हॕमिल्टन व जोकोवीच यांनी केली विश्वविक्रमाची बरोबरी

novak djokovic & Lewis Hamilton

खेळांच्या दुनियेत 15 रोजीचा रविवार विशेष ठरला. यादिवशी ब्रिटीश मोटार रेसिंगपटू (Formula 1) लुईस हॕमिल्टन (Lewis Hamilton) व सर्बियाचा टेनिसपटू (Tennis) नोव्हाक जोकोवीच (Novak Djokovic) यांनी आपआपल्या खेळातील दीर्घकालीन विशेष विश्वविक्रमाची बरोबरी केली.

जोकोवीच हा त्याच्या कारकिर्दीत सहाव्यांदा वर्षअखेर नंबर वन असल्याची अधिकृत घोषणा रविवारी करण्यात आली आणि यासह त्याने अमेरिकेच्या पीट सॕम्प्रासच्या 1998 पासूनच्या विक्रमाची बरोबरी केली तर लुईस हॕमिल्टन याने जर्मनीच्या मायकेल शुमाकरच्या सात वर्ल्ड चॕम्पियनशीपच्या विक्रमाची बरोबरी केली. हा विक्रम 2004 पासून शुमाकरच्या नावावर कायम होता.

योगायोगाने आधीचे दोन्ही विश्वविक्रमवीर पीट सॕम्प्रास व मायकेल शुमाकर या दोघांनी सलग पाच वर्ष हे नंबर वनचे यश नोंदवले आहे. पीट सॕम्प्रास हा तर 1993 ते 98 अशी सलग सहा वर्षे वर्षअखेर नंबर वन होता तर शुमाकर हा 2000 ते 2004 असा सलग पाच वर्षे वर्ल्ड चॕम्पियन होता. त्याच्याआधीची त्याची दोन विजेतेपदं 1994 व 95 मधील होती.

जोकोवीच व हॕमिल्टन यांनी या दोघांच्या विक्रमाची बरोबरी केली असली तरी त्यांना त्यांच्यासारखे सलग यश मिळवता आलेले नाही. जोकोवीच 2011, 12, 14, 15,आणि आता 2018 नंतर वर्षअखेर नंबर वन आहे. तर हॕमिल्टन 2008, 2014, 15 नंतर 2017 ते आता 2020 पर्यंत विश्वविजेता ठरला आहे. गेल्या सलग चार वर्षांपासून हॕमिल्टन वर्ल्ड चॕम्पियन ठरत आला असून त्याला शुमाकरच्या सलग विश्वविजेतेपदाच्या विक्रमाची संधी आहे.

हॕमिल्टनच्या यशाचे वैशिष्ट्य हे यंदाच्या अजून तीन शर्यती बाकी असतानाच त्याचे आपले विश्वविजेतेपद निश्चित केले आहे. जोकोवीचचेही नंबर वन पद व्हिएन्ना मास्टर्स स्पर्धेनंतरच निश्चित झाले होते. पुरुषांच्या व्यावसायीक टेनिस स्पर्धांचे नियंत्रण करणाऱ्या असोसिएशन आॕफ टेनिस प्रोफेशनल्स (एटीपी) ने त्याला एटीपी फायनल्स स्पर्धेवेळी अधिकृत नंबर वनची ट्रॉफी दिली.

हॕमिल्टनने रविवारी इस्तंबूल येथे तर्कीश ग्रँड प्रिक्स जिंकली. त्याचे हे 94 वे ग्रां. प्री. विजेतेपद ठरले. आता जोकोवीचला आणखी एका विक्रमाची संधी आहे. एटीपी फायनल्स स्पर्धा जिंकली तर ही स्पर्धा सर्वाधिक सहा वेळा जिंकण्याच्या राॕजर फेडररच्या विक्रमाची तो बरोबरी करेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER