इन्स्पिरेशनवाला आनंद !

Happiness with inspiration

“अर्धा ग्लास रिकामा की अर्धा भरलेला ?”असे फसवे प्रश्न आयुष्यात नेहमीच प्रत्येकाला पडत असतात. कभी खुशी कभी गम हे आयुष्यात सुरूच असते, कंटाळवाणं होतं असं वाटता वाटता आपण लगेच दुसर्‍या कुठल्या तरी कामात गुरफटून जातो. समोर आलेल्या परिस्थितीशी कधी नेहमीच्या सवयी प्रमाणे, तर कधी प्रयत्नांनी, कधी लढून आपण तोंड देतो आणि स्वतःला शाबासकी देतो खरी , पण याचा परिणाम आपल्या शरीर, मनावर होतच राहतो. शरीरासाठी शुद्ध हवा, पाणी, अन्न, नियमित झोप या गोष्टी चालूच राहतात पण मनाचं काय ?

कामाचं स्वरूप बदललं ! माणसांचा सहवास कमी झाला. त्यांच्यातील अंतर वाढत गेलं आणि मानसिक आजारही वाढत गेले .सध्याच्या काळात तर” भय इथले संपत नाही “या ओळींप्रमाणे कित्येक दिवस आई वडील सुना मुलं मुली जावई नातवंडे हे परस्परांना भेटू शकलेले नाही. ही म्हातारी माणसं स्वतःला जपतात आहे, आजारापासून स्वतःला सांभाळतात आहे. पण एकटेपणाच्या आजाराचे काय?

वरकरणी सगळं व्यवस्थित सुरू असतं. जगण्याविषयी, आयुष्याविषयी, आसपास वावरणाऱ्या आपल्या माणसांच्या वागण्याचा विषयी देखील. ऑफिसात ही असतं सगळं ठीकठाक.  पण अचानकच अगदी कुठलंही किरकोळ निमित्त होतं आणि आजवर दडवून ठेवलेल्या भावनांचा आपल्याही नकळत स्फोट होऊन जातो. समोरच्याला कळत नाही की असं काय झालं ? आपलं आपल्यालाच त्याचं नीट आकलन होत नाही तर समोरच्याला कसं वागू हे कसे कळणार ?ही जी वर्तन समस्या आहे ती आहे आजच्या गतिमान घाईगर्दीतील जगण्याला दिलेली देणगी ! ही देणगी स्वीकारणं व ना कारणही आपल्या हाती नाही .या ना त्या मार्गाने ती आपल्या नकळत मनामध्ये शिरलेली असते .मात्र तिच्यावर मात करणं निश्चितच आपल्या हाती आहे.

बरेचदा आपलं नेमकं काय बिनसलं आहे याचा आढावा वेळ घेतला जात नाही आणि मग प्रश्न वाढत जातात तब्येतीच्या तक्रारी, पाठदुखी, डोकेदुखी ,कामावर लक्ष न लागणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सतत चिडचिड होत राहणं असं दुष्टचक्र सुरू होतं. आसपासची माणसं जवळची म्हणून समजून घेतात आणि गप्प बसतात .उगीच आगीत तेल नको म्हणून ! पण याला कुठलं कारण लागत नाही. म्हणून बऱ्याच बायकांच्या बाबतीतमध्ये मेनोपॉज चेंजेस म्हणून दुर्लक्ष केलं जातं. मनाला वाटेल असं आवडेल असं संसाराचं चित्र जोडलेलं असतं. सगळ्यांच्या कौतुकाच्या नजरा ही असतात. पण तरीही,” मी सर्वांसाठी करते किंवा करतो, पण त्यांना काही किंमतच नाही !”अशासारखे वाक्य येतातच. कधी स्वतःवरच चिडणं तर कधी डोळे भरून येणे. कोणी दिलेल्या सरप्राईजलाही उगीचच ब्लेम करणं. आणि मग परत त्याचाही आपल्याला स्वतः लाच त्रास होतो ! Guilt येतं मनामध्ये . हे प्रॉब्लेम वेगवेगळ्या फेज वर जाणवतात.

या घटनेबद्दलच्या आपल्या भावना तीव्र आहेत का ? त्या बऱ्याच काळापर्यंत आपल्याला त्रास त्रागा देत राहतात का ?पोखरत राहतात का ?कितीही मन रमण्याचा प्रयत्न केला तरी जात नाहीत का? आणि त्याचा आपल्या परस्पर संबंधांवर परिणाम होतो आहे का? या सगळ्यांची उत्तरे जर” हो” असतील तर कोणाशी तरी बोलण्याची संवाद साधण्याची गरज असते. जी आपल्याला समजून घेईल आणि वेगळा दृष्टिकोन देईल. आपल्या अशा “भयंकीकरण “करण्याच्या पद्धतीला अटकाव करेल. अशा वेळी गरज असते ती नातेवाईकांची ! मित्र-मैत्रिणी ,मावशी, काकू ,मुलगा कुणीही.

पण आज अशा बऱ्याच रिक्त जागा आपल्या आयुष्यात तयार झालेल्या आहेत. अगदी दररोजच्या जगण्याला या रिकामेपणाने भरून टाकलेले आहे. तसं म्हणाल तर आपल्याला वेळ नाही. दररोजचा रूटीनमध्ये आपण डोकेही वर काढू शकत नाही. आणि मग विकेंडला अतिशय त्रागा त्रागा होतो .किती बोअर आयुष्य आहे काहीच नवीन नाही. असं कुठेतरी वाटायला लागतं. पाश्चिमात्य देशांमध्ये विकेंड हा खूप मनवल्या जातो. पण आपण हा प्रत्येकच विकेंड तसाच मनवू नाही शकतं,ठरवलं तरी ! याला आपले स्वभाव, आपली परिस्थिती,आपली समाज व्यवस्था कारण आहे. काहींना काही अडचणींमुळे आपण ते करू शकत नाही आणि कुढत, रडत बसतो .आपला स्ट्रेस विनाकारण वाढवून ठेवतो .जे नाही त्याचा विचार करण्यापेक्षा जे आहे त्याचा विचारच आपण कधी करत नाही..

आपल्या सणा उत्सवांकडे आपल्या रुटीन मधला एक” ब्रेक” म्हणून का पाहात नाही ? त्याचे धार्मिक महत्त्व आहे, अध्यात्मिक महत्त्वही आहे. पण तेच स्ट्रेस न घेता आपण का पाहू शकत नाही ?.त्याच्या पूर्वीच्या पद्धतीने जर आपल्यावर दबाव आणणाऱ्या असतील तर त्याच्या उद्देशालाच हरताळ फासला जातो आहे. आजच्या काळाप्रमाणे आपल्या परिस्थितीप्रमाणे आजच्या आपल्या जीवन शैली प्रमाणे सणही जर मोल्ड होत असतील तर ते खरं म्हणजे आपल्या पूर्वजांनी आपल्यास सेलिब्रेशन साठी केलेलं एक प्लॅनिंग आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि मग अशा दृष्टीने विचार केल्यानंतर त्यात नवीन पद्धतींचा शोध लागत जातो. त्याच प्रमाणे नवीन काळाचे नवीन सण सण यांची भर आपण घालू शकतो म्हणजेच वाढदिवसापासून प्रमोशन पर्यंत वेगवेगळ्या निमित्तांनी होणारे पार्ट्या किंवा गेट-टुगेदर थोडक्यात माणसं माणसांना भेटणं आणि रोजच्या कामापेक्षा वेगळे काहीतरी करणे, चेंज हेच करमणूक नाही का ?

केसरी टूर च्या वीणा पाटील ह्या देखील आपल्या सगळ्यां प्रमाणे अमिताभच्या फॅन आहेत .या इंस्पिरेशन वाला आनंद बद्दल बोलताना, कौन बनेगा करोडपती च्या एका एपिसोड नंतर त्या म्हणत होत्या की,” वयाची पन्नाशी आली की आपल्याला निवृत्तीचे वेध लागतात .झाला एवढा बस झाला असे विचार आपल्या मनात यायला सुरुवात होते .अशावेळी वयाच्या ६८ व्या वर्षी अमिताभ ने “पिक्चर अभी बाकी है दोस्त !” अशा तऱ्हेचा एक छानसा मनाला उभारी देणारा विचार त्यानी दिला होता. वयाच्या ७५ व्या वर्षी श्रीयुत रतन टाटा जगभर करीत असलेली घोडदौड किंवा खेळाडूंच्या निवृत्तीच्या वयात सचिन तेंडुलकर करीत असलेले एका पाठी एक करीत असलेले विक्रम यावरून हेच दिसते की कर्तृत्व आणि गुणवत्तेच्या इतकेच तुम्ही मनाने किती तरुण आहात हे महत्वाचे ! स्ट्रेस न घेता ,अस्सल घरगुती पद्धतीने हे लोक आपल्या घरच्या लोकांबरोबर उत्सव साजरे करतात .हेच त्याचं कारण असावं.

आपण कुठल्या तणावाखाली आहोत का हे काही गोष्टींवरून लक्षात येतं.

  • खूप अस्वस्थ वाटणं ,झोप न येण, पोटात छातीत मळमळ होणे आणि वैद्यकीय चाचण्या करूनही त्यातून काही निष्पन्न न होणे.
  • जुन्या आठवणी मध्ये सतत रमत राहणं, जुन्या जखमानी पुन्हा पुन्हा घायाळ होणं.
  • सतत हात धुणं, वस्तू पुसत राहणं, पुन्हापुन्हा वस्तू तपासात राहणं वस्तू कुठे ठेवले आहे ते लक्षात न
    रहाणे . सतत झोपून रहावसं वाटतं. रागावर नियंत्रण न राहणे.
  • खूप बोलणं अथवा कुणाशी बोलण्याची इच्छा न होणे. सतत उदास खिन्न वाटण.
  • कुणाचीही सोबत नकोशी वाटणं ,एकट रहाण्याची तीव्र इच्छा होणे, छोट्या छोट्या कारणांसाठी रडू येणं. संशयी वृत्ती वाढणे, कुणाविषयी हि विश्वास न वाटणं, मोकळेपणाने संवाद साधण्यात अडचणी येणे .

आपल्याकडे मानसिक आरोग्य विषयक अतिशय जास्त stigma आहे .अगदी छोट्या गोष्टी पासूनच जर काळजी घेऊन ,लक्ष दिले तर खुपदाच असे प्रश्न कठीण रूप धारण करतच नाही,असेही दिसून येते .बरेच वेळा लोकांना केवळ मन मोकळं करायला एक जागा हवी असते,किंवा नेमका प्रश्न कुठे आहे ? चुकतंय कुठे आणि कुणाचं ?हे सांगणारी त्रयस्थ व्यक्ती ! मग तिच्या आधाराने आपला मार्ग आपल्यालाच शोधता येतो .ही गरज समुपदेशक पूर्ण करतो .मग समुपदेशनाची गरज मला नाही,किंवा मी काही वेडा वगैरे नाही,असा विचार करणे उलट चुकीचे ठरते .आपल्याकडे खरंतर मानसिक अनारोग्य ज्या प्रमाणात आहे, त्यातुलनेत मानसोपचारतज्ञ किंवा समुपदेशक नाहीत. परंतु त्यांची मदत घेण्याकडे कल नाही .त्याबाबत जागृती निर्माण व्हायला हवी.

मानसी गिरीश फडके
(समुपदेशक व सायकोथेरपिस्ट)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER