बॅकहँडचा बदललेले रबर आणि आक्रमक खेळाने दिले यश- गुणशेखरन

टेबल टेनिसच्या जगतातील बेस्टमधील बेस्ट खेळाडूच केवळ वर्षअखेरच्या विश्वचषक स्पर्धेत खेळतात. केवळ 20 खेळाडूंनाच या स्पर्धेत स्थान असते आणि या मोजक्या 20 खेळाडूंमध्ये यंदा भारताच्या साथियन गुणशेखरनने स्थान मिळवले. महत्त्वाचे म्हणजे साथियनने ही संधी सुवर्णसंधी मानून आपली छाप पाडली. गटवार सामन्यात त्याने सायमन गॉझी व जोनाथन ग्रॉथ या आपल्यापेक्षा वरच्या क्रमांकाच्या खेळाडूंना मात दिली आणि विश्वचषक टेबल टेनिस स्पर्धेची बाद फेरी गाठणारा केवळ दुसराच भारतीय खेळाडू ठरण्याचा मान मिळवला.

सलग दुसऱ्या वर्षी लक्षवेधी कामगिरी करत साथियन क्रमवारीत 30 व्या स्थानी पोहोचला आहे.

चेंगडू येथील विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्या दिवशीची त्याची कामगिरी ही या स्पर्धेच्या 40 वर्षांच्या इतिहासात कुण्या खेळाडूने पहिल्या दिवशी केलेली सर्वोत्तम कामगिरी होती असे आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस महासंघाने म्हटले आहे. विश्वचषक स्पर्धेत प्रथमच खेळणाऱ्या खेळाडूसाठी हे प्रशस्तीपत्र म्हणजे मोठीच पावती आहे.

आपल्या या कामगिरीबद्दल तो म्हणतो की पहिल्यांदाच विश्वचषक स्पर्धेत खेळत असल्याने माझ्याकडे गमावण्यासारखे काही नव्हते. मी नेहमीपेक्षा वेगळे डावपेच वापरले आणि अधिक आक्रमक खेळ केला. माझी देहबोली धाडसी ठेवली. शिवाय बॕकहँडच्या बाजूने मी वेगळ्या रबरने खेळलो. चेन्नईत मी आणि प्रशिक्षक एस. रामन यांनी स्पर्धेआधी घेतलेली मेहनत अतिशय महत्त्वाची ठरली. आणि ज्या खेळाडूंना आपण आधी कधीच हरवलेले नव्हते त्यांना मात दिली हे सर्वात विशेष ठरले.

विश्वचषक स्पर्धेसाठी नेमकी काय तयारी केली होती याची माहिती देताना तो म्हणाला की, मी सर्व्हिस रिसिव्ह करण्यावर मेहनत घेतली. अधिक आक्रमक खेळ विशेषतः बॕकहँडवर आक्रमक खेळायचे धोरण ठरवले. बनाना फ्लिकसारखे प्रकार शिकलो. रॕलीजमध्ये आणखी मागे जावून आणि अधिक गतिमान खेळ करायचा प्रयत्न केला. चिनी खेळाडू असाच गती व ताकदीच्या मिश्रणाचा प्रभावी वापर करतात. त्यामुळे फ्रान्सच्या गाॕझीला माझ्याविरुध्द खेळताना कठीण गेले.

आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस महासंघानेसुध्दा त्याचे विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक लक्षवेधी पदार्पण करणारा खेळाडू म्हणून वर्णन केले. गाॕझी व ग्रोथवरील विजयाने त्याला हा मान मिळवून दिला.

गॉझीवरचा विजय विशेष होता कारण त्याच्याविरुध्द आधी तीन वेळा अटीतटीची लढत होऊन मी हरलो होतो. आणि त्याला खेळून काढणे मला त्रासदायकही ठरत आलेले आहे. गॉझी व ग्रोथ हे दोघे रॕली करणारे खेळाडू आहेत जी माझ्यासाठी डोकेदुखी आहे. पण मी तयार होतो आणि योजनेनुसार खेळ झाला. महासंघाचे लोकं आणि चेंगडूतील चिनी दर्शकांनाही माझ्या खेळातील बदल बघून आश्चर्य वाटले. या विजयाने मी इतरांना संदेश देऊ शकलो की मी थोड्याकाळाचा खेळाडू नाही तर ‘लंबी रेस का घोडा’ आहे. पहिल्या तिसांतील माझे स्थान उगाचच नाही. मी वरच्या लीगमध्ये खेळायचा हक्कदार आहे हेच या विजयांनी दाखवुन दिल्याचे तो म्हणाला.

2018 हे राष्ट्रकूल आणि आशियडसारख्या बहुविध खेळांचे वर्ष होते. त्यात यशस्वी ठरल्यावर 2019 हे वर्ष मात्र वेगळै होते. त्यामुळे दोन्ही वर्षांसाठी रणनिती वेगवेगळी आखावी लागते असे त्याने सांगितले. राष्ट्रकुल स्पर्धेत केवळ आपला चांगला खेळ करावा लागला होता पण आशियाडमध्ये त्याच्याही पलीकडे वरच्या दर्जाचा खेळ करावा लागला. यंदा केवळ उच्च दर्जाच्या स्पर्धांतच खेळायचे धोरण ठरवले. त्यासाठी काही रँकिंग गुणांचेही नुकसान सोसले असे त्याने सांगितले.

आशियाई स्पर्धेत साथियन हा सांघिक स्पर्धेत अपराजित होता. वैयक्तिक स्पर्धेत 43वर्षात प्रथमच त्याच्या रुपाने भारतीय खेळाडूने उपांत्यपूर्व फेरी गाठली होती आणि त्यानंतर विश्वचषक स्पर्धेचीही त्याने बाद फेरी गाठली. यापैकी आशियाई स्पर्धा खासच होती विशेष करुन हारिमोतोसारख्या खेळाडूवर विजय हे मोठैच यश होते पण विश्वचषक स्पर्धेतही मी दडपण चांगल्याप्रकारे हाताळले आणि अनुभवी खेळाडूंना चांगली झुंज दिल्याचे तो म्हणाला.

विश्वचषक बाद फेरीच्या सामन्यात तो माजी नंबर वन आणि दोन वेळच्या विश्वविजेत्या टिमो बोलकडून पराभूत झाला. हा अनुभव कसा होता याबद्दल तो म्हणाला की, टीमोनेही कौतुक केले. तो एक चांगला माणूस आहे. तीन चार वर्षापूर्वी च मी जेंव्हा पहिल्या शंभरातही नव्हतो तेंव्हाच त्याने माझे भविष्य उज्ज्वल असल्याचे आणि मी पहिल्या शंभरात स्थान मिळवेल असे भाकित केले होते. आता त्याच खेळाडूविरुध्द मी खेळलो आणि त्याला प्रत्येक गुणासाठी संघर्ष करायला लावला याचा आनंद आहे. येत्या वर्षात हे सातत्य टिकवून ठेवावे लागणार आहे असे तो म्हणाला.