विवेकाचे फळ तें सुख !

आज सकाळपासून मोबाईलला अगदी उसंत नाही .निमित्त आहे” हॅपी वूमन्स डे ” (Happy Women’s Day) च्या शुभेच्छांचे ! मी ही तितक्याच यांत्रिक पणे एक स्माईल आणि थँक्यू टाकतेय ! का म्हणताय ?

ऐका ! मानवी मन हे स्वच्छंद असत अस म्हणतात. त्यामुळे आपल्या आयुष्यात अनेक अडथळे निर्माण होतात असेही म्हणतात. पण सहज विचार केला तर खरच आपले आपल्या मनावर नियंत्रण आहे का ? साधे, हो साधेच! कोरोनाविषाणू ला रोखायचे म्हटले तर मास्क बांधायला हवा, सामाजिक अंतर पाळावं, स्वच्छता पाळावी की ज्यामुळे स्वतःच्या आयुष्याला धोका राहणार नाही. पण अहो ! एवढाही काबू ठेवल्या जात नाही स्वतःवर ! मग याच विषाणूचा काय घेऊन बसलात. ग्रामीण काय व शहरी उच्चशिक्षित काय, महिलांना आज वाढत्या अत्याचारांना पावलोपावली सहन करावा लागत आहे. औरंगाबादेतील कोविड सेंटर मधील लज्जास्पद घटनेचे पडसाद विधिमंडळामध्ये ही उमटले. उस्मानाबादेत पोलिसांच्या जाचाला कंटाळून तिने आपली जीवनयात्रा संपवली. बीड मधील एका प्राध्यापिकेने मात्र अश्लील व्हिडिओ पाठवणाऱ्या सहकाऱ्याला चार वर्षे न्यायालयात लढा देऊन पाच वर्षे तुरुंगात खडे फोडायला पाठवलं. जोपर्यंत अशा विकृत वासनेच्या विषाणूंना आळा घातला जात नाही तोपर्यंत केवळ आम्ही महिला दिनाच्या शुभेच्छा घेऊन आणि देऊन काय साधणार आहोत? ज्यामुळे एका स्त्रीच आयुष्य, तिचं भावविश्व, तिचं संपूर्ण कुटुंब आणि एवढंच नाही तर आपोआपच समाज सुद्धा विनाशाकडे जातो. असा महाभयंकर विषाणू! त्याला आळा घालण्यासाठी सुद्धा मनावर नियंत्रण नसेल तर कुठले वूमन्स डे? अन कुठलं काय?

मी विचार करत होते, आणि मोबाईलवर मागे मागेही जात होते. तेवढ्यात मला यूरेका म्हणावसं वाटलं. खरंच खूप शांतता आली मनाला ! मेसेज होता दासनवमीचा ! श्री समर्थ रामदास स्वामींनी संबंधीच्या काही कथा शेअर केलेल्या होत्या. आणि मला आशेचा किरण दिसला. हो !उत्तर आहे ! या विषाणू विरुद्ध ही लढण्यासाठी !

फ्रेंड्स ! आपल्या स्वच्छंदी मनावर नियंत्रण नसल्यामुळे आपल्याला आपला स्वतःचा, स्व अस्तित्वाचा देखील विसर पडत जातो. मनाचा तीन पातळ्यांवर विचार करता येतो आणि या मनाच्या तीन पातळ्या दिवसभरात अनेकदा बदलाव्या लागतात. त्या म्हणजे शरीर, मन आणि आत्मा ! शरीर पातळीवर मन असताना कामवासना तर मनाच्या पातळीवर असतांना प्रेम जन्म घेत! जेव्हा आत्मिक पातळीवर मन जातो तिथे भक्ती उमलून येते. म्हणूनच कोणत्याही एका पातळीवर राहून कसं चालेल? दिवसभरात आपण या तीन पातळ्यांवर जात राहिलो पाहिजे. कामवासनेला योग्य दिशेने वळवले तर आवेश आणि निर्धार निर्माण होतो. प्रेमातली पवित्रता जीवन आधार बनते आणि भक्ती म्हणजे परमेश्वरावरील पूर्ण श्रद्धा आणि विश्वास याने जीवन उजळते. तीनही पातळ्यांवर सहजतेने बदल केला गेला तर समतोल साधला जातो.

श्री समर्थ रामदास स्वामींच्या बाबतीत विचार केला तर त्यांनी या मनाच्या पातळ्यांवर काम केलेलं दिसतं. त्यांचं साहित्य करुणाष्टक, मनाचे श्लोक, दासबोध आणि इतर अनेक गोष्टींच्या लिखाणातून श्री रामदास स्वामींचे विचार लोकांपर्यंत पोहोचले. इतर संतांच्या लिखाणापेक्षा त्यांच्या दिखता मधला एक वेगळेपणा म्हणजे मानवी जीवनावर परिणाम करणाऱ्या माणसाच्या वृत्ती, विचार, भावना आणि त्यामुळे घडणारे वर्तन यावरही त्यांनी सरळ सरळ भाष्य केले. भक्ति, त्याग, ध्यास आणि शेवटी मोक्षाकडे होणारा प्रवास हा तसाच असला तरीही त्यांनी प्रपंचातून परमार्थाकडे होणारी वाटचाल शिकवली. एका अर्थाने सामाजिक आणि राजकीय संत म्हणून पण त्यांचे वेगळेपण लक्षात येते. त्यांचे साहित्य वाचताना असं वाटतं की समर्थच स्वतः आपल्याला ते सांगत आहेत अशा एका समुपदेशकाच्या भूमिकेतून तर ते सांगतातच पण त्याचबरोबर संतवाणी चे महत्व यामुळेच त्यांचे स्वानुभवाचे बोल असतात. रामदासांनी देह ठेवण्यात यावेळी त्यांचा अखेरचा संदेशच हा दिला तेव्हा ते म्हणाले की त्यांच्या दासबोध ग्रंथरूपाने ते निरंतर इथे वास करून असतील.

मानसशास्त्र हे मनाचं शास्त्र असून त्याचा संबंध प्रत्यक्ष आत्म्याशी आहे. समर्थांच्या साहित्यातला मानसशास्त्रीय दृष्टिकोन या सूक्ष्म व स्थूल व अध्यात्मिक पातळीवरचा आहे. पहिला भाग आपल्या मना संबंधीचा म्हणजे त्याची दृष्टिकोन आणि प्रेरणा. दुसरा म्हणजे मनुष्य आणि समाज यांच्यातला आणि त्यांच्यातील आपापसातील संबंधाचा ! म्हणजे तिचे स्वतंत्र वर्तन आणि तो जेव्हा परस्पर संवाद साधतो तेव्हा असे त्याचे वर्तन या सगळ्याचा अभ्यास समर्थांनी केला. ते करण्यासाठी त्यांची प्रयोगशाळा म्हणजे त्यांनी जी भारत भर पायी यात्रा केली त्यातूनच ते ज्या लोकांना भेटले, त्यावरून त्यांनी निष्कर्ष काढले. आणि या अभ्यासाचा तार्किक निष्कर्ष म्हणजे ईश्वरदर्शन ! की जे प्रत्येक व्यक्तीचे आयुष्याचे कोण असायला हवे. समर्थांनी या तिन्ही पातळ्यांवर ची गुंफण एका पार्श्वभूमीवर करीत नेली आहे.

यातील मूळ कल्पना म्हणजे पूर्ण विश्व एकाच वैश्विक सत्यात सामावलं आहे आणि ते म्हणजे आत्मा ,ज्यात स्वत:ला विरघळून टाकल्यास पूर्ण आनंदाचा अनुभव येतो आणि मानवी जीवनाची सार्थकता यातच आहे. * दुसरे श्रेयस म्हणजे इच्छा ! जर समर्थांचा बोध अमलात आणला तर याची पूर्तता होते. या पार्श्‍वभूमीवर एक सुंदर चित्र या कल्पनेत झालेल दिसते .ते म्हणजे एक संपूर्ण परिपूर्ण पुरुष. त्यानंतर सामाजिक एकात्मता आणि शेवटी वैश्विक दर्शन. इतका साधा सरळ आणि पवित्र असलेल्या मानसशास्त्रीय दृष्टिकोन समर्थांच्या साहित्यातून जाणवतो. हे सर्व “प्रपंचातून परमार्थाकडे” नेत समर्थ सांगतात.

समर्थांचे स्वप्न साकार व्हायचे तर याच्या मध्यभागी मानव आहे. असा मानव की ज्यांच्या काही गोष्टींमुळे त्याला त्रास होतो तर काहींनी प्रगती होते मग जाते. त्याला त्रास होतो त्या जुन्या गोष्टी नाहीशा करून नव्या काही चांगल्या गोष्टींसाठी प्रेरित केलं तर माणसाचे अंतर्गत व्यक्तिमत्व विकसित होते. या अंतर्गत व्यक्तिमत्त्वाचा लोकांवर चांगला प्रभाव पडतो. म्हणूनच त्यांच्या अंतर्गत पावर सेंटर जे “मन ” आहे, त्यावर काम करायला हवा शरीरापेक्षा मन महत्त्वाचं तर मनापेक्षा आत्मा!मन जेव्हा उच्च वैश्विक पातळीशी संपर्कात येतात तेव्हा त्याचा स्वतःवर व इतरांच्याही मनावर काबू येतो. जो इतरांसाठी पथ्य दर्शनाचे काम करतो.

अशा व्यक्तिमत्त्वाची निर्मिती करताना समाजासाठी विविध कार्य करावी लागतात .निस्वार्थीपणाने, व्यापक दृष्टिकोनातून विचार करीत, दुसऱ्याच्या चांगल्यासाठी त्याग करायची तयारी देखील, कुठल्याही अपेक्षे शिवाय ठेवावी लागते. हरिकथा करून लोकांना श्रद्धेच्या मार्गावरून यावे लागते. समर्थ हे करायला सांगतात, कारण त्यातून स्वतःच्या मनात डोकावून बघता येत, स्वतःबद्दल अभ्यास होऊन खरे पवित्र मन निर्माण होते. मनोबोध, मनाचे श्लोक हे याचेच उदाहरण आहे. त्यांनी स्वतःच्या मनाला बोध केला आहे. अगदी स्वतःला सर्वसामान्य कल्पून ! त्यामुळे ते केवळ दुसऱ्यांना पांडित्य शिकवत नाही हे कळते. जागोजागी मठ, व्यायाम शाळा व हनुमानाचे मंदिर स्थापन करण्यामागे ले आणि श्रीराम प्रभूंचा आदर्श समोर मांडण्यात मागे स्त्रियाप्रतीची निकोप कृती, शूरपणा, ब्रह्मचर्य बलोपासना त्यातून त्यांनी आपल्या कार्याला ही सामर्थ्यवान करून व्यक्तीला त्याच्या ध्येयाप्रत नेण्याचा प्रयत्न केलेला आहे. चार पुरुषार्थ म्हणजे धर्म अर्थ काम मोक्ष! यातील पहिले तीन साधले तर आपोआपच मोक्ष साधतो. परंतु धर्मातील करावे आणि करू नये अशी नीती तत्त्व अभ्यासली तरीही मोक्ष मिळतो. म्हणूनच त्यांनी “मना धर्मता नीति सोडू नको हो , मनात पाप संकल्प सोडूनि द्यावा, मना सत्य संकल्प जीवी धरावा l असे म्हटले आहे. अर्थ याबाबतीत ते म्हणतात नको रे द्रव्य ते पुढीलांचे, अति स्वार्थबुद्धी न रे पाप साचे l

विवेक !विवेक म्हणजे सारासार विवेक बुद्धीचा वापर करणे हा माणसात अंतर्भूत असतो तोच त्याला रुजवावं लागतं जोपासावा लागतं त्याचं चिंतन करावं लागतं ते करायला सांगणारे समर्थ रामदास स्वामी ! यांनी विवेक ही मानवाला दिलेली ही एक देणगीच आहे. सत्संग आणि विचार साधना यामुळे मनाला योग्य अयोग्य, सत्य असा त्यातला भेद कळतो. जो बोलण्याआधी विचार करतो तो लोकांना आवडतो. असा अध्यात्मिक सराव करण्याचा मार्ग सांगताना ते सर्वप्रथम श्रवणावर भर देतात.

समर्थांनी सांगितलेल्या या तीन पातळ्यांवर सुंदर समतोल साधला गेला, तर आत्ताच या कठीण परिस्थितीवर असलेलं ते एक उत्तर असणार आहे. कुणी म्हणेल हे केवळ स्वप्न आहे. पण समर्थांनी म्हटलंच आहे त्याप्रमाणे,” येत्न तोचि देव जाणावा !”

फ्रेंड्स ! पुढचा महिला दिन तरी, विवेकाने वागणारयांचा, स्वच्छंदी मनाला आवर घालणारयांचा असल्याने खूप आनंदाने आणि मोकळेपणाने आपण परस्परांना महिला दिनाच्या शुभेच्छा देऊ शकू अशी आशा करते.

ही बातमी पण वाचा : मॅजिक ऑफ टायडींग अप !

मानसी गिरीश फडके
(समुपदेशक व सायकोथेरपिस्ट)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER