‘लाख’ मोलाचा आनंद

Sharad Kelkar

एकच हिट, वातावरण टाइट अशी सध्याच्याघडीला कुणाविषयी बोलायचं झालं तर अभिनेता शरद केळकर याचे नाव घ्यावे लागेल. भारंभार सिनेमे आणि रोल न करता एकच अशी भूमिका निवडायची आणि निभवायची की त्या सिनेमातील हिरोपेक्षा किंवा हिरोइतकच शरदच्या नावाभोवतीही वलय येतं. नेमकी काय जादू आहे माहित नाही, पण शरदचा कोणताही सिनेमा बघा, शरद हिरो नसतोच, पण प्रत्येक व्यक्तीरेखेत तो भाव खाऊन जातो आणि त्यामुळेच त्याच्या फॅन फॉलोइंगमध्ये दिवसेंदिवस वाढच होत आहे. नुकतेच त्याचे इन्स्टा पेजवर पाच लाख फॉलोअर्स झाले आणि हा लाख मोलाचा आनंद साजरा करताना शरदने याचे क्रेडिट चाहत्यांनाच देत आभार मानले.

रामलीला सिनेमातील वयापेक्षा मोठ्या माणसाची भूमिका असो किंवा हाऊसफुल्ल फोरमधला खलनायक सूर्यभान. मराठीमध्ये ब्लॉकबस्टर ठरलेल्या लय भारी सिनेमातील माऊली रितेश देशमुखच्या तोंडी असलेल्या संग्राम, हा चेहरा लक्षात ठेव संग्राम या संवादातील संग्राम म्हणजेच शरद केळकरच. मोहंजोदरो सिनेमातील ऐतिहासिक रूपात आणि तानाजी मालुसरे सिनेमात दस्तूरखुद्द छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका पेलणारा आणि टाळ्या घेणाराही शरदच होता. सध्या ज्या सिनेमाची जोरदार चर्चा सुरू आहे त्या लक्ष्मी या सिनेमात तृतीयपंथीय लक्ष्मीला अभिनयाने न्याय देण्यात शरदच्या कसदार अभिनयाचीच बाजी आहे.

शरद सांगतो, खरं सांगायचं तर मी सिनेमाची निवड करताना त्याची कथा, तो प्रेक्षकांना का आवडेल याचा विचार करताना त्या सिनेमातील मुख्य गाभा याकडे बघूनच माझी भूमिका स्वीकारतो. एकतर मी खलनायक असतो किंवा सहकलाकार. पण मला इतकेच माहिती आहे, सिनेमाचा नायक ही त्या सिनेमाची कथा, संवाद, मांडणी याच गोष्टी असतात. मी नायक नसतानाही मला चाहत्यांचे प्रेम मिळते, माझ्या सीनवर प्रेक्षक टाळ्या वाजवतात, माझे सीन प्रेक्षक जीव ओतून पाहतात हेच माझ्यासाठी खूप आहे. मला नायकाचा रोल देणार असाल तरच मी सिनेमा करेन असं म्हणत बसलो असतो तर आजपर्यंत जे काम माझ्या हातून झाले आहे ते कधीच झाले नसते. तानाजी या सिनेमात मला शिवाजी महाराजांची भूमिका करताना खूप दडपण आलं होतं. एकतर हा सिनेमा शिवाजी महाराज आणि सेनापती तानाजी यांच्यातील भावनिक नात्यावरही बेतलेला होता. मी यापूर्वी शिवाजी महाराजांची भूमिका केलेल्या कलाकारांचे काम पाहिले आहे. पडद्यावर शिवाजी महाराज साकारणे सोपे नव्हते. पण शिवाजी या नावातच इतकी ताकद आहे की माझ्याकडून त्या भूमिकेला न्याय देण्याचे बळ मला आले.

लय भारी सिनेमातील संग्रामने शरदला खूप लोकप्रियता दिली. तेव्हापासूनच शरदच्या चाहत्यांची सोशलमीडियावरील संख्या वाढते आहे. मूळचा ग्वाल्हेरचा असलेला शरद अभिनयातच स्थिरावला आहे. खरंतर त्याने ग्वाल्हेरमधून एमबीएचे शिक्षण घेतले आहे. दूरदर्शनवरील आक्रोश या कार्यक्रमातून शरदने छोट्या पडद्यावर एन्ट्री घेतली आणि आजपर्यंत मोजके पण लक्षात राहील असे काम करत त्याचा प्रवास सुरू आहे. थ्री पर्पलद्वारे त्याने शॉर्टफिल्मच्या जगात पाऊल टाकले. फॅमिलीमॅन या अॅमेझॉनच्या प्राइम सिरीजमध्येही शरद होता.

पाच लाख फॉलोअर्सचा टप्पा गाठल्यावर हा आनंद शरदने खास त्याच्या इन्स्टा पेजवर शेअर केला आहे. त्यासाठी पाच हजार के असे लिहिलेल्या गोल्डन बलूनसोबतचा फोटोही त्याने त्याच्या चाहत्यांसाठी दिवाळीची ट्रीट दिला आहे. भगव्या रंगाच्या कुर्त्यातील मस्त फोटोमध्ये दिलखुलास हसत लाखो चाहत्यांनी केलेला हा प्रेमाचा वर्षाव हेच माझं दिवाळीचं गिफ्ट आहे असं शरद सांगतो.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER