महाराष्ट्रातील कोरोनाचा फटका हाथी मेरे साथीलाही, रिलीजची तारीख पुढे ढकलली

haathi mere saathi

संपूर्ण देशात विशेषतः महाराष्ट्रात, मुंबईत कोरोनाची दुसरी लाट आली असून कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. या लाटेत बॉलिवूडचे अनेक कलाकार सापडले असल्याने त्यांच्या सिनेमाचे शूटिंग रखडले आहे. संजय लीला भंसाळीलाही कोरोनाची लागण झाली होती पण आता त्याची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आल्याने तो लवकरच त्याच्या गंगुबाई काठियावाडीचे काम सुरु करणार आहे. एकीकडे कलाकार आणि सिनेमाच्या शूटिंगला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका बसला असताना आता तर चक्क एका सिनेमाच्या रिलीजलाही कोरोनाचा फटका बसला आहे. महाराष्ट्रात कोरोना वाढल्याने राणा दग्गुबतीच्या (Rana Daggubati) ‘हाथी मेरे साथी’चे (Haathi Mere Saathi) रिलीज आता पुढे ढकलण्यात आले आहे. विशेष म्हणजे तामिळ आणि तेलुगु भाषेत मात्र हा सिनेमा ठरलेल्या दिवशी रिलीज केला जाणार आहे. या सिनेमाच्या निर्मात्यांनीच याची माहिती सोशल मीडियावर दिली आहे.

‘हाथी मेरे साथी’ची निर्मिती इरॉस इंटनॅशनल करीत असून यात राणा दग्गुबतीसोबत पुलकित सम्राट (Pulkit Samrat), श्रिया पिळगांवकर (Shriya Pilgaonkar) आणि झोया हुसेन (Zoya Hussain) यांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत. या सिनेमाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी रिलीज करण्यात आला होता. सिनेमा २६ मार्च रोजी देशभरात रिलीज केला जाणार असल्याचेही जाहीर करण्यात आले होते. पण आता महाराष्ट्र वगळून सिनेमा रिलीज केला जाणार आहे. इरॉसने रिलीज केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे, ‘प्रिय प्रेक्षकांनो, तुम्हाला ही माहिती देताना आम्हाला खूप दुःख होत आहे. पण हिंदी सिनेमाच्या मार्केटमध्ये कोरोनाची स्थिती अत्यंत गंभीर होऊ लागली आहे. त्यामुळेच आम्ही आमचा हाथी मेरे साथी सिनेमाची हिंदी आवृत्ती आता रिलीज न करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र आम्ही तेलुगु भाषेतील ‘अरन्या’ आणि तामिळ भाषेतील ‘कादान’ या नावाने आमचा हा सिनेमा साउथ मार्केटमध्ये ठरलेल्या तारखेला म्हणजे २६ मार्च रोजी रिलीज करणार आहोत. हिंदी रिलीजबाबत आम्ही विचार करीत असून त्याची तारीख ठरताच तुम्हाला कळवली जाईल. असेही या पत्रकात म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER