टिव्ह कॉन्शसनेस . अत्यंत क्रांतिकारी विचार प.पू. विमलाबाई ठकार यांनी समाजापुढे मांडला. त्यांच्या मते सगळेच आम्ही लोक ,”मी माझे मला “वर अत्यंत प्रेम करतो. पण सखोल बघितलं तर विज्ञान आणि अध्यात्माचा आधार घेऊनही आपली मानसिकता ही सगळी दुसऱ्यांनी निर्माण केलेल्या संस्कारांचा परिणाम असते .आपल्या जन्मास कारणीभूत असलेल्या वेळी आईवडीलांची मनस्थिती, ते जन्म होण्याच्या क्षणापर्यंत चे अनुभव. आई वडील, नातेवाईक ,शिक्षण परिस्थिती, वातावरण, समाज या सगळ्यांचे संस्कार नकळत आपल्या वर होऊन आपली मानसिकता वा स्वभाव बनलेला असतो .आपण मात्र या बिनबुडाच्या मी पणाला कवटाळून बसलेलो असतो. मग लहान बाळाच्या हातातून टीव्हीचा रिमोट काढून घ्यायचा असेल तर जसे त्याला जास्त इंटरेस्टिंग खेळणी पर्याय म्हणून द्यावी लागतात ,त्याचप्रमाणे माणसाच्या हाती ही स्वयंनिर्मित मानसिकता द्यायला हवी.
जर मग स्वतःच्या खऱ्या ओळखीतून घडवलेली मानसिकता निर्माण करायची असेल तर काय करायला लागेल?

मन, मानसिकता व जगणं या तिघांच्या सु संवादातून आपण समृद्ध जीवन जगू शकतो. या तीन घटकांचा संबंध कसा आहे? तर मन म्हणजे शेत, मानसिकता म्हणजे बियाणे, आणि मशागत म्हणजे जगणं. यात फक्त शेत चांगल असून चालत नाही ,बियाणे चांगल असूनही भागत नाही तर मशागत ही उत्तम हवी .एकूण तिघांचा योग्य संयोग हवा. परंतु जीवनाला प्रतिसाद देणारी मानसिकता हे पूर्णपणे मानवनिर्मित म्हणजे संस्कार, अनुवंशिकता व कर्मसिद्धांत असून त्यामुळे त्यात विविधता आढळत.
मग भ्रामक मानसिकतेतून स्व आधारित मानसिकतेत प्रवेश करण्याचा उपाय काय ?
YES ! I CAN ची भावना निर्माण होणे. बरेचदा खूप अनुभव आणि ज्ञानाने समृद्ध झाल्यावरही माणसाला अचानक आत्मविश्वासाची कमी वाटू

लागते .नकारात्मकता जाणवते. काय असेल याचे कारण ?बरेचदा असे आढळते, आपली पूर्वीची कामगिरी किंवा यश हेच बरेचदा आपली अडचण ठरत असते .आपले धेय्यपूर्ण करण्यासाठी ,अडचणींवर मात करत झपाटून आपण यश मिळवतो. आपोआपच YES !I CAN ची भावना आपण कमावतोही. पण कालांतराने जग, मूल्यव्यवस्था तंत्रज्ञान बदलते. त्यानुसार स्वतः बदल करत राहिल्यास नवीन ध्येय पण आपण मिळवू शकतो .मात्र आता अहंकार आडवा येतो. परिस्थितीशी जुळवून घ्यायला मन नाकारत .त्यासाठी जास्त मानसिक व शारीरिक कष्ट पडतात .अपयशाची भीती वाटते आणि परत यशासाठी चा अट्टाहास सुरू होतो तुलना करायला सुरवात होते ,त्यातूनच हळूहळू स्पर्धेला सुरुवात होऊन बिघडतात. मग काय करता येईल ?

परत आता या दुष्टचक्रात अडकला यायचं नाहीये .पण त्यासाठी कम्फर्ट सोडून काही गोष्टी जागरूकतेने कराव्या लागतील, म्हणूनच आता हे सगळं करताना कृतज्ञतेची भावना आवश्यक आहे की ज्यामुळे आपोआपच अहंकार काढता पाय घेतो. मला आत्मविश्वास कोणी कोणी दिला ते पालक, गुरुजन ,आप्तेष्ट, समाज आणि हे सगळं निर्माण करणारी सृष्टी यासह सगळ्या बाबतची कृतज्ञता व्यक्त व्हायला हवी. त्यातूनच निर्भयता येईल आणि सजगता पण वाढेल. आयुष्य खूप छान उपभोगता येईल.

गोष्ट प्रत्येकात एक असामान्यत्व असतं !फक्त शोधावआणि जोपासावा लागतं .म्हणूनच विपरित परिस्थितीतून वाट काढणारी एखादी महिला अनेक पारितोषिके मिळवून स्वतःचं काहीतरी निर्माण करू शकते हॅलो सिनेमातील डाऊन सिंड्रोम असलेली नायिका हेही त्याचंच एक उदाहरण ! तिचे यश दुसरे तिसरे काही नाही तर त्यांना त्यांच्यातल्या असामान्य त्याची जाणीव झालेली आहे आणि त्यांनी ते जोपासली आहे. कंटाळा आढळणाऱ्या क्षणीच जर आपण आपल्या आतला आवाज ऐकला तर त्या कंटाल्यामागचे ,आळशीपणामागचे सामर्थ्यशाली क्षण आपल्याला दिसतात. तेच आपल्याला सामान्यत्वाकडून असामान्यत्वाकडे प्रवास घडवतात.

नैसर्गिक सगळ्याच विकासाची दिशा ही खरंतर आतून बाहेर अशीच असते.केवळ मनुष्याच्या बाबतीत मात्र जन्म ही एकच नैसर्गिक प्रक्रिया सोडली तर बाकी गोष्टी या बाह्य प्रतिसादातून घडतात.

कृतज्ञता जशी गरजेची तशी आतल्या आवाजाला प्रमाण म्हणून कंटाळा ,आळस या क्षणाला दूर सारत आपले सामर्थ्य जाणून घेत राहणे हीच आपली मानसिकता जोपासणे होय.

अनेक अपंग विद्यार्थी, अंध विद्यार्थी जेव्हा बरेचदा स्टेज परफॉर्मन्स दाखवतात, तेव्हा कुठली ऊर्जा असते त्यांच्याजवळ? खरतर निर्यातीमुळे दुसऱ्यांच्या सहानुभूती वर जगावे लागते. मात्र त्याचे रूपांतर करून अशा व्यक्ती आज खूप लोकांच्या प्रेरणास्थान बनतात हाच तो स्वत्वाचा सिद्धांत !

आपल्याकडे जे काही आहे ,त्याची शिदोरी घेऊन स्वप्नांच्या दिशेने चालत जाणे. एकदा का ही स्वत्वाची मशाल पेटली ,की कुठलीच नियतीची तुफान ही विझवू शकत नाही.हे स्वत्व आपले आपल्या जवळच असते फक्त गरज असते विस्तवावरची राख योग्य वेळी फुंकर घालून आपण जसे फुलणारे अंगार पाहू शकतो ,त्याचप्रमाणे आपण फक्त स्वत्वा वरची राख काढायचे काम करायची

तांपुर्याला जवारी लावतात. तारा बदलतात, खुंट्या नीट लावतात, मग एक तार छेडली की बाकीच्या तारा झंकारतात. आपल्या जगण्याची व जीवनातल्या प्रत्येक संबंधांची अशी छान जवारी लागली तर प्रत्येक संबंधातून उर्जा देणारे सुंदर सूर् अाकारतील.

बरेचदा अगदी रक्ताची, घट्ट मैत्रिची स्नेहाची नाती काही काळानंतर त्यांची जवारी निघून जाते. कित्येक अशी करपलेली कोणत्या झालेली नाती फक्त निभावली जात असतात. म्हणूनच त्यांना जवारी लावण्यासाठीच असतात या शुभेच्छा दिवाळीच्या ! मनानकडून…. मनानकडे !!आणि हीच खरी दिवाळी मनामनांची !!!

मानसी गिरीश फडके.
समुपदेशक व सायकोथेरपिस्ट.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER